Friday, January 21, 2011

मृण्मयचे पहिले स्नेहसंमेलन

दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळा सुरु झाली आणि शाळेने पत्र पाठवले की RC-1 चे स्नेहसंमेलन होणार आहे जानेवारीमधे आणि त्याची सविस्तर माहिती नंतर पाठविण्यात येईल. आम्ही जरा विचारात पडलो एव्हढ्याश्या मुलांकडून कशी काय तयारी करून घेणार? आणि ही मुले करणार का? परंतु एक बरे होते सर्व तयारी शाळाच करून घेणार होती.

काही दिवसांनी मृण्मयच्या मित्रांच्या बाबांकडून काही-काही तुकडे कळायला लागले. गाणी आहेत, डान्स आहे, पण टीचरने सगळे "secret" ठेवायला सांगितले आहे. आनंदी गाणे म्हणायला सुरुवात करते आणि अचानक थांबून म्हणते "secret" आहे... काव्या, साहिल आणि मृण्मय घरी काहीच सांगत नव्हते. हळू हळू आम्हाला गाण्यांचे बोल कळायला लागले आणि एक दिवस मृण्मयने पूर्ण गाणे म्हणून दाखवले - "Found a Peanut" तेसुद्धा हावभावांसकट, इतके गोड केले त्याने आणि आमचा इंटरेस्ट वाढायला लागला. नंतर कळले अजून एक गाणे आहे - "Miss Molly Had a Dolly" परंतु पठ्ठ्या अजून जास्त काहीच बोलत नव्हता.

ख्रिसमसच्या सुट्टयांनंतर अजून एक गाणे कळले - "जंगल झाडीत वाघोबा लपले". आता जरा आम्हाला मजा यायला लागली होती आणि आम्ही संमेलनाची ऊत्सुकतेने वाट बघायला लागलो. संमेलन यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार होते आणि तिथेच रंगीत तालीम पण करून घेतली शाळेने. आम्हाला उत्साह चढला होता, पण मृण्मय मात्र neutral होता. आम्हाला जरा काळजी वाटायला लागली होती कि हा ऐन वेळेस जायचे नाही म्हणतो कि काय!!

संमेलन बुधवारी होते (१९-जानेवारी) आणि संमेलनाचा ड्रेस सोमवारी देणार होते. आम्ही जरा शनिवारपासूनच वातावरण निर्मिती करायला सुरुवात केली. दादा आजोबा पण येणार आहेत, मोठ्ठे स्टेज असेल, मजा असते तिथे वगैरे वगैरे.. रविवार तसाच गेला. काळजीत अजून भर म्हणजे एकतर बुधवारी सकाळी लवकर पोचायचे होते नाट्यगृहावर आणि प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या आधी दिवस सुट्टी (शनिवार, रविवार आणि इतर मुलांच्या संमेलनासाठी म्हणून सोमवार मंगळवार). परंतु मृण्मय आता थोडा थोडा उत्साह दाखवायला लागलेला होता, त्यामुळे जरा आम्हालाही हुरुप आला होता. अजूनही आम्हाला नक्की काय काय आहे ह्याचा पत्ता नव्हता. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा बातमी अशी होती - मी गाण्यात आहे (मिस डॉली आणि फाउंड पीनट) आणि बाकिच्यांची बाकिची गाणी आहेत. nothing more... आम्ही प्रयत्न सोडून दिलेला होता आणि शेवटी एकदाचा बुधवार उजाडला...

विविध प्रकारची आमिषे दाखवत आम्ही संमेलनस्थळी वेळेवर (भल्या पहाटे :१५ वा.!!) पोहोचलो. शाळेने दिलेल्या कार्यक्रमपत्रिकेप्रमाणे RC-1 चा कार्यक्रम पहिल्या १५-२० मिनिटांमधेच होणार होता. त्यानंतर, सर्व मुलांना पालकांकडे देण्यात येणार होते. बरीच गर्दी असूनही आम्हाला बऱ्यापैकी पुढच्या सीटस् मिळाल्या. सुदैवाने कार्यक्रम वेळेवर सुरु झाला. सुरुवातीच्या सरस्वतीवंदनानंतर लगेचच RC-1 चा प्रोग्राम सुरु झाला. स्टेजवर "peanuts" ची मॉडेलस् ठेवली होती आणि मुले त्यांच्यामागे उभी होती. Poem सुरु झाली आणि मुलांनी अभिनय करायला सुरुवात केली. चेहेऱ्यावरील भाव फारसे दिसत नव्हते, पण हातवारे आणि हालचाली छान होत होत्या. आम्हाला हे कळत नव्हते कि आम्ही मृण्मयला शोधू कि पोरांचा अभिनय बघू :) शेवटी एव्हढे नक्की झाले की मृण्मय या गाण्यात नव्हता.

त्यानंतर सुरु झाले "Miss Molly Had a Dolly..." तरी पण मृण्मयचा पत्ता नव्हता.. आणि अचानक विंगेतून मुलांची एन्ट्री झाली - डोक्यावर काळी हॅट, गळ्यात स्टेथोस्कोप आणि हातात बॅग.. बॅकग्राउंडला गाणे चालू होते - "The Doctor came with his bag and hat".. आणि त्या चार मुलांमधे मृण्मय पण होता.. टोपी जरा मोठी होत होती पण ओळखू आला :)

गाणे पुढे सरकत होते, आणि अचानक मृण्मयच्या क्षात आले कि त्याने बॅग चुकीच्या जागी ठेवली आहे. सगळे गाणे सोडून त्याने आधी ती बॅग नीट जागी ठेवली आणि मग तेव्हढ्यात डॉक्टरांची बिल द्यायची वेळ झाली. चारही डॉक्टर्स खिशात हात घालून बिल शोधायला लागले - चुकीच्या खिशात :) शेवटी एका टीचरनी त्यांना मदत करून बिल काढून दिले खिशातून :)

गाणे संपले आणि सर्व मुले विंगेत पळाली आणि नवीन गाणे सुरु झाले - "जंगल झाडीत वाघोबा लपले..." काही वाघोबा आणि काही म्हातार्‍या :) गाणे छान झाले. आणि मग टीचरने उरलेल्या सर्व मुला-मुलींना एकत्र आणून काही poems म्हणायला सुरुवात केली आणि काहीजणांनी स्वत:च म्हणायला सुरुवात केली. बर्‍याच तालासुरात म्हटले, जिथे चुकत होते तिथे टीचर्स prompt करून मदत करत होत्या. एकंदरीत मजा आली.

आणि then it was Music Time!! सगळी मुले-मुली स्टेजवर येऊन मस्त नाचायला लागली. आमच्या चिरंजिवांनी स्टेजच्या डाव्या बाजूने एन्ट्री मारली, आणि रमत गमत उजव्या बाजूला येऊन उभा राहीला आणि नाचायला सुरुवात केली. अचानक स्वारी शांत झाली आणि काहीतरी शोधायला लागला, बहुतेक त्याला आठवले असावे की इथेच समोर कुठेतरी आपले आई-बाबा असायला पाहीजेत. परंतु प्रेक्षागृहात अंधार असल्यामुळे त्याला काहीच दिसत नसणार. तेव्हढ्यात कुठल्यातरी टीचरने त्याला खूण केली आणि पोरगं परत नाचायला लागले :)

२-४ मिनिटे झाल्यावर सगळ्यांना स्टेजवरुन खाली उतरवून पालकांकडे परत दिले. आम्ही उरलेला Sr. KG चा कार्यक्रम बघायला सुरुवात केली. काय छान करत होते सगळेजण!! २-३ नाटके आणि २-३ नाच - सर्वच सुंदर झाले!!

इतकी छोटी मुले पण इतक्या धिटाईने स्टेजवर इतके छान काम करू शकतात हे प्रत्यक्षच बघितले पाहीजे... :)

Saturday, January 15, 2011

एक संवाद - मृण्मय बरोबरचा

सकाळची वेळ.

मृण्मय दूध पितो आहे. अचानक त्याचा मूड बदलतो. स्वतः पिण्याच्याऐवजी त्याला माझ्याकडून दूध प्यायची लहर येते. १-२ घोट पिऊन झाल्यावर उत्साह संपुष्टात येतो. मी नुसताच कप हातात धरून कंटाळतो. शेवटी मी त्याला म्हणालो:
मी: तू बस असाच. मी माझी कॉफी संपवतो.
मृण्मय: नको. तू नको पिऊ.
मी: का रे?
मृण्मय: अरे ऽऽऽऽ... तू मला पाज. म्हणजे मी जिंकीन आणि तू हरशील

(म्हणजे माझे दूध आधी संपेल आणि मग तुझी कॉफी)

Smart isn't it? :)
मराठी powered by Lipikaar.com