Sunday, September 12, 2021

आठवणींची वर्षपूर्ती

ती. दादा,  

आज १२ सप्टेंबर २०२१. मनावर कायमचा कोरला गेलेला दिवस. याच दिवशी तुम्ही जगाचा आणि आम्हा सर्वांचा निरोप घेतला होता. 

त्या दिवसापासून एकही दिवस असा गेला नाही कि तुमची आठवण नाही आली. सकाळच्या कॉफीपासून रात्रीच्या "good night" पर्यंत. दिनचर्येचा प्रत्येक घटकेला काही ना काही मनाला स्पर्श करून जाते. कधी एखादी रम्य आठवण, कधी झालेले भांडण, कधी झालेला संवाद तर कधी जाहले वाद. सगळे खर्रकन डोळ्यासमोरून सरकते.

कॉफीसाठी कप्स घेताना, कॉफी मध्ये साखर घालताना हमखास तुमची आठवण होते दादा. जेवणाचे ताट लावताना तुमच्या त्या विशिष्ट वाट्या, ताटल्या. तुमच्या खोलीतून येणारा TV चा आवाज आणि तुमचे ते TV सिरीयल मधल्या पात्रांशी बोलणे. रोजच्या रोज देवांची पूजा, वेळच्या वेळी फेऱ्या मारायच्या. 

बाणेर च्या घरी आल्यापासून तुम्ही नेहेमी घरीच असायचात आणि त्यामुळे बाहेर पडताना तुम्हाला सांगून जायचो आम्ही सगळे. पण आता घराला कुलूप लावावे लागते. "आम्ही जवळच जात आहोत, काही वाटले तर लगेच फोन करा. १० मिनिटात पोचू आम्ही" असे सांगायला त्या खोलीत आता कोणी नसते !!

कितीतरी आठवणी..

एखादी क्वचित कधीतरी लागणारी वस्तू बरोबर जागी सापडली कि तुमची आठवण होते. "वस्तूला जागा आणि जागेला वस्तू" हे सतत लहानपणापासून कानावर पडलेले. परवा एका औषधावरचे बारीक प्रिंट वाचायचे होते. जराही विचार न करायला लागत मी तो ड्रॉवर उघडला आणि तुमचे भिंग तिथे होते. व्यवस्थित बॉक्स मध्ये घालून ठेवलेले. नकळत तुम्ही डोळ्यासमोर तरळून गेलात.

परवा "आपला मानूस" बघताना वारंवार तुमची आठवण येत होती. दु:खाने नाही तर समाधानाने. आपल्यात कितीही वाद झाले तरी शेवटी आपण त्यावर तोडगा शोधायचो - कधी ताई/माई/गीताईची मदत घेऊन तर कधी आपला आपणच. हक्काने मला तुम्ही तुमची कामे सांगायचात आणि कौतुक पण करायचात. तुम्ही गेल्यानंतर खोली आवरताना काय सापडले असेल तर माझे visiting card - तुम्ही कौतुकाने मागून घेतले होते. असेच माझे आणि मेघनाचे पर्सिस्टन्ट चे आणि माझे IMR चे पण कार्ड तुम्ही कुठेतरी नीट ठेवलेले असणार आहे. सापडेल कधीतरी.

दर महिन्याचा हिशोब लिहिताना आपली लहानपणाची हिशोबाची वही आठवते. जमाखर्च कधी जुळला नाही तरी तो लिहून ठेवायचात तुम्ही. ती सवय मी सहजरित्या उचलली. मग बंगलोर ला एकटा राहत असताना खर्चाची कधी चिंता वाटली नाही. कारण किती कमावतो आहोत आणि किती खर्च करू शकतो याचे गणित व्यवस्थित बसले तो जमाखर्च लिहायच्या सवयीमुळे. आत्तासुद्धा कुठलीही परस्थिती असली तरी मला पक्के माहित असते आर्थिक गणित कसे आहे माझे ते. मनातल्या मनात तुम्हाला नमस्कार केल्याशिवाय राहत नाही मी.

या वर्षी गणपतीला तुम्ही नव्हतात. आरत्या नेहेमीपेक्षा जास्त वेळा चुकल्या पण दुरुस्त करायला तुम्ही नव्हतात. खूप वेळा तुमच्या नेहेमीच्या जागेकडे वळून बघायचा मोह झाला पण धीर झाला नाही, कारण माहित होते, तुम्ही तिथे नाही आहात.

दादा, आई मला फारशी आठवत नाही. खूप वर्षे झाली तिला जाऊन. पण तुमचा सहवास आत्तापर्यंत लाभला ह्याचे मला खूप समाधान वाटते. आजही कधी कधी वाटते मी तुम्हाला अजून एक सहा महिने या करोना पासून वाचवायला पाहिजे होते, कदाचित आज लसवंत होवून तुम्ही उकडीच्या मोदकांचा आनंद घेतला असतात. पण ते होणे नव्हते. "ईश्वरेच्छा बलियसी" हे तुमचे शेवटचे शब्द आठवतो आणि स्वतःला सावरून घेतो. 


आठवणी येणे थांबणार नाही. त्यातच तुमचे यश आहे. सुरुवातीला खूप रडायला यायचे. पण आता खरे सांगायचे तर तुमची आठवण झाली कि छान वाटते. क्वचित डोळ्यात पाणी येते, पण बऱ्याचदा आनंदच होतो. 

एकच मागणे आहे दादा - देहरूपी नसलात तरी स्मृतीरूपी तुम्ही मला आजूबाजूला सापडत रहा.

तुमचा,

मंदार