Thursday, December 30, 2010

गोष्टी वेडा मृण्मय

"बाबा, आज कुठली गोष्ट सांगणार? "
वर वर अत्यंत निरागस भासणारा हा प्रश्न म्हणजे एकतर पुढील १५-२० मिनिटांच्या आनंदाची नांदी तरी असते किंवा रडारडीची तरी. जर का मी गोष्ट सांगायला हो म्हणालो तर ठीक असते नाहीतर नुसती रडारड.

आणि हाच प्रश्न दिवसातून ५-७ वेळा तरी परत परत येतो. सकाळी उठला आणि जर त्याला गोष्टीचे पुस्तक दिसले तर लगेच हा प्रश्न फणा काढतो. मग सुरु होतो गोष्टींचा सिलसिला. ब्रश करताना गोष्ट, दूध पिताना गोष्ट , तो-तो करताना गोष्ट, संध्याकाळी घरी आले की गोष्ट!! रात्री झोपतानाच्या गोष्टी म्हणजे चक्क टोल वसुली असते. बेडरुम मधे जाता जाताच सेटींग सुरु होते.. आई - आज २ गोष्टी हं ... कधी कधी हा आकडा ४ पर्यंत पण गेलेला आहे!!

पण एक चांगले आहे. मृण्मयला त्याच त्याच गोष्टी पण चालतात. त्यामुळे प्रत्येक वेळी नवीन गोष्ट शोधावी लागत नाही. हे वेगळे की आम्हीच कंटाळून जातो तीच तीच गोष्ट परत परत सांगून :)

आत्तापर्यंतच्या गोष्टींची यादी:
१. उंदीरमामाची टोपी,
२. भित्रा ससा,
३. राम-रावण,
४. रामाचा चंद्रासाठी हट्ट,
५. हट्टी पुंड्या,
६. बुड-बुड घागरी,
७. तहानलेला कावळा,
८. सिंह आणि उंदीर,
९. जाळ्यात अडकलेले कबुतर,
१०. बोलणारी गुहा,
११. शेपटीवाले झाड
१२. भित्रा ससा,
१३. ससा आणि कासव,
१४. बाल हनुमान सूर्याला पकडायला जातो,
१५. दोन बोके आणि लोण्याचा गोळा
१६. गणपतीची पृथ्वी प्रदक्षिणा
१७. कोल्हा आणि करकोचा
१८. गणपतीच जन्म,
१९. गणपती आणि "अनलासुर"
२०. लांडगा आला रे आला,
२१. टोपीवाला आणि माकड,
२२. लाकूडतोड्या आणि त्याची हरवलेली कुऱ्हाड इ. इ.

मग याच गोष्टींमधे बदल करून सांगतो आम्ही. कधी बुड-बुड घागरीतली खीर रव्याची असते तर कधी ती शेवयाची असते. कधी हट्टी पुंड्या श्रीखंडासाठी हट्ट करतो तर कधी बासुंदी साठी, तर कधीकधी एकाऐवजी दोन-दोन कबुतरे जाळ्यात अडकतात. त्याच्या गोष्टींमधे कार्तिकेय शिट्टी मारून मोराला बोलावतो तर मनीमाऊ फोन करून माकडाला खीर खायला बोलावते.

आणि मग मधेच मृण्मयला खोड्या सुचायला लागतात. बुड-बुड घागरीमधे उंदीर सगळी खीर पिवून टाकतो, मग माझी आणि मेघनाची तारांबळ उडते एकतर उंदराला खीर पिऊ द्यायची नाही किंवा काहीतरी करून गोष्ट जुळवायची!! एकदा असेच झाले. तहानलेल्या कावळ्याच्या गोष्टीत तो कावळा पाण्याची बाटली घ्यायला विसरतो. तर एके दिवशी मृण्मयने सांगून दिले की नाही, कावळा बाटली नाही विसरला, मग झाली माझी पंचाईत.. कावळ्याकडे पाणी असेल तर तो कशाला माठ शोधत बसेल? मग मी पण मज्जा केली. मृण्मयला म्हणालो - कावळ्याला तहान लागली, त्याने पाण्याची बाटली काढली, पाणी प्यायला आणि मावशीकडे पोहोचला. संपली गोष्ट!! मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला आणि म्हणाला उम्म्म असे नाही, कावळा विसरु दे बाटली :)

आणि हो, तो गोष्टींची वेगवेगळी versions लक्षात ठेवतो. शाळेत आणि घरी एकच गोष्ट सांगितली गेली तर त्यातले फरक तो बरोबर लक्षात ठेवतो. आणि आम्ही जर शाळेतले version सांगायला लागलो तर त्याला घरातलेच version हवे असते!!

असो, सध्या मी आता नवीन गोष्टींच्या शोधात आहे. तुम्हाला जर काही अजून गोष्टी सुचत असतील तर अवश्य सांगा :)