Sunday, September 12, 2021

आठवणींची वर्षपूर्ती

ती. दादा,  

आज १२ सप्टेंबर २०२१. मनावर कायमचा कोरला गेलेला दिवस. याच दिवशी तुम्ही जगाचा आणि आम्हा सर्वांचा निरोप घेतला होता. 

त्या दिवसापासून एकही दिवस असा गेला नाही कि तुमची आठवण नाही आली. सकाळच्या कॉफीपासून रात्रीच्या "good night" पर्यंत. दिनचर्येचा प्रत्येक घटकेला काही ना काही मनाला स्पर्श करून जाते. कधी एखादी रम्य आठवण, कधी झालेले भांडण, कधी झालेला संवाद तर कधी जाहले वाद. सगळे खर्रकन डोळ्यासमोरून सरकते.

कॉफीसाठी कप्स घेताना, कॉफी मध्ये साखर घालताना हमखास तुमची आठवण होते दादा. जेवणाचे ताट लावताना तुमच्या त्या विशिष्ट वाट्या, ताटल्या. तुमच्या खोलीतून येणारा TV चा आवाज आणि तुमचे ते TV सिरीयल मधल्या पात्रांशी बोलणे. रोजच्या रोज देवांची पूजा, वेळच्या वेळी फेऱ्या मारायच्या. 

बाणेर च्या घरी आल्यापासून तुम्ही नेहेमी घरीच असायचात आणि त्यामुळे बाहेर पडताना तुम्हाला सांगून जायचो आम्ही सगळे. पण आता घराला कुलूप लावावे लागते. "आम्ही जवळच जात आहोत, काही वाटले तर लगेच फोन करा. १० मिनिटात पोचू आम्ही" असे सांगायला त्या खोलीत आता कोणी नसते !!

कितीतरी आठवणी..

एखादी क्वचित कधीतरी लागणारी वस्तू बरोबर जागी सापडली कि तुमची आठवण होते. "वस्तूला जागा आणि जागेला वस्तू" हे सतत लहानपणापासून कानावर पडलेले. परवा एका औषधावरचे बारीक प्रिंट वाचायचे होते. जराही विचार न करायला लागत मी तो ड्रॉवर उघडला आणि तुमचे भिंग तिथे होते. व्यवस्थित बॉक्स मध्ये घालून ठेवलेले. नकळत तुम्ही डोळ्यासमोर तरळून गेलात.

परवा "आपला मानूस" बघताना वारंवार तुमची आठवण येत होती. दु:खाने नाही तर समाधानाने. आपल्यात कितीही वाद झाले तरी शेवटी आपण त्यावर तोडगा शोधायचो - कधी ताई/माई/गीताईची मदत घेऊन तर कधी आपला आपणच. हक्काने मला तुम्ही तुमची कामे सांगायचात आणि कौतुक पण करायचात. तुम्ही गेल्यानंतर खोली आवरताना काय सापडले असेल तर माझे visiting card - तुम्ही कौतुकाने मागून घेतले होते. असेच माझे आणि मेघनाचे पर्सिस्टन्ट चे आणि माझे IMR चे पण कार्ड तुम्ही कुठेतरी नीट ठेवलेले असणार आहे. सापडेल कधीतरी.

दर महिन्याचा हिशोब लिहिताना आपली लहानपणाची हिशोबाची वही आठवते. जमाखर्च कधी जुळला नाही तरी तो लिहून ठेवायचात तुम्ही. ती सवय मी सहजरित्या उचलली. मग बंगलोर ला एकटा राहत असताना खर्चाची कधी चिंता वाटली नाही. कारण किती कमावतो आहोत आणि किती खर्च करू शकतो याचे गणित व्यवस्थित बसले तो जमाखर्च लिहायच्या सवयीमुळे. आत्तासुद्धा कुठलीही परस्थिती असली तरी मला पक्के माहित असते आर्थिक गणित कसे आहे माझे ते. मनातल्या मनात तुम्हाला नमस्कार केल्याशिवाय राहत नाही मी.

या वर्षी गणपतीला तुम्ही नव्हतात. आरत्या नेहेमीपेक्षा जास्त वेळा चुकल्या पण दुरुस्त करायला तुम्ही नव्हतात. खूप वेळा तुमच्या नेहेमीच्या जागेकडे वळून बघायचा मोह झाला पण धीर झाला नाही, कारण माहित होते, तुम्ही तिथे नाही आहात.

दादा, आई मला फारशी आठवत नाही. खूप वर्षे झाली तिला जाऊन. पण तुमचा सहवास आत्तापर्यंत लाभला ह्याचे मला खूप समाधान वाटते. आजही कधी कधी वाटते मी तुम्हाला अजून एक सहा महिने या करोना पासून वाचवायला पाहिजे होते, कदाचित आज लसवंत होवून तुम्ही उकडीच्या मोदकांचा आनंद घेतला असतात. पण ते होणे नव्हते. "ईश्वरेच्छा बलियसी" हे तुमचे शेवटचे शब्द आठवतो आणि स्वतःला सावरून घेतो. 


आठवणी येणे थांबणार नाही. त्यातच तुमचे यश आहे. सुरुवातीला खूप रडायला यायचे. पण आता खरे सांगायचे तर तुमची आठवण झाली कि छान वाटते. क्वचित डोळ्यात पाणी येते, पण बऱ्याचदा आनंदच होतो. 

एकच मागणे आहे दादा - देहरूपी नसलात तरी स्मृतीरूपी तुम्ही मला आजूबाजूला सापडत रहा.

तुमचा,

मंदार

Saturday, August 28, 2021

आपला मानूस - चित्रपट समीक्षा

काल बऱ्याच दिवसांनी मराठी चित्रपट बघण्याचा योग आला - आपला मानूस. कथा जरा रंजक वाटली म्हणून बघायचा ठरवला. कलाकार पण तगडे होते - नाना पाटेकर, सुमित राघवन आणि इरावती हर्षे. थोडी कौटुंबिक पण थरारक.



एका पावसाळी रात्री अचानकपणे आबा (नाना पाटेकर) गॅलरीतून खाली पडतात आणि कथेला सुरुवात होते. इ. नागरगोजे (परत नाना पाटेकर) या प्रकरणाचा तपास करायला येतात तसतसे राहुल (आबांचा मुलगा), भक्ती (आबांची सून) आणि आबा यांच्यातील नात्याचा गुंता हळहळू समोर यायला लागतो. 

इन्स्पेक्टर नागरगोजेंच्या तपासात हळूहळू राहुल आणि भक्ती अडकायला लागतात. नक्की काय झाले याचा अंदाज लावता लावता प्रेक्षक कथानकात गुंतून जातो. दर १०-१५ मिनिटांनी नवीन नवीन तपशील समोर येतो आणि चक्रवायला होते. नेहेमीप्रमाणे शेवटच्या १० मिनिटांत नक्की काय झाले याचा उलगडा होतो.

सुरुवात चांगली, मध्य बरा आणि शेवट बकवास - असे या चित्रपटाचे वर्णन करावे लागेल.

कथा तशी सुमारच आहे. त्यातल्या त्यात कलाकार चांगले असल्याने चित्रपट सुसह्य झाला आहे. कथालेखकाचा पक्षपाती दृष्टीकोण बऱ्याच ठिकाणी दुखावून जातो - विशेषतः स्त्रिया आणि IT फील्ड. IT मधले दाम्पत्य आपल्या मुलांची काळजी घेवू शकत नाहीत पण त्याच वेळेस crime branch मधला इन्स्पेक्टर रोज संध्याकाळी आरामात घरी शांतपणे बसलेला असतो - IT मधल्या दाम्पत्याच्या मुलीला खेळवत.

नाना पाटेकर यांनी रंगवलेला इ. नागरगोजे बराचसा चांगला जमून आला आहे. परंतु त्यांनीच रंगवलेले आबा हे पात्र मात्र अतिशय सुमार झाले आहे. मुळात त्या पात्राला फारशी खोली दाखवलेली नाही. पहिल्या १० मिनिटांमध्येच ते पात्र स्वतःबद्दल तिरस्कार करून घेते. त्यात नानांनी तो अभिनय बराचसा विक्रम गोखले यांच्यासारखा करायचा प्रयत्न केला आहे. का ते माहीत नाही. पण ते काही फारसे जमलेले नाही.

राहुल हा एक प्रथितयश वकील दाखवला आहे, तरीपण आबांना तो पैशाची बचत करत नाही याची चिंता लागलेली असते. सून काम करते म्हणजे घराकडे दुर्लक्ष करते असे पक्के ठरवून घेतलेले. 

राहुल स्वतः वकील असूनही आबांपुढे एकदम मुका. एकदाही तो आबांना भक्तीची बाजू घेऊन बोलताना दिसत नाही. त्यातल्या त्यात भक्तीचे पात्र जरा ठीकठाक आहे. 

एकंदरीत कथानकाचे बारा वाजलेले आहेत.

तेव्हा - हा चित्रपट बघितला नाहीत तरी चालेल असा आहे.

आता काही स्वानुभवातून:

  • IT field मध्ये खूप कष्ट करायला लागतात. बरीचशी दांपत्ये याची जाणीव ठेवून आपापले कार्यक्रम, meetings वगैरे ठरवतात. फक्त मुलांचीच नाही तर आई-वडील आणि सासू-सासरे इ. सर्वांची काळजी घेऊन manage करतात. कुठेतरी कधीतरी काहीतरी चुकते, पण म्हणून त्यांना "write-off" करणे चुकीचे आहे.
  • सगळेच बाबा (आबांच्या पिढीतले) आपल्या मुलाला आणि सुनेला असे वागवत नाहीत. बरेचसे समजून घेणारे असतात. आत्ताच्या जमान्यात नोकरी करणारी सून हि काही नाविन्याची गोष्ट राहिलेली नाही. त्यामुळे आबांचा एकांगीपणा न समजण्यासारखा आहे. 
तुम्ही बघितला असेल हा चित्रपट तर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते ऐकायला/वाचायला नक्की आवडेल