Showing posts with label गद्य. Show all posts
Showing posts with label गद्य. Show all posts

Sunday, October 11, 2020

हे जीवन सुंदर आहे!

 काल रात्री एक इंग्रजी चित्रपट बघत होतो - "The Intern". एक सेवानिवृत्त व्यक्ती (बेन)  एका e-commerce संस्थेत शिकाऊ उमेदवार म्हणून कामास सुरुवात करते. कथा खूप सुंदर आहे. त्याच्या सुरुवातीस त्याचे मनोगत चालू असते. पत्नीच्या मृत्यूनंतर एकाकी झालेल्या बेनचे आयुष्य बदलून जाते. वयोमानानुसार बरेचसे समवयस्क मित्र, नातेवाईक एक एक करून निघून जायला लागतात आणि त्याचा प्रभाव जिवंत व्यक्तींवर होत असतो.

ते बघता बघता मला दादांची आठवण झाली. पंच्याऐशी वर्षे अत्यंत सुंदरपणे आयुष्य जगले. एकवीस वर्षांपूर्वी आई गेली. तेव्हापासून आत्तापर्यंत त्यांनी बरेच काही बघितले, बरेच काही पचवले आणि बरेच काही शिकले पण. गेल्या काही वर्षात त्यांचे बरेचसे मित्र एक-एक करून सोडून गेले. पण दादांनी कधी कच नाही खाल्ली. 

विनायक नवाथे - दादांचे अत्यंत जिवलग मित्र. दोघांचे ऑफिस एकच. रहायचे जवळच. त्यामुळे रोजचे जाणे येणे. सकाळची दुसरी कॉफी एकमेकांच्या घरी. पुढे काका त्यांच्या दुसऱ्या घरी राहायला गेले त्यामुळे भेटी कमी झाल्या, पण फोन चालू असायचे. त्यानंतर २०१६ मध्ये दादांना COPD आहे असे निदान झाले. त्यामुळे ते घरातच स्थानबद्ध. जरा कठीणच होते ते दादांना. सतत काहीतरी करत राहायची सवय असलेल्या माणसाला एका जागी जखडून ठेवले कि कसे होईल.. तशीच काहीशी त्यांची अवस्था झाली होती. ज्यावेळेस डॉ. नी त्यांना सांगितले कि आता दिवसातला बराच वेळ Oxygen लावून ठेवायला लागेल तेव्हा ते बरेचसे हलले होते. पण त्यांची जिद्द जिवंत होती. सुरुवातीच्या त्रासानंतर त्यांनी बदललेली परिस्थिती स्वीकारली. स्वतःचा एक दिनक्रम आखून घेतला होता. त्यात TV बरोबरच देवाची पूजा आणि मित्र/नातेवाईकांना फोन हे पण होते. 



त्या दिवशी कामाचा दिवस होता, मी ऑफिस मध्ये होतो. अचानक नवाथे काकांच्या मुलाचा फोन आला. काळजात जरा शंका आली आणि दुर्दैवाने ती खरी पण झाली.. नवाथे काका वारले होते. तसे अचानकच. फोन ठेवला. आणि मला आभाळ कोसळल्यासारखे झाले. नवाथेकाका गेले .. आता हे दादांना कसे सांगू? त्यांना हा धक्का सहन होईल का? नुकतेच ते जरा स्थिरस्थावर होत होते. जरासा धक्का सुद्धा त्यांना सहन होईल असे मला वाटलेच नाही. चक्क रडायला लागलो मी .. ऑफिसमध्ये.. सहकाऱ्यांच्या मदतीने कसाबसा सांभाळून मी घरी यायला निघालो. डोक्यात काहूर माजले होते. ताई, माई गीताई सगळ्यांशी बोललो.. कसे सांगू दादांना. सांगणे तर आवश्यक होते. डॉक्टरांशी पण बोललो.. जर काही झाले तर काय करायचे वगैरे.

मला असे वाटते कि माई/किंवा गीताईला मी बोलावून घेतले होते. संध्याकाळी दादांची कॉफी झाल्यावर हिय्या करून सांगितले. धक्का बसला दादांना.. पण सावरले हळूहळू .. म्हणाले - ठीक आहे.. कधीतरी होणारच आहे.. ॐ शांति।

त्यानंतर असे बरेच प्रसंग आले. प्रत्येकवेळी मला टेन्शन यायचे. परंतु दादांनी सगळे धक्के पचवले. या सगळ्यात त्यांना त्यांच्या दिनक्रमाने खूप आधार दिला असे मला वाटते. नकारात्मक विचारांना थारा देणे त्यांना मान्यच नव्हते जणू. उरलेले आयुष्य मस्तपणे जगायचे, खाणे, TV बघणे, नातवंडे, पंतवंडे सगळ्यांचे कौतुक करणे या सगळ्यात त्यांनी स्वतःला रमवून घेतले होते.

गेल्या ४ वर्षात अनेक वाईट बातम्या ऐकूनही प्रत्येक वेळेस ते सावरायचे आणि सकारात्मकतेने परत दिनक्रम चालू ठेवायचे.

हे जीवन सुंदर आहे.. दादा ते चांगलेच जाणून होते आणि स्वतः जगत होते आणि त्यांचा हा दृष्टिकोन आम्हाला आयुष्यभर प्रेरणा देत राहील.                          

Tuesday, November 1, 2011

बोधकथा – १


कथा – आवृत्ती पहिली
एकदा एक ऋषी नदीवर स्नानास गेले होते. स्नान झाल्यावर सूर्याला अर्घ्य देण्यासाठी पाणी घ्यायला ते खाली वाकले तर त्यांना एक विंचू पाण्यात पडलेला दिसला. तो विंचू पाण्यातून बाहेर पडण्यासाठी धडपड करत होता. परंतु ते काही त्याला जमत नव्हते. ऋषींना त्याची दया आली. त्यांनी त्या विंचवाला ओंजळीत उचलून घेतले व ते काठावर येण्यासाठी वळले तोच त्या विंचवाने जिवाच्या भीतीने त्यांच्या हाताचा चावा घेतला. प्रतिक्षिप्त क्रियेने त्यांचा हातातून विंचू परत पाण्यात पडला. ऋषींनी परत त्या विंचवाला उचलेले व परत काठावर येऊ लागले. परत त्या विंचवाने हाताचा चावा घेतला. असे ३-४ वेळा तरी झाले. एव्हाना ऋषींचा हात रक्तबंबाळ झाला होता.
हा सर्व प्रकार एक पांथस्थ बघत होता. त्याला आश्चर्य वाटले. विंचवाने एव्हढे चावे घेतले तरी ऋषी परत परत असे का करत आहेत ते त्याला कळेना. त्याने त्या ऋषींना विचारले, "गुरुदेव, त्या विंचवाने आपला हात एव्हढा रक्तबंबाळ केला तरी आपण त्याला वाचवायचा एव्हढा अट्टहास का करत आहात?". ऋषी उत्तरलेः "चावा घेणे हा विंचवाचा धर्म आहे. दुसर्‍याचा जीव वाचविणे हा माझा धर्म आहे. जीव जात असताना पण तो त्याचा धर्म सोडत नाही तर मग मी का माझा धर्म सोडू?"

कथा – आवृत्ती दुसरी
एकदा एक ऋषी नदीवर स्नानास गेले होते. स्नान झाल्यावर सूर्याला अर्घ्य देण्यासाठी पाणी घ्यायला ते खाली वाकले तर त्यांना एक विंचू पाण्यात पडलेला दिसला. तो विंचू पाण्यातून बाहेर पडण्यासाठी धडपड करत होता. परंतु ते काही त्याला जमत नव्हते. ऋषींना त्याची दया आली. त्यांनी त्या विंचवाला ओंजळीत उचलून घेतले व ते काठावर येण्यासाठी वळले तोच त्या विंचवाने जिवाच्या भीतीने त्यांच्या हाताचा चावा घेतला. प्रतिक्षिप्त क्रियेने त्यांचा हातातून विंचू परत पाण्यात पडला. ऋषी नदीकाठी परत आले. आपला कमंडलू उचलला. परत पाण्यात गेले, विंचवाला कमंडलूत उचलले व जमिनीवर आणून सोडले.

बोध:
दोन्ही गोष्टींमधे दोन्ही ऋषींनी आपला धर्म सोडला नाही. परंतु पहिल्या ऋषींनी धर्म आंधळेपणाने आचरणात आणला. धर्म असे कुठेच सांगत नाही कि दुसर्‍याचा जीव वाचवताना स्वतःला त्रास झालाच पाहीजे. हे दुसर्‍या ऋषीने जाणले होते व तेच आचरणात आणले.

Sunday, October 30, 2011

संवाद


ती

लग्नाला उणे-पुरे वर्ष नाही झाले तोच यांच्यात बदल व्हायला लागला आहे. हल्ली मला फारसा वेळ देत नाहीत हे. पुर्वी कसे तासन्‌ तास बोलत बसायचो, वेळ कमी पडायचा. बोलायला विषय नाही असे कधी झालेच नाही. हा नाही, तर तो विषय असायचाच. कधी माझ्या मित्र-मैत्रिणी, तर कधी त्याचा गिर्यारोहणाचा ग्रुप. माझ्या नाटकातल्या मजा, तर त्याच्या ट्रेकिंगमधले अनुभव. आई-आप्पांची होणारी मजा आणि माझ्या नाटकांमुळे ममा-पप्पांना वाटणारी काळजी. कितीतरी वेळ बोलत बसायचो. पण आता ते नाही. मोठ्या मुष्कीलीने कशीबशी १५-२० मिनिटे मिळतात रात्री झोपायच्या आधी. तेही स्वारी दमलेली नसेल तर. नाहीतर आहेच दुसर्‍या दिवसाची वाट बघणे. काल पण असेच झाले. मला नवीन नाटक मिळते आहे. त्याच्याबद्दल बोलायचे होते. तर स्वारी आली दमून. त्यात कंपनीत चिडचिड झालेली होती. हाताखालचे लोकं कामं करत नाहीत आणि मग घेतात डोक्यात राख घालून. घरी बायको आहे, तिलाही वेळ दिला पाहीजे, तिच्याशी बोलले पाहीजे वगैरे काही नाही. जरा भाजीला तिखट जास्त काय झाले तर लगेच भाजी टाकून दिली. काही बोलले पण नाहीत तसेच आडवे झाले. दोन शब्द पण बोलले नाहीत. सकाळी उठून काही समजायच्या आत पोहोचले पण ऑफीसमधे. आता आज परत असेच होईल. मग मी नव्या नाटकाबद्दल कधी बोलू यांच्याशी?

तो

आज काल जरा चिडचिडच होते माझी हिच्यावर. कंपनीतला सगळा राग तिच्यावर निघतो. तिला मी घरी आल्यावर माझ्याशी खूप बोलायचे असते. मी पूर्वीसारखा तिच्याशी बोलत नाही ही तिची तक्रार काही फारशी चुकीची आहे अशातला भाग नाही, पण मी तरी काय करू? हल्ली फारसा वेळच मिळत नाही इतर काही करायला. आणि कंपनीतल्या गोष्टींमधे तिला ईंटरेस्ट नसतो. मग मी बोलणार तरी कशावर. ट्रेकींग पण हल्ली बंद झाले आहे. त्यामुळे बदल पण काहीच होत नाही. आता हे हातातले प्रोजेक्ट पूर्ण झाले कि तिला मस्त कुठेतरी बाहेर घेऊन जायचा विचार आहे. मस्त सरप्राईज होईल तिला. काल रात्री त्याच विचारात होतो. वेगवेगळी ठिकाणे, किती दिवस, कधी – हेच सगळे डोक्यात चालू होते. त्यात ती नव्या नाटकाबद्दल बोलत होती. म्हणजे मला ही ट्रिप तालमी चालू व्हायच्या आत करायला पाहीजे. म्हणजे प्रोजेक्ट पण जरासे आधीच संपवले पाहीजे. त्याच नादात आज सकाळी लवकर कंपनीत जायचा विचार पक्का केला. जेवण करून लगेच झोपलो आणि भल्या पहाटे ऑफीसला पोहोचलो. पण त्या गडबडीत तिच्याशी नाटकाबद्दल बोलायचे राहूनच गेले. आता आज मात्र बोललेच पाहीजे.

टीप: ही संकल्पना श्री. सुधीर गाडगीळ यांच्या "शब्द" या "चतुरा" मासिकातील लेखमालेवरून घेतली आहे.

Wednesday, October 26, 2011

एक सकाळ


भल्या पहाटे जाग आली. उठून बाल्कनीत आले तर नुकतेच कुठे फ़ुटायला लागले होते. सूर्य अजून वरती यायचा होता. पक्षांची किलबिल सुरु होती. थंड हवेच्या झुळुकीने मन प्रसन्न झाले. गेल्या कित्येक दिवसात असा अनुभव घेतलाच नव्हता. खाली उतरले तर काय, दवबिंदूनी पाने मोहरून गेली होती, फुले नुकतीच उमलायला लागली होती. "फुलराणी" कविता आठवली:

हिरवे हिरवे गार गालिचे,
हरित तृणांच्या मखमालीचे
त्या सुंदर मखमालीवरती,
फुलराणी हि खेळत होती

तिथेच बसले मग जरा, फुलाकडे बघत. त्या इवल्याशा विश्वात काय काय हालचाली होत असतील याचा विचार करत. एका नव्या जीवाचे या दुनियेत येणे, पण मानवी जन्मापेक्षा संपूर्णपणे भिन्न. आयुष्य किती तर जेमतेम काही तास! पण त्या थोड्याश्या वेळातच काय ते होवून जाणार. एखादयाच्या नशिबी गजरा, तर दुस‍र्याच्या प्रक्तनात तसेच गळून जमिनीवर पडणे. एखादे देवाच्या मस्तकी पोहोचेल तर एखाद्याच्याच नशिबात भ्रमराची साथसंगत. त्या फुलाला हे सगळे जाणवत असेल का? कि ते पूर्णपणे अनभिज्ञ असेल या सर्व शक्यतांबाबत? कोणास ठावूक!

आणि अचानक माझ्या चेहेर्‍यावर सूर्याची कोवळी किरणे विसावली आणि माझे डोळे मिटले गेले. त्या एका क्षणात रंगांची कित्येक आवर्तने माझ्या डोळ्यापुढे नाचून गेली आणि शेवटी उरला तो फक्त पिवळा – सोनेरी पिवळा रंग …  सूर्याचा रंग.

दव हळूहळू कमी होत चालले होते. एका पानावर एकच टपोरा बिंदू उरला होता. सूर्याच्या किरणांनी तो उजळून निघाला होता, इतक्यात एक वार्‍याची खुळुक आली आणि त्यासरशी तो मोती खाली पडला.

ते मगाचचे फूल आता पूर्णपणे उमलले होते. येणार्‍या कुठल्याही प्रसंगाला सामोरे जाण्यास सज्ज! मी ही मग उठले – कामाच्या आठवणीने. परत फिरले – येणार्‍या कुठल्याही प्रसंगाला सामोरे जाण्यास सज्ज होवून !