माणसाला आयुष्यात नक्की काय हवे असते? पैसा? घर? प्रतिष्ठा? नाही… त्याला हवी असते फक्त सुखाची झोप. रात्रभर छान झोप झाली की तो कसा छान ताजातवाना होतो. अलीकडे झोपच मिळेनाशी झाली आहे. सतत डोक्याला कसली ना कसली तरी काळजी. आज काय तर काम पूर्ण झाले नाही, उद्या काय तर नवीन घर घ्यायचे आहे त्यासाठी जुळवाजुळव करायची आहे. परवा काय तर मुले अभ्यास करत नाहीत. बायको भांडते, तिचे सासू-सासर्यांशी पटत नाही, बाबा वयाचा विचार न करता काम उकरत बसतात आणि मग त्रास होतो … एक ना दोन. आता तर वाटू लागले आहे कि चिंता करायची सवयच लागली आहे. काही काळजीची गोष्ट नसेल तर आपण काही विसरलो तर नाही ना म्हणून काळजी सुरु होते.
हां, तर झोप … लहानपणी काय सुख होते. गादीवर पडल्यापडल्या झोप लागायची. सरळ सकाळीच जाग. पहाटे पहाटे तर छान स्वप्ने पडायची. आता स्वप्नं रात्रभर पडतात, दर अर्ध्या तासाला जाग येते. मग कुठले कुठले विचार डोक्यात चालू. रात्री झोप झाली नाही म्हणून दिवस वाईट, आणि दिवस वाईट म्हणून परत झोप नाही … चक्र थांबतच नाही.
सुखाच्या मागे धावता-धावता, पैशाच्या मागे लागलो.
चार पैशाच्यामागे लाखमोलाची झोप गमावली
आता रात्री फक्त निद्रादेवीची आराधना करायची असते,
या कुशीवरून त्या कुशीवर, परत या कुशीवर वळायचे असते
कुठेतरी हे थांबलेच पाहीजे.. थांबलेच पाहीजे.
No comments:
Post a Comment