Saturday, July 12, 2014

श्रध्दांजली

हात थरथरत आहेत लिहिताना, डोळ्यात पाणी आहे. मनात अपराधीपणाची भावना.

आज गुरुपौर्णिमा. बऱ्याच वर्षांनी शनिवारचा योग जुळून आला. त्यात मृण्मयने पण त्याच्या teacher ना भेटायचे ठरवले. मी पण बेत पक्का केला - माझ्या शिक्षकांना - फडके बाईना भेटून यायचे. मृण्मयच्या सोनाली teacher ना भेटून झाल्यावर मी आणि मृण्मय पोहोचलो शनिपाराजवळ - बाईंच्या घरपाशी .

सोसायटीच्या गेटमधून आत शिरलो. मनात धाकधुक होती . बऱ्याच वर्षांनी चाललो होतो. बिल्डींगच्या खाली पोहोचलो आणि gallery चे दार बंद दिसले. not a good sign. तसाच वर पोहोचलो. दार बंद. दाराबाहेरचा चप्पल stand नव्हता. तेवढ्यात एक आजी दिसल्या. घाबरत घाबरतच विचारले त्यांना - फडके बाई कुठे आहेत? आजी अवाक झाल्या.. हळुच म्हणाल्या - अरे दोन अडीच वर्षे झाली त्यांना जावून. . .

पायातले त्राणच गेले. कसाबसा खाली उतरलो आणि समोरच्या कट्ट्यावर बसलो. डोळ्यातले पाणी बघून मृण्मयला प्रश्न पडला होता बाबाला काय झाले म्हणून . .

फडके बाईंना मृण्मयला भेटायचे होते. मागच्या वेळेस एकटाच गेले होतो तेव्हा रागावल्या होत्या. नंतर नाहीच जमले. कारणे काहिही असोत, जमले नाही हेच खरे. कायमची टोचणी लागून राहणार आहे ही …

न.फ. -  माझ्या दुसरी आणि तिसरीच्या वर्ग शिक्षिका. खूप कडक आणि शिस्तप्रिय. मुले खूप घाबरून असायची. दुसऱ्या वर्गातली मुले आमच्या वर्गात यायला घाबरायची. पण शिकवायच्या मस्त. मला मात्र खूप आवडायच्या. दोन्ही वर्षी भरघोस यश मिळाले. तिसरीत तर पूर्ण इयत्तेत पहिला आलो. त्यामुळे जास्तच आवडायला लागल्या. पुढे माध्यमिक शाळेत गेलो तरी बऱ्याच वेळा गुरुपौर्णिमेला जाणे व्हायचे. दहावी, बारावी, engineering - प्रत्येक वेळेस पेढे घेवून पोहोचलो आणि बाईंच्या चेहेऱ्यावरचा आनंद बघून आणखीनच खूष झालो. आमच्या कडच्या सगळ्या मोठ्या कार्यक्रमांना बाईंनी आवर्जून हजेरी लावली होती. दर वेळी त्यांच्याकडे गेले कि बाई नेमक्या हळिवाचा किंवा डिंकाचा लाडु द्यायच्या (जो मला आजिबात आवडत नाही .. आणि तरीही मी खायचो!) शेवटी एकदा सांगितले कि नाही आवडत मला त्यानंतर मात्र चिवड्याची वाटी पुढे यायला लागली :)

आज मृण्मयला भेटवायचे होते त्यांना .. राहून गेले … आता कायमचेच …

बाई - जाताना पण शिकवून गेलात - "Do things on time." सारखे वाटते आहे दर वर्षी एक दिवस तरी भेटून यायला पाहीजे होते न चुकता .. आता काही उपयोग नाही त्या वाटण्याचा .. 

आयुष्यभर लक्षात ठेवणार आहे आणि हीच तुम्हाला श्रद्धांजली … 

Friday, December 6, 2013

आठवणी

आज सकाळी नाश्त्याला जाताना एका माणसाला हीर काढताना बघितले आणि मन भूतकाळात गेले....

साधारण वीस-एक वर्ष मागे.

मजा होती. नारळाची झावळी पडली कि ती पळत जावून उचलून मागच्या अंगणात टाकायची - कोणी पळवून नेवू नये म्हणून. आणि मग सुट्टीच्या दिवशी लागायचे कामाला. कोयता घेऊन खाली जायचे, झावळ्यांची पाती काढायची, मग त्याचा एकत्र गट्ठा करून वरती आणून गॅलरीत ठेवायचा. मस्तपैकी चौरंग घेवून बसायचे आणि मग सुरु. हिर काढायला. त्याच्या सुऱ्या वेगळ्या ठेवलेल्या असायच्या - बऱ्याचशा धार गेलेल्या पण हिर निघतील एव्हढी धार असायची.

एक गठ्ठा संपला कि दुसरा. किंवा कंटाळा येईपर्यंत. शेवटी ते सगळे हिर एकत्र करून त्याचा खराटा बनवायचा. बऱ्याचदा तो सुटायचा, पण परत बांधायचा. किंवा मग त्याच्यात मागून लाकडाचा तुकडा खुपसायचा. 

मग कधी वेळ झाला नाही आणि पाऊस आला, कि सगळा गिचका व्हायचा तिथे. मग काहीतरी करून ते सगळे साफ करायला लागायचेच. आणि हे करण्यात सगळ्यांचा हातभार. मी, दादा, आई, आजी आणि हो भाऊ आजोबा पण. जमेल तसे चालू असायचे. 

आणि हो. झावळीच्या मधल्या भागाचे तुकडे करून ते गच्चीत सुकायला टाकायचे आणि मग कधीतरी दुसऱ्या गॅलरीत बंब पेटायचा - आंघोळीच्या पाण्यासाठी. मग कधीतरी शेजारच्या गोरे ताई तक्रार करायच्या कि धूर खूप होतो म्हणून. मग बंब बंद व्हायचा… काही दिवसांसाठी :)

आणि होळीच्या दिवशी तर खूप काळजी घ्यायला लागायची .. कोणी झावळ्या पळवू नयेत म्हणून.. आईचा डोळ्याला डोळा लागायचा नाही दुपारी. जरा झावळ्यांचा आवाज वाटला कि मागच्या अंगणात डोकावून बघायचे - कोणी झावळी पळवत नाही ना म्हणून … 

हिर वापरून धनुष्य बाण बनवायचे आणि जुन्या कॅलेंडरवर नेम धरून मारत बसायचे. त्यातल्या त्यात जाडे हिर शोधून बाजूला ठेवायचे आणि काकांच्या दुकानातून रिकामी रिळे आणून त्याच्यापासून रणगाडा बनवायचा - मेणबत्तीचा तुकडा, लांब रबर आणि हिराचा तो तुकडा!

मग नंतर कधीतरी हे सगळे बंद पडले.… 

Monday, January 14, 2013

बापसे बेटा सवाई

रविवारची दुपार. मृण्मयचे जेवण चालू होते आणि बडबडही ...

मृण्मय: बाबा, आज कणिक कोणी केली असेल? म्हणजे पाणी कोणी घातले असेल?
मी: उम्म... आईने...
मृण्मय: नाही.. ३ chance हम्म.. एक झाला ..
मी: मग माउने..
मृण्मय: नाही.. माऊ तर झोपली होती..
मी: मग तू?
मृण्मय: yess !!
मी: अरे वा वा!!
मृण्मय: आणि आमटी ?
मी: आईने..
मृण्मय: बरोबर!!
मृण्मय: आणि .... आणि खिडकी?
मी surprised .. नक्की काय expected आहे ते लक्षात यायला जरा वेळ लागला... अचानक आठवले कि त्याने सकाळी खिडक्या साफ केल्या होत्या...लगेच उत्तरलो.. तू!!
मृण्मय: नाही.... ओळख??
मी: ए उगाच खोटे नको हं बोलूस.. मी बघितले आहे तुला सकाळी ...
मृण्मय: नाही.... ओळख??
मी : तूच.. मला माहित आहे..
मृण्मय: अरे बाबा.. खिडक्या maker ने केल्या मी नाही!!! (He meant carpenter or person who "made" the windows!!)

बाबा flat ..... आणि kichen मध्ये आईला हसू आवरेना...

Sunday, October 28, 2012

Code


दिवाळीची खरेदी चालू होती. आत दुकानात गर्दी होती म्हणून मी आणि मृण्मय दुकानाबाहेर बसलो होतो. मृण्मयची बडबड सुरु होती. 
मृण्मय: बाबा, मला आत आईकडे जायचे आहे.
मी: अरे, आई ड्रेस ट्राय करते आहे. थांब इथेच...
मृण्मय: तुला कसे माहित?
मी: आईने सांगितले...
मृण्मय: का?
मी: अरे मी आणि आई सगळं सांगतो ना एकमेकांना..
मृण्मय: मग मला का नाही सांगत तुम्ही?
मी: अरे तुला कळत नाही ना अजून सगळे... थोडा मोठा झालास की सांगू..
मृण्मय: कळते मला...
मी: मी ऑफिसचे नाही कि नाही सांगत सगळे..
मृण्मय: सांग ना.. कळते मला..
मी: मी ऑफिसमधे कोड लिहितो ना, ते कसे कळणार तुला...
मृण्मय: कळले मला..
मी: काय? (मी कनफ्युज्ड...)
मृण्मय: अरे, एक ब्लॉक असतो. त्याच्या खाली लिहिलेले असते कि काय लिहायचे आहे त्या ब्लॉक मधे
(Getting more and more confused)
मृण्मय: त्या ब्लॉकमधे काही ब्लॅक असतात आणि काही व्हाईट असतात. ब्लॅकमधे काही लिहायचे नसते..
आणि मी कपाळावर हात मारून घेतला!!


Wednesday, August 1, 2012

चाफा


"फुले घ्या फुले! चाफ्याची फुले... ५ पैशाला एक!!' 

साधारणपणे २०-२५ वर्षांपुर्वीची हि आठवण...

साधारणपणे 7 ते 8 वर्षाचा एक मुलगा सकाळी ७-७:१५ पासून ८ वाजेपर्यंत ओरडत असायचा. सुरुवातीला कुतूहल म्हणून लोक येवून बघायचे कि कसली फुले आहेत ते. कशी आहेत ते. त्यातून काही नेहेमीचे customer झाले. दिवसांमागून दिवस गेले. 5 पैशाची फुले रुपयाला 10, मग रुपयाला 6 अशी महाग होत गेली.. मग हळूहळू तो मुलगा अभ्यासात busy झाला. पण लोक केवळ चाफ्याच्या आठवणीने विचारत यायचे.. फुले आहेत का म्हणून...  रोजच्या रोज येणारे पोतदार आजोबा, इनामदार आजोबा, श्रावण सुरु व्हायच्या आधी "booking" करून ठेवणारे जैन आजोबा आणि असे कित्येक लोक ... 

तुमच्या लक्षात आले असेलच कि तो मुलगा दुसरा-तिसरा कोणी नसून अस्मादिकच होते!! 

आता मागे वळून बघताना वाटते खरंच मी दारासमोर उभा राहून फुले विकत होतो का? सुरुवातीला जरा संकोच वाटत होता, पण हळू-हळू सवय झाली आणि मग मजा पण यायला लागली. आई-दादा भल्या पहाटे उठून गच्चीवर जावून चाफ्याची फुले काढायचे. हाताला येतील तेवढी मी पण काढायचो. प्रथम ज्यांचे booking असेल त्यांच्यासाठी फुले बाजूला काढून  ठेवायची आणि उरलेली घेवून लगेच विकायला पळायचे. शाळा-class ची वेळ होइपर्यंत  जमतील तेव्हढी विकायची आणि मग उरलेल्या फुलांसाठी पाटी लावून ठेवायची !! त्यात एखादा दिवस असा यायचा कि फुले फारशी निघायची नाहीत किंवा पाऊस खूप असायचा.. मग लोकांना समजावता समजावता नाकी-नऊ यायचे.. त्यांना वाटायचे की booking करूनही आम्ही त्यांच्यासाठी फुले ठेवली नाहीत सगळीच पंचाईत .. एखादे फुल तोडताना फांदी तुटली तर वाटणारी हळहळ, झाडावरच्या कळ्या बघून दुसऱ्या दिवशी किती फुले येतील याचा अंदाज करायचा..फुले कमी झाली कि झाडाची छाटणी करून घ्यायची... दुसऱ्या मजल्यावरच्या गच्चीवरून फुले खाली सोडण्यासाठी केलेली युक्ती - दोरीला plastic ची पिशवी बांधून त्यातून फुले खाली सोडायची... एक न अनेक आठवणी!!

त्या फुले विकण्याच्या अनुभवाचा एक फायदा नक्की झाला - भीड चेपली. आणि आता वाटते त्याचा गेल्या 10-12 वर्षात कुठे-ना-कुठेतरी नक्की उपयोग झाला आहे. 

आज हे सगळे आठवायचे कारण म्हणजे गेले 2 दिवस office मध्ये एकजण त्याच्या घरची चाफ्याची फुले घेवून येत आहे ... सगळ्या आठवणी जाग्या झाल्या!!

Wednesday, April 11, 2012

बोलती बंद!!


मेघना: चला, जेवायला बसू यात...
मंदार: हो, चला, वेळ  झाली जेवायची...
मृण्मय: नाSSSहीSSS
मेघना डायनिंग टेबलकडे जाताजाता... मीच पहिली, मीच पहिली.. 

पहिला माझा नंबर 
पेढे खाऊ शंभर!!

मृण्मय (जागचा अजिबात न हलता...): ए आई, शंभर पेढे खाल्लेस तर पोट दुखेल तुझे!!! :)

Wednesday, February 22, 2012

Bournvita Boy!!

गेले काही दिवस मी आणि मृण्मय रोज सकाळी उठल्यावर laptop वर "बातम्या" वाचतो. म्हणजे मी त्याला वाचून दाखवतो. मग यात काही Videos असतात, काही photos असतात. कधी कधी नुसतेच त्याला वाचून दाखवतो.


आज सकाळी पण e-paper वाचत होतो. कालच्या भारत- श्रीलंका match ची बातमी बघत होतो. त्या पानावर match चे फोटो नव्हते. त्यामुळे मृण्मयला काही फारशी मजा येत नव्हती. मला काहीतरी करून त्याचे लक्ष दुसरीकडे वळवायचे होते, किंवा त्याला पटवायचे होते कि "It's okay not to have photos once in a while". 


तेव्हढ्यात मेघना तिथे आली. 


मी: अगं आई, match चे photos च नाही आहेत. 
मृण्मय: हो ना...
मी: अरे, आपण match हरलो ना म्हणून फोटो दिले नसतील त्यांनी... पेपरवाल्यानी..
...
...
...
"अरे, पण मग श्रीलंकेचे फोटो द्यायचे ना!!!"
My Bournvita boy quipped :D