Monday, October 31, 2011

मृण्मय पत्ता सांगतोय..

स्थळ: MTDC, मोहर्ली, ताडोबा
या ट्रिपमधे आम्हाला नाईक म्हणून एक कुटंब भेटले. Nice and very friendly family... मृण्मय आणि त्यांचा मुलगा ध्रुव यांची चांगली मैत्री झाली होती. शेवटच्या दिवशी आम्ही कॉन्टॅक्टस exchange करत होतो, तेव्हा ध्रुवच्या बाबाने मृण्मयला विचारले:

काका: अरे मला तुझा पत्ता सांगतोस का?
मृण्मय: होssss.
(असे म्हणून त्याने टेबलवर पत्ता सांगायला सुरुवात केली. एका टोकापासून दु‌सर्‍या टोकापर्यंत हात फिरवत जोरजोरात चालू होते)
मृण्मय: असे इथून यायचे straight.. बाबा straightच यायचे ना श्रद्धामामीकडून? (For him the starting point is always the day care!! - so small a world for him :))
मी: हो सरळच यायचे.
मृण्मय: (कुठली तरी अगम्य नावे वापरून परत..) बाबा, मग Right घ्यायचा ना?
बाबा: कुठे रे?
मृण्मय: आपल्या घरी यायला?
बाबा: हो, चांदणी चौकातून Right घ्यायचा..
मृण्मय: मग असं वंडर फ्युचुरामधे यायचे.
इथे गाडी पार्क करायची (all the time using his gestures to show where and how).
आणि मग जिना चढून वर यायचे. तिथे लिफ्ट असते.
(in the same flow...)
 ती बंद असेल तर जिना चढून वर यायचे!! (jaws dropped....)
आणि ती चालू असेल तर लिफ्टमधे शिरायचे आणि ५ नंबरचे बटण दाबायचे.. मग आमच्या घरी पोहोचाल!!
काका: अरे बापरे!! ५ मजले चढून यायचे?
मृण्मय: हो लिफ्ट बंद असेल तर..
काका: अरे, खूपच उंच आहे रे.. तुमच्याकडे बादली वगैरे नाही का?
 मृण्मयच्या चेहेर्‍यावर प्रश्नचिन्ह...
काका: बादली खाली सोडायची आणि मी मग त्यात बसेन, मग ती वर ओढायची

[Here comes the punch...]


In completely dismissive tone...
मृण्मय: "आमच्याकडे असले काही नाही...."

Sunday, October 30, 2011

संवाद


ती

लग्नाला उणे-पुरे वर्ष नाही झाले तोच यांच्यात बदल व्हायला लागला आहे. हल्ली मला फारसा वेळ देत नाहीत हे. पुर्वी कसे तासन्‌ तास बोलत बसायचो, वेळ कमी पडायचा. बोलायला विषय नाही असे कधी झालेच नाही. हा नाही, तर तो विषय असायचाच. कधी माझ्या मित्र-मैत्रिणी, तर कधी त्याचा गिर्यारोहणाचा ग्रुप. माझ्या नाटकातल्या मजा, तर त्याच्या ट्रेकिंगमधले अनुभव. आई-आप्पांची होणारी मजा आणि माझ्या नाटकांमुळे ममा-पप्पांना वाटणारी काळजी. कितीतरी वेळ बोलत बसायचो. पण आता ते नाही. मोठ्या मुष्कीलीने कशीबशी १५-२० मिनिटे मिळतात रात्री झोपायच्या आधी. तेही स्वारी दमलेली नसेल तर. नाहीतर आहेच दुसर्‍या दिवसाची वाट बघणे. काल पण असेच झाले. मला नवीन नाटक मिळते आहे. त्याच्याबद्दल बोलायचे होते. तर स्वारी आली दमून. त्यात कंपनीत चिडचिड झालेली होती. हाताखालचे लोकं कामं करत नाहीत आणि मग घेतात डोक्यात राख घालून. घरी बायको आहे, तिलाही वेळ दिला पाहीजे, तिच्याशी बोलले पाहीजे वगैरे काही नाही. जरा भाजीला तिखट जास्त काय झाले तर लगेच भाजी टाकून दिली. काही बोलले पण नाहीत तसेच आडवे झाले. दोन शब्द पण बोलले नाहीत. सकाळी उठून काही समजायच्या आत पोहोचले पण ऑफीसमधे. आता आज परत असेच होईल. मग मी नव्या नाटकाबद्दल कधी बोलू यांच्याशी?

तो

आज काल जरा चिडचिडच होते माझी हिच्यावर. कंपनीतला सगळा राग तिच्यावर निघतो. तिला मी घरी आल्यावर माझ्याशी खूप बोलायचे असते. मी पूर्वीसारखा तिच्याशी बोलत नाही ही तिची तक्रार काही फारशी चुकीची आहे अशातला भाग नाही, पण मी तरी काय करू? हल्ली फारसा वेळच मिळत नाही इतर काही करायला. आणि कंपनीतल्या गोष्टींमधे तिला ईंटरेस्ट नसतो. मग मी बोलणार तरी कशावर. ट्रेकींग पण हल्ली बंद झाले आहे. त्यामुळे बदल पण काहीच होत नाही. आता हे हातातले प्रोजेक्ट पूर्ण झाले कि तिला मस्त कुठेतरी बाहेर घेऊन जायचा विचार आहे. मस्त सरप्राईज होईल तिला. काल रात्री त्याच विचारात होतो. वेगवेगळी ठिकाणे, किती दिवस, कधी – हेच सगळे डोक्यात चालू होते. त्यात ती नव्या नाटकाबद्दल बोलत होती. म्हणजे मला ही ट्रिप तालमी चालू व्हायच्या आत करायला पाहीजे. म्हणजे प्रोजेक्ट पण जरासे आधीच संपवले पाहीजे. त्याच नादात आज सकाळी लवकर कंपनीत जायचा विचार पक्का केला. जेवण करून लगेच झोपलो आणि भल्या पहाटे ऑफीसला पोहोचलो. पण त्या गडबडीत तिच्याशी नाटकाबद्दल बोलायचे राहूनच गेले. आता आज मात्र बोललेच पाहीजे.

टीप: ही संकल्पना श्री. सुधीर गाडगीळ यांच्या "शब्द" या "चतुरा" मासिकातील लेखमालेवरून घेतली आहे.

Saturday, October 29, 2011

मृण्मयचे Logic

काही दिवसांपूर्वी, घरी परत येत असताना, मृण्मयला खूप झोप येत होती. त्याला जागे ठेवण्यासाठी मी काहीतरी करून त्याला गुंतवून ठेवत होतो बोलण्यात. त्यातलाच एक संवाद:
मी: अरे तो लाल दिऊ बघितलास का?
मृण्मय: कुठला?
मी: तो टॉवरवरचा..
मृण्मय: तो कसला दिऊ आहे बाबा?
मी: अरे त्याची ना वेगळीच गंमत आहे...
मृण्मय: सांग ना बाबा..
मी: अरे, आकाशातून विमाने जातात ना, त्यांना दिवसा प्रकाशामुळे टॉवर कुठे आहे ते दिसते. पण रात्री कसे दिसणार? अंधार असतो ना... त्यांना कळावे रात्री कि इथे टॉवर आहे, म्हणून दिऊ लावला आहे तिथे.

हे मग घरी पोहोचल्यावर आईला सांगून झाले. मग काही दिवस याच गोष्टीचे "Repeat Telecast" चालू होते. गेले बरेच दिवस या "लाल दिऊची" चर्चा झाली नव्हती. काल ताडोब्याहून परत येताना, परत मृण्मयला जागे ठेवण्याचे प्रयत्न चालू होते. And this time it was Meghana keeping him awake (and herself too). तोच लाल दिऊचा संवाद असा उलगडला!!

बाबा: अरे मृण्मय, तो लाल दिऊ दिसतो आहे का? त्याची गोष्ट सांग ना आईला...
आई: काय गोष्ट आहे रे ती?
मृण्मय: अगं आई, विमानाला दिसले पाहिजे ना, म्हणून तो दिऊ आहे.
आई: पण विमान इथे थोडेच उतरणार आहे?
मृण्मय: अगं आई.. विमानाला आकाशात दिसले पाहीजे ना, नाहीतर त्यांची धडक होईल ना?
आई: ....
बाबा: ...
मृण्मय: अंधारात विमानाला दिसले नाही दुसरे विमान, तर धडक होईल ना त्यांची, म्हणून तो दिऊ लावला आहे!!

फुलपाखरु

कधी फुलपाखराला वाटले असेल का की सागरात डुबकी मारावी? मस्त लाटांवर आरुढ होवून खुशाल डुलकी काढावी? ते सततचे भिरभिरणे थांबवून जरा विश्रांती घ्यावी? नसावे वाटंत. एका फुलावरून दुसर्‍या फुलावर जाण्यात जी मजा असेल ती कैक पटीने जास्त असावी. प्रत्येक फूल कसे वेगळे. कोणाचा रंग आकर्षक, तर कोणाचा सुगंध. कोणाच्या पाकळ्या मनमोहक तर कोणाचे परागकण. प्रत्येक फूल म्हणजे एक वेगळा अनुभव असावा. आणि त्या अनुभवाचीच नशा फुलपाखरांला चढत असावी. नाहीतर कोण उगाच कशाला अशी भ्रमंती लावून घेईल स्वतःच्या पाठीशी?

Friday, October 28, 2011

घर


घर म्हणजे फक्त तू आणि मी नाही,
घर म्हणजे फक्त वीटा आणि भिंती नाहीत
घर म्हणजे दोन कुटंबांचा संगम
त्यात तुझे आणि माझे असे भेद करायचे नाहीत

घरासाठी लागतात नियम
घरासाठी लागतो संयम
पण फक्त नियमांनी घर बनत नाही
आणि संयमाशिवाय घर तगत नाही

घर म्हणजे तुझा माझा संवाद
नको तिथे एकही विसंवाद
यदाकदाचित झाले जरी वादविवाद
तरी देऊ एकमेकांच्या सादेला साद

Thursday, October 27, 2011

शेवट


जिवाभावाचा सोबती, असा अचानक निघून गेला,
जाताना जीवन जगायची आसच घेवून गेला

ती शेवटची आर्त हाक, ती व्याकुळ नजर,
बोलायचे होते बरेच काही, पण शब्द अडकले ओठांवर

जगन्नियंत्याशी केली कितीही मारामारी,
तरीही शेवटचे शब्द – I am sorry

आता संपले सगळे, काहीच नाही उरले
अजून काही सहन करायचे त्राण नाही उरले

Wednesday, October 26, 2011

एक सकाळ


भल्या पहाटे जाग आली. उठून बाल्कनीत आले तर नुकतेच कुठे फ़ुटायला लागले होते. सूर्य अजून वरती यायचा होता. पक्षांची किलबिल सुरु होती. थंड हवेच्या झुळुकीने मन प्रसन्न झाले. गेल्या कित्येक दिवसात असा अनुभव घेतलाच नव्हता. खाली उतरले तर काय, दवबिंदूनी पाने मोहरून गेली होती, फुले नुकतीच उमलायला लागली होती. "फुलराणी" कविता आठवली:

हिरवे हिरवे गार गालिचे,
हरित तृणांच्या मखमालीचे
त्या सुंदर मखमालीवरती,
फुलराणी हि खेळत होती

तिथेच बसले मग जरा, फुलाकडे बघत. त्या इवल्याशा विश्वात काय काय हालचाली होत असतील याचा विचार करत. एका नव्या जीवाचे या दुनियेत येणे, पण मानवी जन्मापेक्षा संपूर्णपणे भिन्न. आयुष्य किती तर जेमतेम काही तास! पण त्या थोड्याश्या वेळातच काय ते होवून जाणार. एखादयाच्या नशिबी गजरा, तर दुस‍र्याच्या प्रक्तनात तसेच गळून जमिनीवर पडणे. एखादे देवाच्या मस्तकी पोहोचेल तर एखाद्याच्याच नशिबात भ्रमराची साथसंगत. त्या फुलाला हे सगळे जाणवत असेल का? कि ते पूर्णपणे अनभिज्ञ असेल या सर्व शक्यतांबाबत? कोणास ठावूक!

आणि अचानक माझ्या चेहेर्‍यावर सूर्याची कोवळी किरणे विसावली आणि माझे डोळे मिटले गेले. त्या एका क्षणात रंगांची कित्येक आवर्तने माझ्या डोळ्यापुढे नाचून गेली आणि शेवटी उरला तो फक्त पिवळा – सोनेरी पिवळा रंग …  सूर्याचा रंग.

दव हळूहळू कमी होत चालले होते. एका पानावर एकच टपोरा बिंदू उरला होता. सूर्याच्या किरणांनी तो उजळून निघाला होता, इतक्यात एक वार्‍याची खुळुक आली आणि त्यासरशी तो मोती खाली पडला.

ते मगाचचे फूल आता पूर्णपणे उमलले होते. येणार्‍या कुठल्याही प्रसंगाला सामोरे जाण्यास सज्ज! मी ही मग उठले – कामाच्या आठवणीने. परत फिरले – येणार्‍या कुठल्याही प्रसंगाला सामोरे जाण्यास सज्ज होवून !

Tuesday, October 25, 2011

पामर


काय लिहू? काहीच सुचत नाही
पण लिहिल्याशिवाय राहवत पण नाही

कविता लिहू कि कथा लिहू?
मजा लिहू कि व्यथा लिहू?

पण हे सगळे कोणासाठी?
स्वतःसाठी कि दुसर्‍यांसाठी?

एकदा वाटते सोडून देऊ सगळे
कारण आपण नाही जगावेगळे

दासबोधानंतर लिहिणार काय?
आम्ही तर पामर दुसरे काय?

Monday, October 24, 2011

पुन:प्रकाशन...


अचानक एक खजिना गवसला आहे... नाही नाही, पैशाचा नाही, माझ्याच जुन्या काही लिखाणाचा... कुठल्यातरी तंद्रीत लिहिलेल्या कविता, चारोळ्या, स्फुटलेखन वगैरे वगैरे. त्यावेळेस काय भूत डोक्यात होते कोणास ठाऊक, पण तेव्हा "anonymously" लिहून ठेवलेले हे साहित्य परत सापडले आहे. पुढिल काही दिवस मी हे साहित्य (?) ब्लॉगवर लिहिणार आहे. तुम्हाला आवडेल अशी आशा!!