भल्या पहाटे जाग आली. उठून बाल्कनीत आले तर नुकतेच कुठे फ़ुटायला लागले होते. सूर्य अजून वरती यायचा होता. पक्षांची किलबिल सुरु होती. थंड हवेच्या झुळुकीने मन प्रसन्न झाले. गेल्या कित्येक दिवसात असा अनुभव घेतलाच नव्हता. खाली उतरले तर काय, दवबिंदूनी पाने मोहरून गेली होती, फुले नुकतीच उमलायला लागली होती. "फुलराणी" कविता आठवली:
हिरवे हिरवे गार गालिचे,
हरित तृणांच्या मखमालीचे
त्या सुंदर मखमालीवरती,
फुलराणी हि खेळत होती
तिथेच बसले मग जरा, फुलाकडे बघत. त्या इवल्याशा विश्वात काय काय हालचाली होत असतील याचा विचार करत. एका नव्या जीवाचे या दुनियेत येणे, पण मानवी जन्मापेक्षा संपूर्णपणे भिन्न. आयुष्य किती तर जेमतेम काही तास! पण त्या थोड्याश्या वेळातच काय ते होवून जाणार. एखादयाच्या नशिबी गजरा, तर दुसर्याच्या प्रक्तनात तसेच गळून जमिनीवर पडणे. एखादे देवाच्या मस्तकी पोहोचेल तर एखाद्याच्याच नशिबात भ्रमराची साथसंगत. त्या फुलाला हे सगळे जाणवत असेल का? कि ते पूर्णपणे अनभिज्ञ असेल या सर्व शक्यतांबाबत? कोणास ठावूक!
आणि अचानक माझ्या चेहेर्यावर सूर्याची कोवळी किरणे विसावली आणि माझे डोळे मिटले गेले. त्या एका क्षणात रंगांची कित्येक आवर्तने माझ्या डोळ्यापुढे नाचून गेली आणि शेवटी उरला तो फक्त पिवळा – सोनेरी पिवळा रंग … सूर्याचा रंग.
दव हळूहळू कमी होत चालले होते. एका पानावर एकच टपोरा बिंदू उरला होता. सूर्याच्या किरणांनी तो उजळून निघाला होता, इतक्यात एक वार्याची खुळुक आली आणि त्यासरशी तो मोती खाली पडला.
ते मगाचचे फूल आता पूर्णपणे उमलले होते. येणार्या कुठल्याही प्रसंगाला सामोरे जाण्यास सज्ज! मी ही मग उठले – कामाच्या आठवणीने. परत फिरले – येणार्या कुठल्याही प्रसंगाला सामोरे जाण्यास सज्ज होवून !
No comments:
Post a Comment