Saturday, November 19, 2011

सत्या

सोनी मिक्स चॅनेलवर गाणी लागली होती.
गीला गीला पानी..

मंदार: अरे, सत्या ९०' मधला आहे??
मेघना: असे दिसते आहे...
मृण्मय: बाबा तू काय म्हणालास?
मंदार: अरे, ते गाणे ज्या पिक्चरमधले आहे ना..
मृण्मय: कुठल्या पिक्चरमधले आहे?
मंदार: "सत्या"...
मृण्मय: सत्या? मग "अठ्ठया" कुठाय?

:)

Tuesday, November 15, 2011

लाकूडतोड्याच्या मुलाची गोष्ट

बहुतेक सगळ्यांना लाकूडतोड्याची गोष्ट माहीत आहेच. परंतु, त्याच्या शेवटी तो लाकूडतोड्या त्या सोन्याच्या आणि चांदीच्या कुर्‍हाडींचे करतो काय? देवीने बक्षीस दिल्या आहेत म्हणून तो त्यांची पूजा करत राहतो? कि त्या विकून टाकतो? कल्पना नाही. त्यामुळे मृण्मयसाठी एक नवीन गोष्ट तयार केली (नक्की माहित नाही कि मी ही आधी कोणाकडून ऐकली होती का ते..)

लाकूडतोड्याने त्या दोन्ही कुर्‍हाडींचे काय केले माहित नाही, पण त्याने त्याच्या मुलाला - 'शाम'ला - शाळेत पाठवले. शाम शिकून मोठा झाला आणि पुढे मग "software engineer" झाला.

एकदा असाच तो बाबांना म्हणाला - "बाबा, मी जरा जंगलात जाऊन काम करत बसतो, लॅपटॉपवर. इथे कंटाळा आला आहे".
बाबा - "ठिक आहे पोरा, जपून ये परत"

शाम गेला जंगलात. नदीकिनारी झाडाखाली काम करत बसला. अचानक त्याला काहीतरी हालचाल वाटली म्हणून त्याने मान वळवून बघायचा प्रयत्न केला, पण त्या प्रयत्नात त्याचा लॅपटॉप पडला पाण्यात.

आता लाकूडतोड्याचाच मुलगा तो, त्याला ती देवीची गोष्ट माहित होती. त्याने लगेच देवीची प्रार्थना केली. देवी आली पाण्यातून बाहेर. तिने विचारले - "काय रे? काय झाले? का प्रार्थना करत होतास माझी?"
शाम - "देवीबाप्पा - माझा लॅपटॉप पाण्यात पडला आहे. आता मी काम कसे करू? काय करू?"
देवीने त्याच्याकडे निरखून बघितले आणि म्हणाली - तू शोधलास का?
शाम - नाही :(
देवी - हे बघ, जे लोक स्वत: प्रयत्न करत नाहीत त्यांना मी मदत करत नाही. मी चालले
असे म्हणून देवी अदृश्य झाली.

शामने चटकन् पाण्यात उडी मारली. पण त्याला लॅपटॉप काही मिळाला नाही. त्याने परत देवीची प्रार्थना केली. देवीने बाहेर येऊन बघितले. शाम पाण्याने पूर्ण ओला झालेला होता. मग ती शामला म्हणाली - ठिक आहे, मी मदत करते तुला.

देवीने पाण्यात बुडी मारताना शामची परिक्षा घ्यायचे ठरवले. तिने पाण्यातून एक लॅपटॉप काढला - तो होता "Sony" चा. शामला विचारले - "अरे हा का तुझा लॅपटॉप?"
शाम म्हणाला - "नाही"
देवीने परत पाण्यात बुडी मारली, आणि घेवून आली "Dell" चा लॅपटॉप.
शाम म्हणाला - "हा नाही माझा लॅपटॉप. माझा तर "Acer" चा होता."
देवी खूष!!
तिने पाण्यातून शामचा लॅपटॉप काढुन त्याला दिला आणि विचारले हाच का तुझा लॅपटॉप?
शाम म्हणाला - हो, माझ्या लॅपटॉपसारखाच दिसतो आहे. मी चालू करून बघतो.
चेक करून शाम म्हणाला - हो, माझाच आहे आणि चालू पण होतो आहे. Thank you बाप्पा.

देवी म्हणाली - शाम तू खरे बोललास ना, म्हणून मी तुला हे दोन्ही लॅपटॉप बक्षीस देते!!

शाम खूष!!

शाम घरी आला. त्याने ते दोन लॅपटॉप्स घेऊन स्वत:चे ऑफिस चालू केले!!

मृण्मय - बाबा - मी पण माझे ऑफिस चालू करणार मोठा झालो की!! (इथे मी कृतकृत्य होतो!! :P)

Friday, November 11, 2011

उमेद

त्या गुलाबी वळणावरती भेटलास,
आयुष्यभर साथ देईन म्हणालास,
गोड स्वप्नांत गुंतले मी,
तुझ्यासवे स्वर्गात पोहोचले मी.

मधुचंद्राची गोडी,
तुझी नी माझी जोडी,
दॄष्ट लागली कोणाचीतरी,
काढली कोणीतरी खोडी,

तो काळा दिवस आयुष्यातला,
पण कोणास ठाऊक होते,
संध्याकाळच्या कातरवेळेस,
माझे नशीबच बदलणार होते

ऑफिसचा पहिलाच दिवस,
तुझी वाट बघण्याची मजा,
ह्रुदयात अनामिक हुरहुर,
एका बातमीत झाली सजा

बॉम्बच्या एका फटक्यात,
उधळून गेला सगळा डाव,
सव्वीस दिवसांचा संसार,
उरला फक्त काळजात घाव

तुझ्या आठवणींचाच आधार आता,
जगण्याची उमेद देईल मला,
देवा, पुढच्या जन्मी मात्र,
त्यांच्या आधी नेशील मला!!

प्रथम प्रकाशित : http://bhashya.blogspot.com/2006/11/blog-post_23.html

Wednesday, November 9, 2011

वाट


लग्नापूर्वी..
वाट बघण्यात पूर्वी किती मजा असायची,
पांच मिनिटे उशीर झाला तरी काळजी वाटायची

लग्नानंतर …
आता मात्र वाट बघणे किती कंटाळवाणे होते,
पांच मिनिटे उशीर झाला तरी वाटते, मुद्दाम करते…

Tuesday, November 8, 2011

सावली


समुद्र किनारी,
नारळाच्या खाली,
सूर्याच्या किरणांनी,
पडली एक सावली.

वाळूच्या कणांत,
सोनेरी पाण्यात,
वर खाली होत,
चालली होती तोर्‍यात,

म्हणाली ती सूर्याला,
नाही घाबरत तुला,
एव्हढाच असेल तोरा,
तर पकड पाहू मला,

सूर्य म्हणाला, बाई ग,
मी आहे म्हणूनच तू आहे,
माझ्याशिवाय तुझे,
आयुष्यच शून्य आहे

पटले नाही सावलीला,
चालत राहीली तोर्‍यात,
सूर्यासमोर ताठ मानेने,
उभी राहीली कुर्र्यात,

तेव्ह्ढ्यात संध्याकाळ झाली,
सूर्याची सुट्टी झाली,
तोर्‍यात चालणारी ती,
सावली आता गायब झाली!!

Monday, November 7, 2011

जीवनसाथी


चार दिवसांचा संसार सुखाचा,
वार्‍यासंगे उडून गेला,
सुरवंटाचे फुलपाखरू करून,
असा कसा तू निघून गेला

तुझ्या आठवणीवर जगायला,
पुरेसा सहवास तरी हवा,
येते मी आता तुझ्यासवे,
पुढच्या जन्मी मांडू खेळ नवा

Sunday, November 6, 2011

झोप


माणसाला आयुष्यात नक्की काय हवे असते? पैसा? घर? प्रतिष्ठा? नाही… त्याला हवी असते फक्त सुखाची झोप. रात्रभर छान झोप झाली की तो कसा छान ताजातवाना होतो. अलीकडे झोपच मिळेनाशी झाली आहे. सतत डोक्याला कसली ना कसली तरी काळजी. आज काय तर काम पूर्ण झाले नाही, उद्या काय तर नवीन घर घ्यायचे आहे त्यासाठी जुळवाजुळव करायची आहे. परवा काय तर मुले अभ्यास करत नाहीत. बायको भांडते, तिचे सासू-सासर्‍यांशी पटत नाही, बाबा वयाचा विचार न करता काम उकरत बसतात आणि मग त्रास होतो … एक ना दोन.  आता तर वाटू लागले आहे कि चिंता करायची सवयच लागली आहे. काही काळजीची गोष्ट नसेल तर आपण काही विसरलो तर नाही ना म्हणून काळजी सुरु होते.

हां, तर झोप … लहानपणी काय सुख होते. गादीवर पडल्यापडल्या झोप लागायची. सरळ सकाळीच जाग. पहाटे पहाटे तर छान स्वप्ने पडायची. आता स्वप्नं रात्रभर पडतात, दर अर्ध्या तासाला जाग येते. मग कुठले कुठले विचार डोक्यात चालू. रात्री झोप झाली नाही म्हणून दिवस वाईट, आणि दिवस वाईट म्हणून परत झोप नाही … चक्र थांबतच नाही.

सुखाच्या मागे धावता-धावता, पैशाच्या मागे लागलो.
चार पैशाच्यामागे लाखमोलाची झोप गमावली
आता रात्री फक्त निद्रादेवीची आराधना करायची असते,
या कुशीवरून त्या कुशीवर, परत या कुशीवर वळायचे असते

कुठेतरी हे थांबलेच पाहीजे.. थांबलेच पाहीजे.

Saturday, November 5, 2011

स्वप्न


हिरव्यागार रानात, वाटे तुझ्यासवे जावे,
निळ्याशार तलावात पाय बुडवून बसावे,
तुझ्या नितळ गालावर पाणी उडवावे,
आणि त्या थेंबांचे मोती होताना बघावे.

दुरवर आकाशात, तुझ्यासवे भरारी घ्यावी,
ढगांवर स्वार होवून स्वर्गाची सैर करावी,
अवकाशातील तारकांची छान माळ करावी,
आणि तुझ्या गोर्‍यापान गळ्यात घालावी

छोट्याश्या बोटीत बसून समुद्रावर जावे,
अथांग सागरासारख्या तुझ्या प्रेमात बुडावे,
सागरामध्ये खूप खूप खोल शिरावे,
शंखशिंपल्यांच्या दागिन्यांनी तुला सजवावे,

गुलाबी थंडीत, तुझ्या कुशीत शिरावे,
काळ्याभोर केशसंभारात हात गुंफावे,
तुझ्या टपोरी डोळ्यात हरवून जावे,
देवाजवळ एकच प्रार्थना, हे सगळे खरे व्हावे

Friday, November 4, 2011

आशा


दीसामागून दीस गेले, वाट पहाणे संपले नाही,
पाण्याशिवाय तहानेने जीव जाणे संपले नाही.

नुसताच एक काळा ढग आशा दाखवून गेला,
जाता जाता डोळ्यात मात्र पाणी आणून गेला.

भेगाळलेली जमीन आणि तहानलेले लेकरू,
पाण्याच्या आशेने बघा तळमळतंय वासरू

सुर्याच्या उन्हाने अंगाची झाली आहे लाही
घशाला आता कोरड पण पडत नाही

अशीच वाट पहात बसायचे, तीळ तीळ मरायचे
कधीतरी पाऊस येईल अशा आशेवर जगायचे

Thursday, November 3, 2011

मिठी


शिरता शिरता मिठीत तुझिया,
भासे मजला स्वर्ग गवसला
विसरूनी सारे दुःख वेदना,
हृदयी अवचित सूर उमटला

स्पर्शसुखाचा फुलता मोहर,
रोमरोम रसरसले सत्वर
विसावता या कुशीत तुझिया,
एक अनामिक उठली हुरहुर

थांबला आता श्वासही माझा,
थांबली ती ह्रुदयाची धडधड
मिटून जाता दरी सहज ही
निमून गेली माझी तडफड

एकच आता ध्यास हा माझा,
जगावे तर तुझीच होवून,
शेवटची ती असेल ईच्छा
मिठीत रहावे तुझ्या सुखावून

Wednesday, November 2, 2011

मागणी


तुला नकळत पाहताना, मलाच कळले नाही
तुझ्यात गुंतलो कधी, मलाच कळले नाही

तुझे ते स्मित हास्य, गालावर ओघळणार्‍या बटा,
तुझे काळेभोर डोळे, जणू अथांग सागरामधील लाटा

तुझे ते गोरे-गोरे गाल, नाक असे जरी चपटे
दुसर्‍यांशी बोलताना बघून काळजात रुतती काटे

मैत्रिणींच्या घोळक्यात तू एकटीच दिसतेस छान,
सगळ्या बदकांमधे जसा फक्त राजहंसच छान

मला घायळ करी, पाठमोरी तुझी मूर्ती
तुला डोळ्यात साठवताना, वाटे झाली ईच्छापूर्ती

आता फक्त एकच मागणे, नको देवूस नकार,
सर्वांसमक्ष हात मागतो, कर माझा स्वीकार

Tuesday, November 1, 2011

बोधकथा – १


कथा – आवृत्ती पहिली
एकदा एक ऋषी नदीवर स्नानास गेले होते. स्नान झाल्यावर सूर्याला अर्घ्य देण्यासाठी पाणी घ्यायला ते खाली वाकले तर त्यांना एक विंचू पाण्यात पडलेला दिसला. तो विंचू पाण्यातून बाहेर पडण्यासाठी धडपड करत होता. परंतु ते काही त्याला जमत नव्हते. ऋषींना त्याची दया आली. त्यांनी त्या विंचवाला ओंजळीत उचलून घेतले व ते काठावर येण्यासाठी वळले तोच त्या विंचवाने जिवाच्या भीतीने त्यांच्या हाताचा चावा घेतला. प्रतिक्षिप्त क्रियेने त्यांचा हातातून विंचू परत पाण्यात पडला. ऋषींनी परत त्या विंचवाला उचलेले व परत काठावर येऊ लागले. परत त्या विंचवाने हाताचा चावा घेतला. असे ३-४ वेळा तरी झाले. एव्हाना ऋषींचा हात रक्तबंबाळ झाला होता.
हा सर्व प्रकार एक पांथस्थ बघत होता. त्याला आश्चर्य वाटले. विंचवाने एव्हढे चावे घेतले तरी ऋषी परत परत असे का करत आहेत ते त्याला कळेना. त्याने त्या ऋषींना विचारले, "गुरुदेव, त्या विंचवाने आपला हात एव्हढा रक्तबंबाळ केला तरी आपण त्याला वाचवायचा एव्हढा अट्टहास का करत आहात?". ऋषी उत्तरलेः "चावा घेणे हा विंचवाचा धर्म आहे. दुसर्‍याचा जीव वाचविणे हा माझा धर्म आहे. जीव जात असताना पण तो त्याचा धर्म सोडत नाही तर मग मी का माझा धर्म सोडू?"

कथा – आवृत्ती दुसरी
एकदा एक ऋषी नदीवर स्नानास गेले होते. स्नान झाल्यावर सूर्याला अर्घ्य देण्यासाठी पाणी घ्यायला ते खाली वाकले तर त्यांना एक विंचू पाण्यात पडलेला दिसला. तो विंचू पाण्यातून बाहेर पडण्यासाठी धडपड करत होता. परंतु ते काही त्याला जमत नव्हते. ऋषींना त्याची दया आली. त्यांनी त्या विंचवाला ओंजळीत उचलून घेतले व ते काठावर येण्यासाठी वळले तोच त्या विंचवाने जिवाच्या भीतीने त्यांच्या हाताचा चावा घेतला. प्रतिक्षिप्त क्रियेने त्यांचा हातातून विंचू परत पाण्यात पडला. ऋषी नदीकाठी परत आले. आपला कमंडलू उचलला. परत पाण्यात गेले, विंचवाला कमंडलूत उचलले व जमिनीवर आणून सोडले.

बोध:
दोन्ही गोष्टींमधे दोन्ही ऋषींनी आपला धर्म सोडला नाही. परंतु पहिल्या ऋषींनी धर्म आंधळेपणाने आचरणात आणला. धर्म असे कुठेच सांगत नाही कि दुसर्‍याचा जीव वाचवताना स्वतःला त्रास झालाच पाहीजे. हे दुसर्‍या ऋषीने जाणले होते व तेच आचरणात आणले.