Monday, September 12, 2022

द्वितीय पुण्यस्मरण

ती. दादा,

२ वर्षे झाली तुम्हाला जाऊन. आधी वाटले होते कि कसे करणार आम्ही तुमच्याशिवाय. पण कुठेतरी याची जाणीव पण होती कि तुम्ही आम्हाला खूप आत्मविश्वास पण दिला आहे. त्या बळावर चालू आहे आता. 

तुमची आठवण सगळीकडे भरून राहिली आहे. अजूनही जिन्यावरून उतरताना कधी कधी वाटते कि तुम्ही खोलीतून बाहेर येऊन "गुड मॉर्निंग" कराल. पण मग लगेचच जाणवते कि ते आता होणे नाही. काही आठवड्यापूर्वी मला कोरोना झाला त्यावेळेस तुमच्याच खोलीत वास्तव्य केले होते. अजूनही तुमच्या वास्तव्याच्या खाणाखुणा तिथे जागोजागी आहेत. तुमचा दाढीच्या सामानाचा डबा, तुमची पुस्तके तुमची आठवण करून देतात. छान वाटते. 

तुमच्या नसण्याला स्वीकारून आमच्या कामांमध्ये बदल करून वाटचाल सुरु आहे. गणपतीच्या वेळेस मागच्या वर्षीप्रमाणेच तुमची आठवण झाली. पण यावर्षी जरा तयारीत होतो. आरती करताना तुम्ही नसणार या जाणिवेने जरा जास्त काळजीपूर्वक आरत्या म्हणत होतो आणि सोबतीला पुस्तक पण घेतले होते मृण्मय आणि मेघनाने. "मोदकांचे वायन" आणि तुम्ही याची एवढी गट्टी आहे कि कितीही वर्षे झाली तरी आपले संवाद आठवत राहतील. 

बाप लेकाचं नातं तसं वेगळंच असतं. धाक आणि प्रेम याचे ते एक वर्णन न करता येणार मिश्रण असते. साधारणपणे महिन्याभरापूर्वी "एकदा काय झालं" नावाचा एक अप्रतिम चित्रपट बघितला. बाप-लेकाच्या नात्याचा तो एक सुंदर आविष्कार होता. कधीकधी मुलगा बापावर किती अवलंबून असतो आणि ते अवलंबित्व कितीही हवेहवेसे वाटले तरी त्याचा त्रास कसा होऊ शकतो त्याचे प्रत्यंतर त्या चित्रपटात आले.  प्रत्येक बापाला त्याचा मुलगा/मुलगी हि स्वतंत्र व्हावी अशी ईच्छा असते आणि तास त्याचा प्रयत्नही असतो. दुर्दैवाने चित्रपटातल्या बापाला ती संधी मिळतच नाही. 

पण तुम्ही आम्हा सर्वानांच स्वावलंबी बनवलेत - कधी प्रेमाने तर कधी धाकाने. आजही त्याची मधुर फळे आम्ही चाखतो आहोत. कॉलेजनंतर मी एकटाच बंगलोरला गेलो. परके शहर. कानडी भाषा. लोक हिंदी/इंग्लिश बोलतील कि नाही याची काही कल्पना नाही. जरी आधी कधीच एकटा राहिलो नसलो तरीही गेलो आणि छान जमले. आत्मविश्वासाने सगळ्या गोष्टी केल्या. याचे श्रेय आई आणि तुम्हालाच तर आहे.  

आणि आता मृण्मयला चार गोष्टी शिकवताना आपसूकच तुमची आठवण होत राहते. 


सुट्टीतले शुद्धलेखन आणि पाढे - हे म्हणजे तर कधीच न विसरता येणारी गोष्ट आहे. अगदी परवाच मृण्मयने अचानक विचारले - बाबा - ७८४ चे वर्गमूळ काय रे? क्षणाचाही विचार न करता तोंडातून उत्तर निघून गेले - २८. आणि तुम्ही डोळ्यासमोर चमकून गेलात.  

मधून मधून गीताई घराच्या चाफ्याच्या फुलांचे फोटो पाठवत असते आणि मी ते निमित्त काढून भूतकाळात जाऊन येतो. शेकड्याने काढलेली फुले. ती काढण्यासाठी बनवून घेतलेल्या त्या सळ्या - ३-४ वेगवेगळ्या लांबीच्या. मग ती दारावर उभे राहून विकलेली फुले. वरून खाली फुले सोडण्यासाठी केलेली ती दोरी आणि पिशवी.. 

अनंत आठवणी. पण आता त्या हव्याहव्याशा वाटतात. तुम्ही आजूबाजूला आहात असे वाटून छान वाटते. 

तुमची आठवण येत राहो आणि आम्हाला आधार मिळत राहो हेच देवाकडे मागणे!!

तुमचा,

मंदार