Saturday, September 26, 2020

ते सात दिवस

दादा गेले. पंधरा दिवस झाले त्याला आता.

जसे डॉक्टरांनी दादांची COVID-19 ची तपासणी करायचा सल्ला दिला, मी आणि मेघना जरा धास्तावलोच होतो. दादांची सगळी परिस्थिती बघता जर टेस्ट पॉझिटिव्ह आली असती तर बऱ्याच गोष्टी अवघड होत्या. मी ताबडतोब माझ्या तिन्ही बहिणींना सांगितले. आम्ही सगळे आशा करत होतो कि  तसे काही नाही होणार. दादांना तापाव्यतिरिक्त काहीही लक्षणे नसल्याने डॉक्टरांना पण साध्या तापाचीच शक्यता वाटत होती. सकाळी ११ च्या सुमारास तपासणी साठी सॅम्पल घेऊन गेले. संध्याकाळी साधारण १० च्या सुमारास result येईल असे सांगितले होते. जीव खालीवर होत होता. शेवटी १०:२० ला डॉक्टरांचा message आला कि पॉझिटिव्ह आहे म्हणून. त्यांनी लगेचच सांगितले कि दादांना हॉस्पिटल मध्ये दाखल करावे लागेल ते सुद्धा ICU + Oxygen + ventilator ची सोया असेल असे.

पुण्यातील परिस्थिती खूपच वाईट होती (किंबहुना अजूनही आहे). त्यामुळे काळजीत अजूनच भर पडली. परंतु आम्ही ताबडतोब हालचाल करायला सुरुवात केली. बहिणींबरोबर zoom कॉल करून सगळ्यांना कल्पना दिली आणि सगळे हात कामाला लागले - हात म्हणण्यापेक्षा मोबाईल !! जेवढे हॉस्पिटलचे क्रमांक मिळतील तिकडे फोन करून चौकशी सुरु झाली. फक्त नकारघंटाच ऐकू येत होती. काहींनी दुसऱ्या दिवशी चौकशी करायला सांगितले. आंतरजालावर असलेली माहिती अद्ययावत नव्हती. त्यामुळे अजूनच अडचण येत होती.

आम्ही सगळे मोठे लोक आमच्या परीने प्रयत्न करत असताना लहानांनी हार मानलेली नव्हती. मृण्मय आणि माझ्या भाचे कंपनीने एक google sheet तयार करून सगळा data नोंदवायला सुरुवात केली - हॉस्पिटल ची नावे, तिथले क्रमांक, ICU ची उपलब्धता इ. प्रत्येकाने आपले व्यावसायिक network मध्ये पण तपासायला सुरुवात झाली. रात्री १२:३० च्या सुमारास एक गोष्ट नक्की झाली - कि आता जे काही व्हायचे ते सकाळीच होईल.

देव कृपेने दादांना बाकी काही त्रास होत नव्हता. घरात oxygen cylinder होता त्यामुळे थोडी काळजी कमी होती.

आठ तारखेला सकाळी परत सुरुवात केली. आता आम्ही जरा जास्त संघटितपणे कामास सुरुवात केली. प्रत्येकाला हॉस्पिटल्स वाटून दिली आणि सगळीकडे पाठपुरावा चालू केला. माझ्या एका डॉक्टर मित्राने रुबी हॉल मध्ये प्रयत्न करतो सांगितले, गीताई च्या मैत्रिणीने कोथरूड मधील देवयानी हॉस्पिटलची माहिती दिली. मेघनाच्या नेटवर्क मधून संचेती हॉस्पटिल आले. सह्याद्री हॉस्पिटल पण आमच्या उपलब्ध लिस्टवर आले. रुबी हॉल मिळाला असता तर खूप चांगले झाले असते. माझा मित्रच तिथे होता आणि त्याला दादांची मेडिकल हिस्टरी माहित होती. पण दुर्दैवाने तसे होणे नव्हते.

गीताई आणि तिच्या मैत्रिणीबरोबर बोलून मी देवयानी हॉस्पिटल बद्दल माहिती घेतली. सगळे चांगले वाटले आणि सगळ्यांनी मिळून दादांना तिथे दाखल करायचा निर्णय घेतला. शेवटी दुपारी ३:३० च्या सुमारास दादांची ऍडमिशन झाली आणि उपचारांना सुरुवात झाली.

अचानक संध्याकाळी हॉस्पिटल मधून फोन - दादांना remidesivir द्यायचे आहे. असे कळले कि त्या औषधाच्या कमी उपलब्धतेमुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी ते देणे आवश्यक आहे ते सुद्धा आधार कार्ड ची कॉपी देऊन!! ताबडतोब मेघनाच्या बहिणीला पाठवले. योगायोगाने ते औषध हॉस्पिटलच्या दुकानातच उपलब्ध होते आणि पुढची पळापळ वाचली.

कोणालाच भेटायला जायची परवानगी नसल्याने आम्ही डॉक्टरांच्या कॉलची चातकासारखी वाट बघायचो. पहिले दोन्ही-तिन्ही दिवस दादांची तब्ब्येत व्यवस्थित होती. आम्हा सगळ्यांचे रोज झूम कॉल्स सुरु होते. अजून काही करता येईल का याची चाचपणी चालू असायची. फारसे काही करणे शक्य नव्हते. तरी पण एक दिवस गीताई आणि माझा भाऊ मनोज दोघेही हॉस्पिटलला गेले आणि तिथल्या मुख्य डॉक्टरांशी बोलले. रेसिडेंट डॉक्टरच्या परवानगीने दादांशी एक व्हिडिओ कॉल पण केला. तोच दादांचा बाहेरच्या जगाशी शेवटचा संपर्क ठरला.   

शनिवार सकाळचा डॉक्टरांचा रिपोर्ट फारसा उत्साहवर्धक नव्हता आणि दुपारी अचानक परिस्थिती खालावल्याचा डॉक्टरांचा फोन आला. काळजात चर्र झाले. ताबडतोब झूम वरून गीताई आणि मनोजने तिकडे जाण्याचे ठरले. परंतु ते तिकडे पोहोचायच्या आधीच सगळे संपलेले होते!

सगळ्यांवर आभाळच कोसळले. तुम्ही कितीही मनाची तयारी केलेली असली तरी अशा वेळी तुम्हाला कळते कि कितीही तयारी केली तरी ती कमीच असते. त्यात भर म्हणून कि काय आम्हाला भयाण वास्तवाची जाणीव झाली. COVID रुग्ण असल्याने त्यांना घरी आणता येणार नव्हते कि त्यांचे अंत्यविधी करता येणार होते. एवढेच काय त्यांचे अंत्यदर्शन पण दुरूनच!! अत्यंत असहाय परिस्थिती होती ती. पण दैवापुढे कोणाचे काही चालते का?

सगळे करून कसाबसा घरी परतलो.

आज १५ दिवस झाले त्या सगळ्याला. दादा नसण्याची हळू हळू सवय होत आहे. कितीही वाटले तरी आयुष्य थांबत नाही. आणि दादांनाही तसे आवडणार नाही. त्यांनी स्वतः असाच धक्का पचवला होता - २१ वर्षांपूर्वी. आणि त्यानंतरही त्यांनी निराश न होता आयुष्य छानपणे जगायला सुरुवात केली होती. त्यांची त्यांच्या मुला-लेकरांकडूनही हीच अपेक्षा असणार.. नाही का?

Monday, September 21, 2020

दादा गेले...

दादा गेले ! 

पंच्याऐंशी वर्ष पूर्ण करण्यास अवघे काही दिवस असतानाच त्यांना अचानक बोलावणे आले. आणि कुठलाही मोह न ठेवता त्यांनी पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.

गेले चार एक वर्षे दादांची झुंज चालू होती. COPD (chronic obstructive pulmonary disease) ने त्यांना ग्रासले होते. जवळजवळ पूर्ण वेळ त्यांना प्राणवायू चे उपकरण लावून ठेवावे लागायचे. तसा त्रासच तो. सतत नाकात नळी. साधे उठून बाथरूम ला जायचे म्हटले तरी लक्षात ठेवून ती नळी काढायची आणि परत आल्यावर आठवणीने लावायची. मधून मधून pulse oxymeter वर saturation बघून नोंद करून ठेवायची. 

सगळे त्यांनी शांतपणे सहन केले. कुठे कधी तक्रारीचा सूर नाही कि गाऱ्हाणे नाही.  त्यांनी स्वतःचा दिनक्रम  ठरवून घेतलेला होता आणि त्याबरहुकुम त्यांचे सगळे चालायचे. त्यात बदल करायचा हक्क फक्त त्यांचा (आणि बहुतेक माईचा - बऱ्याच वेळा मी तिच्याकडून त्यांना निरोप द्यायचो 😜) त्यांच्या सिरीयल च्या वेळेप्रमाणे त्यांची कामे चालायची. इतके कि त्यांनी मोबाईलवर गाजर लावून ठेवलेला असायचा कि चॅनेल कधी बदलायचा ते. सिरिअलच्या कथेत इतके ते गुंतून जायचे कि काही काही वेळा मी जाऊन चेक करायचो कि हे कोणाशी एवढे बोलत आहेत!! देवांची पूजा असो कि सकाळचे प्रातर्विधी, व्यायाम म्हणून फेऱ्या असोत कि दुपारची सक्तीची झोप, सगळ्याचा दिनक्रम व्यवस्थित आखून घेतलेला होता. 

या सगळ्यामध्ये त्यांनी नवीन तंत्रज्ञान पण आत्मसात केले होते. मोबाईल वर  WhatsApp, फेसबुक सगळं वापरायचे. कित्येकांशी त्यांनी WA च्या माध्यमातून दररोजचा संबंध ठेवलेला होता. COPD मुळे घरात बंदिस्त झाल्यामुळे मोबाईल हि त्यांची जगाशी संपर्क ठेवण्याची गुरुकिल्ली होती आणि त्यांनी ती लीलया आत्मसात केली होती. त्यांच्या कित्येक परिचितांच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट दादांच्या "सुप्रभात" आणि "शुभ रजनी" या संदेशाने होत असे. जर कधी कोणी reply नाही केला तर दोनेक दिवसात दादांचा त्यांना फोन जायचा चेक करायला कि सगळे ठीक आहे ना म्हणून. सगळ्यांना प्रेमाने बांधून ठेवले होते त्यांनी..

गेले आता... साडेचार वर्षे झुंजून, आणि तसे झुंजताना पण जगायचं कसं हे शिकवून पुढच्या प्रवासाला गेले. दुर्दैव एवढेच कि मुले, जावई, सून, नातवंडं, पंतवंडं, आते/मामे भावंडं, बहिणी एवढा मोठा परिवार असूनही शेवटच्या क्षणी आम्हापैकी कोणीच त्यांच्याजवळ नव्हतो. सर्वांना धरून राहणारे दादा शेवटच्या क्षणी मात्र एकटेच होते. नियती अजब असते म्हणतात ती अशी. 

परंतु एक समाधान नक्की आहे - सर्व प्रकारचे आघात पचवूनही दादा शेवटी सुखी आणि समाधानी होते.