आज सकाळी नाश्त्याला जाताना एका माणसाला हीर काढताना बघितले आणि मन भूतकाळात गेले....
साधारण वीस-एक वर्ष मागे.
मजा होती. नारळाची झावळी पडली कि ती पळत जावून उचलून मागच्या अंगणात टाकायची - कोणी पळवून नेवू नये म्हणून. आणि मग सुट्टीच्या दिवशी लागायचे कामाला. कोयता घेऊन खाली जायचे, झावळ्यांची पाती काढायची, मग त्याचा एकत्र गट्ठा करून वरती आणून गॅलरीत ठेवायचा. मस्तपैकी चौरंग घेवून बसायचे आणि मग सुरु. हिर काढायला. त्याच्या सुऱ्या वेगळ्या ठेवलेल्या असायच्या - बऱ्याचशा धार गेलेल्या पण हिर निघतील एव्हढी धार असायची.
एक गठ्ठा संपला कि दुसरा. किंवा कंटाळा येईपर्यंत. शेवटी ते सगळे हिर एकत्र करून त्याचा खराटा बनवायचा. बऱ्याचदा तो सुटायचा, पण परत बांधायचा. किंवा मग त्याच्यात मागून लाकडाचा तुकडा खुपसायचा.
मग कधी वेळ झाला नाही आणि पाऊस आला, कि सगळा गिचका व्हायचा तिथे. मग काहीतरी करून ते सगळे साफ करायला लागायचेच. आणि हे करण्यात सगळ्यांचा हातभार. मी, दादा, आई, आजी आणि हो भाऊ आजोबा पण. जमेल तसे चालू असायचे.
आणि हो. झावळीच्या मधल्या भागाचे तुकडे करून ते गच्चीत सुकायला टाकायचे आणि मग कधीतरी दुसऱ्या गॅलरीत बंब पेटायचा - आंघोळीच्या पाण्यासाठी. मग कधीतरी शेजारच्या गोरे ताई तक्रार करायच्या कि धूर खूप होतो म्हणून. मग बंब बंद व्हायचा… काही दिवसांसाठी :)
आणि होळीच्या दिवशी तर खूप काळजी घ्यायला लागायची .. कोणी झावळ्या पळवू नयेत म्हणून.. आईचा डोळ्याला डोळा लागायचा नाही दुपारी. जरा झावळ्यांचा आवाज वाटला कि मागच्या अंगणात डोकावून बघायचे - कोणी झावळी पळवत नाही ना म्हणून …
हिर वापरून धनुष्य बाण बनवायचे आणि जुन्या कॅलेंडरवर नेम धरून मारत बसायचे. त्यातल्या त्यात जाडे हिर शोधून बाजूला ठेवायचे आणि काकांच्या दुकानातून रिकामी रिळे आणून त्याच्यापासून रणगाडा बनवायचा - मेणबत्तीचा तुकडा, लांब रबर आणि हिराचा तो तुकडा!
मग नंतर कधीतरी हे सगळे बंद पडले.…
No comments:
Post a Comment