कथा – आवृत्ती पहिली
एकदा एक ऋषी नदीवर स्नानास गेले होते. स्नान झाल्यावर सूर्याला अर्घ्य देण्यासाठी पाणी घ्यायला ते खाली वाकले तर त्यांना एक विंचू पाण्यात पडलेला दिसला. तो विंचू पाण्यातून बाहेर पडण्यासाठी धडपड करत होता. परंतु ते काही त्याला जमत नव्हते. ऋषींना त्याची दया आली. त्यांनी त्या विंचवाला ओंजळीत उचलून घेतले व ते काठावर येण्यासाठी वळले तोच त्या विंचवाने जिवाच्या भीतीने त्यांच्या हाताचा चावा घेतला. प्रतिक्षिप्त क्रियेने त्यांचा हातातून विंचू परत पाण्यात पडला. ऋषींनी परत त्या विंचवाला उचलेले व परत काठावर येऊ लागले. परत त्या विंचवाने हाताचा चावा घेतला. असे ३-४ वेळा तरी झाले. एव्हाना ऋषींचा हात रक्तबंबाळ झाला होता.
हा सर्व प्रकार एक पांथस्थ बघत होता. त्याला आश्चर्य वाटले. विंचवाने एव्हढे चावे घेतले तरी ऋषी परत परत असे का करत आहेत ते त्याला कळेना. त्याने त्या ऋषींना विचारले, "गुरुदेव, त्या विंचवाने आपला हात एव्हढा रक्तबंबाळ केला तरी आपण त्याला वाचवायचा एव्हढा अट्टहास का करत आहात?". ऋषी उत्तरलेः "चावा घेणे हा विंचवाचा धर्म आहे. दुसर्याचा जीव वाचविणे हा माझा धर्म आहे. जीव जात असताना पण तो त्याचा धर्म सोडत नाही तर मग मी का माझा धर्म सोडू?"
कथा – आवृत्ती दुसरी
एकदा एक ऋषी नदीवर स्नानास गेले होते. स्नान झाल्यावर सूर्याला अर्घ्य देण्यासाठी पाणी घ्यायला ते खाली वाकले तर त्यांना एक विंचू पाण्यात पडलेला दिसला. तो विंचू पाण्यातून बाहेर पडण्यासाठी धडपड करत होता. परंतु ते काही त्याला जमत नव्हते. ऋषींना त्याची दया आली. त्यांनी त्या विंचवाला ओंजळीत उचलून घेतले व ते काठावर येण्यासाठी वळले तोच त्या विंचवाने जिवाच्या भीतीने त्यांच्या हाताचा चावा घेतला. प्रतिक्षिप्त क्रियेने त्यांचा हातातून विंचू परत पाण्यात पडला. ऋषी नदीकाठी परत आले. आपला कमंडलू उचलला. परत पाण्यात गेले, विंचवाला कमंडलूत उचलले व जमिनीवर आणून सोडले.
बोध:
दोन्ही गोष्टींमधे दोन्ही ऋषींनी आपला धर्म सोडला नाही. परंतु पहिल्या ऋषींनी धर्म आंधळेपणाने आचरणात आणला. धर्म असे कुठेच सांगत नाही कि दुसर्याचा जीव वाचवताना स्वतःला त्रास झालाच पाहीजे. हे दुसर्या ऋषीने जाणले होते व तेच आचरणात आणले.
No comments:
Post a Comment