Sunday, December 18, 2011

पक्का पुणेकर

"दादा, तू आमच्याकडे फारसा येत नाहीस" असे पुणेरी "सभ्य" भाषेत कसे सांगतात?
.
.
.
"आई, चल आपण दादाला घर दाखवू यात!!" :D
--मृण्मय

Friday, December 16, 2011

केशरी केसरी


हनुमानाची गोष्ट चालू आहे. 
बाबा - आणि मग हनुमान बेबी आला. त्याच्या आईचे नाव होते "अंजनी".
मृण्मय - आणि बाबाचे नाव होते "केसरी"...
बाबा - बरोबर.. 
मृण्मय - [केसरीच्या चित्रावर बोट ठेवत] बाबा - हा कसा "व्हाईट" आहे ना... म्हणजे "स्किन कलर"चा?
बाबा - [confused] हं.. मग?
मृण्मय - आणि त्याचे नाव बघ - "केसरी".. आपल्या झेंडयात असतो तसा कलर आहे का त्याचा??!!!
:D

Saturday, November 19, 2011

सत्या

सोनी मिक्स चॅनेलवर गाणी लागली होती.
गीला गीला पानी..

मंदार: अरे, सत्या ९०' मधला आहे??
मेघना: असे दिसते आहे...
मृण्मय: बाबा तू काय म्हणालास?
मंदार: अरे, ते गाणे ज्या पिक्चरमधले आहे ना..
मृण्मय: कुठल्या पिक्चरमधले आहे?
मंदार: "सत्या"...
मृण्मय: सत्या? मग "अठ्ठया" कुठाय?

:)

Tuesday, November 15, 2011

लाकूडतोड्याच्या मुलाची गोष्ट

बहुतेक सगळ्यांना लाकूडतोड्याची गोष्ट माहीत आहेच. परंतु, त्याच्या शेवटी तो लाकूडतोड्या त्या सोन्याच्या आणि चांदीच्या कुर्‍हाडींचे करतो काय? देवीने बक्षीस दिल्या आहेत म्हणून तो त्यांची पूजा करत राहतो? कि त्या विकून टाकतो? कल्पना नाही. त्यामुळे मृण्मयसाठी एक नवीन गोष्ट तयार केली (नक्की माहित नाही कि मी ही आधी कोणाकडून ऐकली होती का ते..)

लाकूडतोड्याने त्या दोन्ही कुर्‍हाडींचे काय केले माहित नाही, पण त्याने त्याच्या मुलाला - 'शाम'ला - शाळेत पाठवले. शाम शिकून मोठा झाला आणि पुढे मग "software engineer" झाला.

एकदा असाच तो बाबांना म्हणाला - "बाबा, मी जरा जंगलात जाऊन काम करत बसतो, लॅपटॉपवर. इथे कंटाळा आला आहे".
बाबा - "ठिक आहे पोरा, जपून ये परत"

शाम गेला जंगलात. नदीकिनारी झाडाखाली काम करत बसला. अचानक त्याला काहीतरी हालचाल वाटली म्हणून त्याने मान वळवून बघायचा प्रयत्न केला, पण त्या प्रयत्नात त्याचा लॅपटॉप पडला पाण्यात.

आता लाकूडतोड्याचाच मुलगा तो, त्याला ती देवीची गोष्ट माहित होती. त्याने लगेच देवीची प्रार्थना केली. देवी आली पाण्यातून बाहेर. तिने विचारले - "काय रे? काय झाले? का प्रार्थना करत होतास माझी?"
शाम - "देवीबाप्पा - माझा लॅपटॉप पाण्यात पडला आहे. आता मी काम कसे करू? काय करू?"
देवीने त्याच्याकडे निरखून बघितले आणि म्हणाली - तू शोधलास का?
शाम - नाही :(
देवी - हे बघ, जे लोक स्वत: प्रयत्न करत नाहीत त्यांना मी मदत करत नाही. मी चालले
असे म्हणून देवी अदृश्य झाली.

शामने चटकन् पाण्यात उडी मारली. पण त्याला लॅपटॉप काही मिळाला नाही. त्याने परत देवीची प्रार्थना केली. देवीने बाहेर येऊन बघितले. शाम पाण्याने पूर्ण ओला झालेला होता. मग ती शामला म्हणाली - ठिक आहे, मी मदत करते तुला.

देवीने पाण्यात बुडी मारताना शामची परिक्षा घ्यायचे ठरवले. तिने पाण्यातून एक लॅपटॉप काढला - तो होता "Sony" चा. शामला विचारले - "अरे हा का तुझा लॅपटॉप?"
शाम म्हणाला - "नाही"
देवीने परत पाण्यात बुडी मारली, आणि घेवून आली "Dell" चा लॅपटॉप.
शाम म्हणाला - "हा नाही माझा लॅपटॉप. माझा तर "Acer" चा होता."
देवी खूष!!
तिने पाण्यातून शामचा लॅपटॉप काढुन त्याला दिला आणि विचारले हाच का तुझा लॅपटॉप?
शाम म्हणाला - हो, माझ्या लॅपटॉपसारखाच दिसतो आहे. मी चालू करून बघतो.
चेक करून शाम म्हणाला - हो, माझाच आहे आणि चालू पण होतो आहे. Thank you बाप्पा.

देवी म्हणाली - शाम तू खरे बोललास ना, म्हणून मी तुला हे दोन्ही लॅपटॉप बक्षीस देते!!

शाम खूष!!

शाम घरी आला. त्याने ते दोन लॅपटॉप्स घेऊन स्वत:चे ऑफिस चालू केले!!

मृण्मय - बाबा - मी पण माझे ऑफिस चालू करणार मोठा झालो की!! (इथे मी कृतकृत्य होतो!! :P)

Friday, November 11, 2011

उमेद

त्या गुलाबी वळणावरती भेटलास,
आयुष्यभर साथ देईन म्हणालास,
गोड स्वप्नांत गुंतले मी,
तुझ्यासवे स्वर्गात पोहोचले मी.

मधुचंद्राची गोडी,
तुझी नी माझी जोडी,
दॄष्ट लागली कोणाचीतरी,
काढली कोणीतरी खोडी,

तो काळा दिवस आयुष्यातला,
पण कोणास ठाऊक होते,
संध्याकाळच्या कातरवेळेस,
माझे नशीबच बदलणार होते

ऑफिसचा पहिलाच दिवस,
तुझी वाट बघण्याची मजा,
ह्रुदयात अनामिक हुरहुर,
एका बातमीत झाली सजा

बॉम्बच्या एका फटक्यात,
उधळून गेला सगळा डाव,
सव्वीस दिवसांचा संसार,
उरला फक्त काळजात घाव

तुझ्या आठवणींचाच आधार आता,
जगण्याची उमेद देईल मला,
देवा, पुढच्या जन्मी मात्र,
त्यांच्या आधी नेशील मला!!

प्रथम प्रकाशित : http://bhashya.blogspot.com/2006/11/blog-post_23.html

Wednesday, November 9, 2011

वाट


लग्नापूर्वी..
वाट बघण्यात पूर्वी किती मजा असायची,
पांच मिनिटे उशीर झाला तरी काळजी वाटायची

लग्नानंतर …
आता मात्र वाट बघणे किती कंटाळवाणे होते,
पांच मिनिटे उशीर झाला तरी वाटते, मुद्दाम करते…

Tuesday, November 8, 2011

सावली


समुद्र किनारी,
नारळाच्या खाली,
सूर्याच्या किरणांनी,
पडली एक सावली.

वाळूच्या कणांत,
सोनेरी पाण्यात,
वर खाली होत,
चालली होती तोर्‍यात,

म्हणाली ती सूर्याला,
नाही घाबरत तुला,
एव्हढाच असेल तोरा,
तर पकड पाहू मला,

सूर्य म्हणाला, बाई ग,
मी आहे म्हणूनच तू आहे,
माझ्याशिवाय तुझे,
आयुष्यच शून्य आहे

पटले नाही सावलीला,
चालत राहीली तोर्‍यात,
सूर्यासमोर ताठ मानेने,
उभी राहीली कुर्र्यात,

तेव्ह्ढ्यात संध्याकाळ झाली,
सूर्याची सुट्टी झाली,
तोर्‍यात चालणारी ती,
सावली आता गायब झाली!!

Monday, November 7, 2011

जीवनसाथी


चार दिवसांचा संसार सुखाचा,
वार्‍यासंगे उडून गेला,
सुरवंटाचे फुलपाखरू करून,
असा कसा तू निघून गेला

तुझ्या आठवणीवर जगायला,
पुरेसा सहवास तरी हवा,
येते मी आता तुझ्यासवे,
पुढच्या जन्मी मांडू खेळ नवा

Sunday, November 6, 2011

झोप


माणसाला आयुष्यात नक्की काय हवे असते? पैसा? घर? प्रतिष्ठा? नाही… त्याला हवी असते फक्त सुखाची झोप. रात्रभर छान झोप झाली की तो कसा छान ताजातवाना होतो. अलीकडे झोपच मिळेनाशी झाली आहे. सतत डोक्याला कसली ना कसली तरी काळजी. आज काय तर काम पूर्ण झाले नाही, उद्या काय तर नवीन घर घ्यायचे आहे त्यासाठी जुळवाजुळव करायची आहे. परवा काय तर मुले अभ्यास करत नाहीत. बायको भांडते, तिचे सासू-सासर्‍यांशी पटत नाही, बाबा वयाचा विचार न करता काम उकरत बसतात आणि मग त्रास होतो … एक ना दोन.  आता तर वाटू लागले आहे कि चिंता करायची सवयच लागली आहे. काही काळजीची गोष्ट नसेल तर आपण काही विसरलो तर नाही ना म्हणून काळजी सुरु होते.

हां, तर झोप … लहानपणी काय सुख होते. गादीवर पडल्यापडल्या झोप लागायची. सरळ सकाळीच जाग. पहाटे पहाटे तर छान स्वप्ने पडायची. आता स्वप्नं रात्रभर पडतात, दर अर्ध्या तासाला जाग येते. मग कुठले कुठले विचार डोक्यात चालू. रात्री झोप झाली नाही म्हणून दिवस वाईट, आणि दिवस वाईट म्हणून परत झोप नाही … चक्र थांबतच नाही.

सुखाच्या मागे धावता-धावता, पैशाच्या मागे लागलो.
चार पैशाच्यामागे लाखमोलाची झोप गमावली
आता रात्री फक्त निद्रादेवीची आराधना करायची असते,
या कुशीवरून त्या कुशीवर, परत या कुशीवर वळायचे असते

कुठेतरी हे थांबलेच पाहीजे.. थांबलेच पाहीजे.

Saturday, November 5, 2011

स्वप्न


हिरव्यागार रानात, वाटे तुझ्यासवे जावे,
निळ्याशार तलावात पाय बुडवून बसावे,
तुझ्या नितळ गालावर पाणी उडवावे,
आणि त्या थेंबांचे मोती होताना बघावे.

दुरवर आकाशात, तुझ्यासवे भरारी घ्यावी,
ढगांवर स्वार होवून स्वर्गाची सैर करावी,
अवकाशातील तारकांची छान माळ करावी,
आणि तुझ्या गोर्‍यापान गळ्यात घालावी

छोट्याश्या बोटीत बसून समुद्रावर जावे,
अथांग सागरासारख्या तुझ्या प्रेमात बुडावे,
सागरामध्ये खूप खूप खोल शिरावे,
शंखशिंपल्यांच्या दागिन्यांनी तुला सजवावे,

गुलाबी थंडीत, तुझ्या कुशीत शिरावे,
काळ्याभोर केशसंभारात हात गुंफावे,
तुझ्या टपोरी डोळ्यात हरवून जावे,
देवाजवळ एकच प्रार्थना, हे सगळे खरे व्हावे

Friday, November 4, 2011

आशा


दीसामागून दीस गेले, वाट पहाणे संपले नाही,
पाण्याशिवाय तहानेने जीव जाणे संपले नाही.

नुसताच एक काळा ढग आशा दाखवून गेला,
जाता जाता डोळ्यात मात्र पाणी आणून गेला.

भेगाळलेली जमीन आणि तहानलेले लेकरू,
पाण्याच्या आशेने बघा तळमळतंय वासरू

सुर्याच्या उन्हाने अंगाची झाली आहे लाही
घशाला आता कोरड पण पडत नाही

अशीच वाट पहात बसायचे, तीळ तीळ मरायचे
कधीतरी पाऊस येईल अशा आशेवर जगायचे

Thursday, November 3, 2011

मिठी


शिरता शिरता मिठीत तुझिया,
भासे मजला स्वर्ग गवसला
विसरूनी सारे दुःख वेदना,
हृदयी अवचित सूर उमटला

स्पर्शसुखाचा फुलता मोहर,
रोमरोम रसरसले सत्वर
विसावता या कुशीत तुझिया,
एक अनामिक उठली हुरहुर

थांबला आता श्वासही माझा,
थांबली ती ह्रुदयाची धडधड
मिटून जाता दरी सहज ही
निमून गेली माझी तडफड

एकच आता ध्यास हा माझा,
जगावे तर तुझीच होवून,
शेवटची ती असेल ईच्छा
मिठीत रहावे तुझ्या सुखावून

Wednesday, November 2, 2011

मागणी


तुला नकळत पाहताना, मलाच कळले नाही
तुझ्यात गुंतलो कधी, मलाच कळले नाही

तुझे ते स्मित हास्य, गालावर ओघळणार्‍या बटा,
तुझे काळेभोर डोळे, जणू अथांग सागरामधील लाटा

तुझे ते गोरे-गोरे गाल, नाक असे जरी चपटे
दुसर्‍यांशी बोलताना बघून काळजात रुतती काटे

मैत्रिणींच्या घोळक्यात तू एकटीच दिसतेस छान,
सगळ्या बदकांमधे जसा फक्त राजहंसच छान

मला घायळ करी, पाठमोरी तुझी मूर्ती
तुला डोळ्यात साठवताना, वाटे झाली ईच्छापूर्ती

आता फक्त एकच मागणे, नको देवूस नकार,
सर्वांसमक्ष हात मागतो, कर माझा स्वीकार

Tuesday, November 1, 2011

बोधकथा – १


कथा – आवृत्ती पहिली
एकदा एक ऋषी नदीवर स्नानास गेले होते. स्नान झाल्यावर सूर्याला अर्घ्य देण्यासाठी पाणी घ्यायला ते खाली वाकले तर त्यांना एक विंचू पाण्यात पडलेला दिसला. तो विंचू पाण्यातून बाहेर पडण्यासाठी धडपड करत होता. परंतु ते काही त्याला जमत नव्हते. ऋषींना त्याची दया आली. त्यांनी त्या विंचवाला ओंजळीत उचलून घेतले व ते काठावर येण्यासाठी वळले तोच त्या विंचवाने जिवाच्या भीतीने त्यांच्या हाताचा चावा घेतला. प्रतिक्षिप्त क्रियेने त्यांचा हातातून विंचू परत पाण्यात पडला. ऋषींनी परत त्या विंचवाला उचलेले व परत काठावर येऊ लागले. परत त्या विंचवाने हाताचा चावा घेतला. असे ३-४ वेळा तरी झाले. एव्हाना ऋषींचा हात रक्तबंबाळ झाला होता.
हा सर्व प्रकार एक पांथस्थ बघत होता. त्याला आश्चर्य वाटले. विंचवाने एव्हढे चावे घेतले तरी ऋषी परत परत असे का करत आहेत ते त्याला कळेना. त्याने त्या ऋषींना विचारले, "गुरुदेव, त्या विंचवाने आपला हात एव्हढा रक्तबंबाळ केला तरी आपण त्याला वाचवायचा एव्हढा अट्टहास का करत आहात?". ऋषी उत्तरलेः "चावा घेणे हा विंचवाचा धर्म आहे. दुसर्‍याचा जीव वाचविणे हा माझा धर्म आहे. जीव जात असताना पण तो त्याचा धर्म सोडत नाही तर मग मी का माझा धर्म सोडू?"

कथा – आवृत्ती दुसरी
एकदा एक ऋषी नदीवर स्नानास गेले होते. स्नान झाल्यावर सूर्याला अर्घ्य देण्यासाठी पाणी घ्यायला ते खाली वाकले तर त्यांना एक विंचू पाण्यात पडलेला दिसला. तो विंचू पाण्यातून बाहेर पडण्यासाठी धडपड करत होता. परंतु ते काही त्याला जमत नव्हते. ऋषींना त्याची दया आली. त्यांनी त्या विंचवाला ओंजळीत उचलून घेतले व ते काठावर येण्यासाठी वळले तोच त्या विंचवाने जिवाच्या भीतीने त्यांच्या हाताचा चावा घेतला. प्रतिक्षिप्त क्रियेने त्यांचा हातातून विंचू परत पाण्यात पडला. ऋषी नदीकाठी परत आले. आपला कमंडलू उचलला. परत पाण्यात गेले, विंचवाला कमंडलूत उचलले व जमिनीवर आणून सोडले.

बोध:
दोन्ही गोष्टींमधे दोन्ही ऋषींनी आपला धर्म सोडला नाही. परंतु पहिल्या ऋषींनी धर्म आंधळेपणाने आचरणात आणला. धर्म असे कुठेच सांगत नाही कि दुसर्‍याचा जीव वाचवताना स्वतःला त्रास झालाच पाहीजे. हे दुसर्‍या ऋषीने जाणले होते व तेच आचरणात आणले.

Monday, October 31, 2011

मृण्मय पत्ता सांगतोय..

स्थळ: MTDC, मोहर्ली, ताडोबा
या ट्रिपमधे आम्हाला नाईक म्हणून एक कुटंब भेटले. Nice and very friendly family... मृण्मय आणि त्यांचा मुलगा ध्रुव यांची चांगली मैत्री झाली होती. शेवटच्या दिवशी आम्ही कॉन्टॅक्टस exchange करत होतो, तेव्हा ध्रुवच्या बाबाने मृण्मयला विचारले:

काका: अरे मला तुझा पत्ता सांगतोस का?
मृण्मय: होssss.
(असे म्हणून त्याने टेबलवर पत्ता सांगायला सुरुवात केली. एका टोकापासून दु‌सर्‍या टोकापर्यंत हात फिरवत जोरजोरात चालू होते)
मृण्मय: असे इथून यायचे straight.. बाबा straightच यायचे ना श्रद्धामामीकडून? (For him the starting point is always the day care!! - so small a world for him :))
मी: हो सरळच यायचे.
मृण्मय: (कुठली तरी अगम्य नावे वापरून परत..) बाबा, मग Right घ्यायचा ना?
बाबा: कुठे रे?
मृण्मय: आपल्या घरी यायला?
बाबा: हो, चांदणी चौकातून Right घ्यायचा..
मृण्मय: मग असं वंडर फ्युचुरामधे यायचे.
इथे गाडी पार्क करायची (all the time using his gestures to show where and how).
आणि मग जिना चढून वर यायचे. तिथे लिफ्ट असते.
(in the same flow...)
 ती बंद असेल तर जिना चढून वर यायचे!! (jaws dropped....)
आणि ती चालू असेल तर लिफ्टमधे शिरायचे आणि ५ नंबरचे बटण दाबायचे.. मग आमच्या घरी पोहोचाल!!
काका: अरे बापरे!! ५ मजले चढून यायचे?
मृण्मय: हो लिफ्ट बंद असेल तर..
काका: अरे, खूपच उंच आहे रे.. तुमच्याकडे बादली वगैरे नाही का?
 मृण्मयच्या चेहेर्‍यावर प्रश्नचिन्ह...
काका: बादली खाली सोडायची आणि मी मग त्यात बसेन, मग ती वर ओढायची

[Here comes the punch...]


In completely dismissive tone...
मृण्मय: "आमच्याकडे असले काही नाही...."

Sunday, October 30, 2011

संवाद


ती

लग्नाला उणे-पुरे वर्ष नाही झाले तोच यांच्यात बदल व्हायला लागला आहे. हल्ली मला फारसा वेळ देत नाहीत हे. पुर्वी कसे तासन्‌ तास बोलत बसायचो, वेळ कमी पडायचा. बोलायला विषय नाही असे कधी झालेच नाही. हा नाही, तर तो विषय असायचाच. कधी माझ्या मित्र-मैत्रिणी, तर कधी त्याचा गिर्यारोहणाचा ग्रुप. माझ्या नाटकातल्या मजा, तर त्याच्या ट्रेकिंगमधले अनुभव. आई-आप्पांची होणारी मजा आणि माझ्या नाटकांमुळे ममा-पप्पांना वाटणारी काळजी. कितीतरी वेळ बोलत बसायचो. पण आता ते नाही. मोठ्या मुष्कीलीने कशीबशी १५-२० मिनिटे मिळतात रात्री झोपायच्या आधी. तेही स्वारी दमलेली नसेल तर. नाहीतर आहेच दुसर्‍या दिवसाची वाट बघणे. काल पण असेच झाले. मला नवीन नाटक मिळते आहे. त्याच्याबद्दल बोलायचे होते. तर स्वारी आली दमून. त्यात कंपनीत चिडचिड झालेली होती. हाताखालचे लोकं कामं करत नाहीत आणि मग घेतात डोक्यात राख घालून. घरी बायको आहे, तिलाही वेळ दिला पाहीजे, तिच्याशी बोलले पाहीजे वगैरे काही नाही. जरा भाजीला तिखट जास्त काय झाले तर लगेच भाजी टाकून दिली. काही बोलले पण नाहीत तसेच आडवे झाले. दोन शब्द पण बोलले नाहीत. सकाळी उठून काही समजायच्या आत पोहोचले पण ऑफीसमधे. आता आज परत असेच होईल. मग मी नव्या नाटकाबद्दल कधी बोलू यांच्याशी?

तो

आज काल जरा चिडचिडच होते माझी हिच्यावर. कंपनीतला सगळा राग तिच्यावर निघतो. तिला मी घरी आल्यावर माझ्याशी खूप बोलायचे असते. मी पूर्वीसारखा तिच्याशी बोलत नाही ही तिची तक्रार काही फारशी चुकीची आहे अशातला भाग नाही, पण मी तरी काय करू? हल्ली फारसा वेळच मिळत नाही इतर काही करायला. आणि कंपनीतल्या गोष्टींमधे तिला ईंटरेस्ट नसतो. मग मी बोलणार तरी कशावर. ट्रेकींग पण हल्ली बंद झाले आहे. त्यामुळे बदल पण काहीच होत नाही. आता हे हातातले प्रोजेक्ट पूर्ण झाले कि तिला मस्त कुठेतरी बाहेर घेऊन जायचा विचार आहे. मस्त सरप्राईज होईल तिला. काल रात्री त्याच विचारात होतो. वेगवेगळी ठिकाणे, किती दिवस, कधी – हेच सगळे डोक्यात चालू होते. त्यात ती नव्या नाटकाबद्दल बोलत होती. म्हणजे मला ही ट्रिप तालमी चालू व्हायच्या आत करायला पाहीजे. म्हणजे प्रोजेक्ट पण जरासे आधीच संपवले पाहीजे. त्याच नादात आज सकाळी लवकर कंपनीत जायचा विचार पक्का केला. जेवण करून लगेच झोपलो आणि भल्या पहाटे ऑफीसला पोहोचलो. पण त्या गडबडीत तिच्याशी नाटकाबद्दल बोलायचे राहूनच गेले. आता आज मात्र बोललेच पाहीजे.

टीप: ही संकल्पना श्री. सुधीर गाडगीळ यांच्या "शब्द" या "चतुरा" मासिकातील लेखमालेवरून घेतली आहे.

Saturday, October 29, 2011

मृण्मयचे Logic

काही दिवसांपूर्वी, घरी परत येत असताना, मृण्मयला खूप झोप येत होती. त्याला जागे ठेवण्यासाठी मी काहीतरी करून त्याला गुंतवून ठेवत होतो बोलण्यात. त्यातलाच एक संवाद:
मी: अरे तो लाल दिऊ बघितलास का?
मृण्मय: कुठला?
मी: तो टॉवरवरचा..
मृण्मय: तो कसला दिऊ आहे बाबा?
मी: अरे त्याची ना वेगळीच गंमत आहे...
मृण्मय: सांग ना बाबा..
मी: अरे, आकाशातून विमाने जातात ना, त्यांना दिवसा प्रकाशामुळे टॉवर कुठे आहे ते दिसते. पण रात्री कसे दिसणार? अंधार असतो ना... त्यांना कळावे रात्री कि इथे टॉवर आहे, म्हणून दिऊ लावला आहे तिथे.

हे मग घरी पोहोचल्यावर आईला सांगून झाले. मग काही दिवस याच गोष्टीचे "Repeat Telecast" चालू होते. गेले बरेच दिवस या "लाल दिऊची" चर्चा झाली नव्हती. काल ताडोब्याहून परत येताना, परत मृण्मयला जागे ठेवण्याचे प्रयत्न चालू होते. And this time it was Meghana keeping him awake (and herself too). तोच लाल दिऊचा संवाद असा उलगडला!!

बाबा: अरे मृण्मय, तो लाल दिऊ दिसतो आहे का? त्याची गोष्ट सांग ना आईला...
आई: काय गोष्ट आहे रे ती?
मृण्मय: अगं आई, विमानाला दिसले पाहिजे ना, म्हणून तो दिऊ आहे.
आई: पण विमान इथे थोडेच उतरणार आहे?
मृण्मय: अगं आई.. विमानाला आकाशात दिसले पाहीजे ना, नाहीतर त्यांची धडक होईल ना?
आई: ....
बाबा: ...
मृण्मय: अंधारात विमानाला दिसले नाही दुसरे विमान, तर धडक होईल ना त्यांची, म्हणून तो दिऊ लावला आहे!!

फुलपाखरु

कधी फुलपाखराला वाटले असेल का की सागरात डुबकी मारावी? मस्त लाटांवर आरुढ होवून खुशाल डुलकी काढावी? ते सततचे भिरभिरणे थांबवून जरा विश्रांती घ्यावी? नसावे वाटंत. एका फुलावरून दुसर्‍या फुलावर जाण्यात जी मजा असेल ती कैक पटीने जास्त असावी. प्रत्येक फूल कसे वेगळे. कोणाचा रंग आकर्षक, तर कोणाचा सुगंध. कोणाच्या पाकळ्या मनमोहक तर कोणाचे परागकण. प्रत्येक फूल म्हणजे एक वेगळा अनुभव असावा. आणि त्या अनुभवाचीच नशा फुलपाखरांला चढत असावी. नाहीतर कोण उगाच कशाला अशी भ्रमंती लावून घेईल स्वतःच्या पाठीशी?

Friday, October 28, 2011

घर


घर म्हणजे फक्त तू आणि मी नाही,
घर म्हणजे फक्त वीटा आणि भिंती नाहीत
घर म्हणजे दोन कुटंबांचा संगम
त्यात तुझे आणि माझे असे भेद करायचे नाहीत

घरासाठी लागतात नियम
घरासाठी लागतो संयम
पण फक्त नियमांनी घर बनत नाही
आणि संयमाशिवाय घर तगत नाही

घर म्हणजे तुझा माझा संवाद
नको तिथे एकही विसंवाद
यदाकदाचित झाले जरी वादविवाद
तरी देऊ एकमेकांच्या सादेला साद

Thursday, October 27, 2011

शेवट


जिवाभावाचा सोबती, असा अचानक निघून गेला,
जाताना जीवन जगायची आसच घेवून गेला

ती शेवटची आर्त हाक, ती व्याकुळ नजर,
बोलायचे होते बरेच काही, पण शब्द अडकले ओठांवर

जगन्नियंत्याशी केली कितीही मारामारी,
तरीही शेवटचे शब्द – I am sorry

आता संपले सगळे, काहीच नाही उरले
अजून काही सहन करायचे त्राण नाही उरले

Wednesday, October 26, 2011

एक सकाळ


भल्या पहाटे जाग आली. उठून बाल्कनीत आले तर नुकतेच कुठे फ़ुटायला लागले होते. सूर्य अजून वरती यायचा होता. पक्षांची किलबिल सुरु होती. थंड हवेच्या झुळुकीने मन प्रसन्न झाले. गेल्या कित्येक दिवसात असा अनुभव घेतलाच नव्हता. खाली उतरले तर काय, दवबिंदूनी पाने मोहरून गेली होती, फुले नुकतीच उमलायला लागली होती. "फुलराणी" कविता आठवली:

हिरवे हिरवे गार गालिचे,
हरित तृणांच्या मखमालीचे
त्या सुंदर मखमालीवरती,
फुलराणी हि खेळत होती

तिथेच बसले मग जरा, फुलाकडे बघत. त्या इवल्याशा विश्वात काय काय हालचाली होत असतील याचा विचार करत. एका नव्या जीवाचे या दुनियेत येणे, पण मानवी जन्मापेक्षा संपूर्णपणे भिन्न. आयुष्य किती तर जेमतेम काही तास! पण त्या थोड्याश्या वेळातच काय ते होवून जाणार. एखादयाच्या नशिबी गजरा, तर दुस‍र्याच्या प्रक्तनात तसेच गळून जमिनीवर पडणे. एखादे देवाच्या मस्तकी पोहोचेल तर एखाद्याच्याच नशिबात भ्रमराची साथसंगत. त्या फुलाला हे सगळे जाणवत असेल का? कि ते पूर्णपणे अनभिज्ञ असेल या सर्व शक्यतांबाबत? कोणास ठावूक!

आणि अचानक माझ्या चेहेर्‍यावर सूर्याची कोवळी किरणे विसावली आणि माझे डोळे मिटले गेले. त्या एका क्षणात रंगांची कित्येक आवर्तने माझ्या डोळ्यापुढे नाचून गेली आणि शेवटी उरला तो फक्त पिवळा – सोनेरी पिवळा रंग …  सूर्याचा रंग.

दव हळूहळू कमी होत चालले होते. एका पानावर एकच टपोरा बिंदू उरला होता. सूर्याच्या किरणांनी तो उजळून निघाला होता, इतक्यात एक वार्‍याची खुळुक आली आणि त्यासरशी तो मोती खाली पडला.

ते मगाचचे फूल आता पूर्णपणे उमलले होते. येणार्‍या कुठल्याही प्रसंगाला सामोरे जाण्यास सज्ज! मी ही मग उठले – कामाच्या आठवणीने. परत फिरले – येणार्‍या कुठल्याही प्रसंगाला सामोरे जाण्यास सज्ज होवून !

Tuesday, October 25, 2011

पामर


काय लिहू? काहीच सुचत नाही
पण लिहिल्याशिवाय राहवत पण नाही

कविता लिहू कि कथा लिहू?
मजा लिहू कि व्यथा लिहू?

पण हे सगळे कोणासाठी?
स्वतःसाठी कि दुसर्‍यांसाठी?

एकदा वाटते सोडून देऊ सगळे
कारण आपण नाही जगावेगळे

दासबोधानंतर लिहिणार काय?
आम्ही तर पामर दुसरे काय?

Monday, October 24, 2011

पुन:प्रकाशन...


अचानक एक खजिना गवसला आहे... नाही नाही, पैशाचा नाही, माझ्याच जुन्या काही लिखाणाचा... कुठल्यातरी तंद्रीत लिहिलेल्या कविता, चारोळ्या, स्फुटलेखन वगैरे वगैरे. त्यावेळेस काय भूत डोक्यात होते कोणास ठाऊक, पण तेव्हा "anonymously" लिहून ठेवलेले हे साहित्य परत सापडले आहे. पुढिल काही दिवस मी हे साहित्य (?) ब्लॉगवर लिहिणार आहे. तुम्हाला आवडेल अशी आशा!!

Saturday, September 3, 2011

तीन कर्वे!!

"बाबा, हा कुठला रस्ता आहे?"
"हा ना, कर्वे रस्ता आहे.."
"आहाSSS बाबा तीन कर्वे..."
(मी आश्चर्यचकीत...)
"म्हणजे रे?"
"अरे.. तीन कर्वे आहेत ना..."
"कुठले कुठले रे?"
"अरे, कर्वे रोड, कर्वे पुतळा..."

 "आणि..."
"आणि तुझ्या गोष्टीतले ते कर्वे..उसाचे...."






Saturday, July 23, 2011

कूट प्रश्न

संध्याकाळी घरी येताना, मृण्मयची नेहेमीप्रमाणे बडबड चालू होती. अचानक त्याने "त्वमेव माता" म्हणायला सुरुवात केली. मग मी पण त्याच्याबरोबर म्हणायला लागलो...
मंदार - "... श्रीधरम् माधवम् गोपिकावल्लभम् जानकीनायकम्... "
मृण्मय - जानकी म्हणजे कोण? (He knows the answer, but with his typical expressions of sudden realization, he keeps on asking such questions.. )
मंदार - तू सांग..
मृण्मय - सीता...
मंदार - आणि मग जानकीनायक म्हणजे कोण?
मृण्मय - कोण?
मंदार - राम.. जानकीनायक म्हणजे जानकीचा नवरा .. म्हणजे राम
मृण्मय - मग लक्ष्मणाचा नवरा कोण?
मंदार - (puzzled) अरे लक्ष्मण नवरा होता.
मृण्मय - कोणाचा?
मंदार - ऊर्मिलेचा...
मृण्मय - मग लक्ष्मण रामाबरोबर का रहात होता? उर्मिलेबरोबर का नाही?
[me stumped... still trying to answer]
मंदार - अरे, राम भाऊ होता ना त्याचा, म्हणून तो त्याच्याबरोबर रहात होता.
मृण्मय - मग ऊर्मिला का नव्हती त्याच्याबरोबर?
[मी non-plus]
मंदार -अरे, ते मला नाही माहीत रे...
मृण्मय - का?
मंदार - ते वाल्मिकी ऋषींना विचारायला लागेल..
मृण्मय - का?
मंदार - अरे, रामाची गोष्ट त्यांनी लिहिली ना.. म्हणून...
मृण्मय - मग विचार ना त्यांना..
मंदार - मला त्यांचा पत्ता नाही माहिती रे..
मृण्मय - मग फोन कर ना ...
मंदार - अरे, मला फोन नंबर पण नाही माहिती रेSSSSS
मृण्मय - अरे, मग ज्यांच्याकडे आहे त्यांना विचार ना!!!
[I am forced to change the subject now]
काही काही वेळा खरंच प्रश्न पडतो - ही नवीन पिढी जरा जास्तच स्मार्ट आहे, कि आपणही होतो? :) मृण्मयला पडणारे एकएक प्रश्न बघून, हा अजून थोडा मोठा झाल्यावर काय काय प्रश्न विचारेल याची चिंता पडली आहे आम्हाला आता...

Sunday, July 3, 2011

World is so simple for him..

शनिवार दुपार. मृण्मय, मेघना आणि मी बाहेर निघालो होतो. वाटेत भारत गॅसचे दुकान लागले.
मेघना - अरे, गॅस नोंदवायचा आहे का?
मंदार - नाही. अजून वेळ आहे.
मृण्मय - आई, तू बाबाला काय म्हणालीस?
मेघना - अरे, आपला घरचा गॅस संपत आला आहे का असे विचारत होते.
मृण्मय - मग बाबा काय म्हणाला?
मेघना - बाबा म्हणाला, "आहे अजून"
मंदार - It would have been good if there could have been a pressure guage attached to the cylinder itself. It would have been so easy to know when it would need refill...
मृण्मय - आई, बाबा काय म्हणाला?
मेघना - अरे, आपल्याला कळायला पाहीजे ना कि गॅस आहे का संपला आहे, त्यासाठी काही करता येईल का.. असा विचार करत होता.
मृण्मय - मग काय केला विचार?
मेघना - अरे, cylinderला मीटर लावता येईल का?
मृण्मय - म्हणजे काय?
मेघना - अरे, तुला पेट्रोल संपत आलेले कसे कळते... तसेच..
मृण्मय - मग सोप्प आहे. cylinderवर letters लिहायची A, B, C, D आणि नंबर्स.. म्हणजे आपल्याला कळेल संपत आला की!!

World is so simple for him ...

Saturday, June 18, 2011

चोर आणि उंदीर

मृण्मय: आई, पोलीसमामा काय करतात गं? [अनेक वेळा विचारला गेलेला हा अजून एक प्रश्न]

मेघना: अरे ते ट्रॅफिकला मदत करतात... [context was a road bolck..]

मृण्मय: आणि ते चोराला पकडतात...

मेघना: हो, बरोबर आहे...

मृण्मय: आणि मग चोराला ते जाळ्यात बंद करतात...

मेघना: जाळ्यात नाही रे, जेलमधे..

मृण्मय: अगं नाही गं... जाळ्यात...

मेघना: अरे जेलमधे रे...

मृण्मय: अगं नाही गं.. जाळ्यात... सिंहमहाराज कसे अडकले होते? तसे.. [Ref: सिंह आणि उंदराची गोष्ट] [Expressions: typical, eyebrows up, one finger pointing upwards..]

मंदार: अरे पण मग सिंहाला कसे उंदराने सोडवले होते जाळ्यातून तसेच तो (उंदीर) चोराला पण सोडवेल ना...
[बाबाला हौस ना लोकांना फिरवायची...]

मृण्मय: अरे नाही रे...

मंदार: का रे? सिंहाला नाही का सोडवले त्याने?

मृण्मय: (confused now .. didn't know what to answer.. but struggling to answer me back)...

मंदार: सिंहाचे जाळे जसे तोडले, तसेच तो चोराचे पण सोडवेल ना...

मृण्मय: अरे नाही रे ssss... मग तो चोर उंदरालाच पळवेल ना... म्हणून उंदीर जाळे नाही तोडणार!!

[मंदार आणि मेघना enlightened!!!]

Sunday, April 3, 2011

Broken Record aka Persistence

मृण्मय: बाबा, CD लाव ना...
बाबा: थांब, पिक्चर संपल्यावर लावतो...

झाले असे होते, मी आणि मेघना "No one killed Jessica" बघत होतो आणि अचानक चिरंजीवांनी मागणी केली. आम्हाला तो पिक्चर बर्‍याच दिवसांपासून बघायचा होता, त्यामुळे पिल्लूची मागणी सहजासहजी मान्य होणे शक्यच नव्हते. त्यामुळे त्याला dissuade करण्याचे माझे प्रयत्न चालू झाले. त्याला जेवायला दिले. आणि त्याचे होत आले असताना आम्ही पण घेतले. त्याचे जेवण होताक्षणी परत मागणी झाली.

मृण्मय: बाबा, CD लाव ना...
बाबा: थांब, पिक्चर संपल्यावर लावतो...
मृण्मय: नाही, आत्ता लाव...
बाबा: अरे थांब ना जरा, पिक्चर संपल्यावर लावतो...

मग काहीतरी विषय बदलला. परत २-५ मिनिटांनी..
मृण्मय: बाबाsss, CD लाव ना...ssss
बाबा: थांब, पिक्चर संपल्यावर लावतो...

असे करत आमचे जेवण झाले. परत रेकॉर्ड सुरु :)
मृण्मय: CD लाव नाssss...
बाबा: अरे, थोडाच वेळ राहिला आहे आता पिक्चरचा.. लावू लगेच संपल्यावर...
मृण्मय: नाही, आत्ता..

परत एक विषयांतर... अरे तो दादा आहे ना पिक्चरमधला, तो खोटं बोलला, म्हणून त्याला शिक्षा होणार आहे. This was good enough to keep Mrunmay engaged for another 10 mins or so, until the commercial break.

बाबा: (काहीतरी बोलून मृण्मयला distracted ठेवायचे म्हणून) काय बोअर लोक आहेत ना? जाहिराती लावल्या नसत्या तर पिक्चर लवकर नसता का संपला? हो कि नाही रे मृण्मय?
मृण्मय: बाबा, CD लाव ना......... (असे म्हणत CD च्या रॅककडे पळत जातो)
बाबा: अरे, आता थोडाच राहिला आहे...
मृण्मय: (परत माझ्याकडे येत..) अरे बाबाsss, अॅड बोअर आहेत ना, मग आपण माझी CD लावू ना आत्ता...
बाबा: !!!!

Finally the movie ended in another 15 mins or so. मृण्मय तोपर्यंत जागला आणि मग CD पाहत झोपला :)

I had heard about the broken record technique only in the negotiation skills training, but never really used it myself. Mrunmay helped me with understanding and practice too :)

Wednesday, March 2, 2011

बालप्रश्न (??)

मृण्मयच्या शाळेतून चिट्ठी आली कि शुक्रवारी शाळेत बाहुला-बाहुलीचे लग्न आहे, त्यामुळे सर्वांनी बाहुला किंवा बाहुली घेऊन यावे. आज सुट्टी असल्यामुळे मी मृण्मयबरोबर जाऊन त्याच्या आवडीने बाहुला/ली आणायचा प्लॅन केला. सकाळपासून २-३ वेळा तरी माझे आणि मृण्मयचे बोलणे झाले कि जाऊ यात म्हणून. शेवटी संध्याकाळी आम्ही बाहेर निघालो. मी तयार होत असताना मृण्मयचा सणसणीत प्रश्न आला...

"अरे बाबा, पण बाहुला-बाहुलीची engagement झाली आहे का?"
मी -"..."
मृण्मय - "अरेSSSS.. त्यांचे लग्न आहे नाSSS, मग त्यांची engagement झालीये का?"

मी फक्त एव्हढेच म्हणू शकलो कि उद्या तू ते टीचरनाच विचार!!
मराठी powered by Lipikaar.com

Monday, February 28, 2011

डोकेबाज मृण्मय!!

स्थळ: तेजस फिटनेस पॉइंट
वेळ/काळ: आठवत नाही :(

माईआत्या: चल, जिममधे जाऊ
[मृण्मय बरोबर जातो]

मृण्मय: हे काय आहे?
माईआत्या: अरे हे पायाचा व्यायाम करायचे मशीन आहे...

मृण्मय: आणि हे?
माईआत्या: ते पोटाचे आहे...

[असे सगळे करत मृण्मय जिमच्या शेवटी पोहोचतो. चेहेर्‍यावर प्रश्नचिन्ह..]

मृण्मय: आणि मग डोक्याचे मशीन कुठे आहे?

[आख्खे जिम ROTFL :D :D]

Wednesday, February 16, 2011

काही संवाद - मृण्मयबरोबरचे

scene १. आम्ही SSPMS college समोरून चाललो होतो. त्या ग्राउंडवर एक मोठे विमान ठेवले आहे. मेघना ते दाखवत होती:
मेघना - ते बघ विमान!!
मृण्मय - ते college आहे..
(आम्ही दोघेही zap..)
मेघना - अरे, तुला कसे माहीत?
मृण्मय - माऊने सांगितले..
मेघना - कधी रे?
मृण्मय - अगं... तेव्हा गं.. आपण हॉटेलला चाललो होतो ना, तेव्हा .. (all actions and expressions getting dismissive - एव्हढे पण कसे तुमच्या लक्षात राहत नाही types)
(आम्ही दोघेही आठवायचा प्रयत्न करतो .. निष्फळ..)
मेघना - कुठले हॉटेल रे?
मृण्मय - "O" हॉटेsssssल... (as if आम्ही रोजच "O" हॉटेलला जातो.. :) )
[आम्ही २५ डिसेंबरला तिथे गेलो होतो - almost २ महिने झाले त्याला... we haven't been to that area after that and he still remembered...]

scene २. Restaurant मधे बसलो आहोत. दोन गायक गाणी म्हणत आहेत (English).
मृण्मय - बाबा, ते काय म्हणत आहेत?
बाबा - अरे ते गाणे म्हणत आहेत.
मृण्मय - ते कुठले गाणे म्हणतायत?
बाबा - [कुठलेतरी सांगतो]
मृण्मय - ते "Twinkle Twinkle" का नाही म्हणत?
बाबा - तू सांग त्यांना जाऊन...
[लगेच खुर्चीवरून उतरायला लागला..]
बाबा - अरे, त्यांचे गाणे संपले कि मग जा...
[मृण्मय दुसरे काहीतरी करत बसतो. आणि गाणे संपल्यावर लक्षात ठेऊन आपआपला उतरून त्या सिंगर्सकडे जातो]
मृण्मय - "Twinkle Twinkle" म्हणा ना... [and comes back to the table]
[मृण्मयचे पहिले request-a-song :) ]
...
थोड्या वेळाने दुसरे गाणे सुरु होते.
मृण्मय - बाबा ते "Twinkle Twinkle" का नाही म्हणत?
बाबा - असंच..
मृण्मय - का?
बाबा - अरे, त्यांना येत नसेल कदाचित!!!
मृण्मय - मग मी त्यांना म्हणून दाखवू???
[बाबा/आई दोघेही speechless....:)]

Saturday, February 5, 2011

एका चांगल्या scriptच्या शोधात....खरंच?

माधुरी दिक्षित, ऊर्मिला मातोंडकर, सोनाली बेंद्रे आणि मुग्धा गोडसे या सर्वांमधे काय साम्य आहे? त्या "मराठी मुली" आहेत, चौघीही "बॉलीवुड" मधे आहेत etc etc. पण या चौघींमधे अजून एक साम्य आहे, सर्वजणींना मराठी चित्रपटात काम करायचे आहे. पण एक मोठ्ठा कॉमन प्रॉब्लेम आहे... चांगले script मिळत नाही आहे.

माधुरीने हे पूर्वीच म्हटले होते, पण आता बाकिच्या तिघींनी पण तीच री ओढली आहे. (महाराष्ट्र टाईम्स, पुणे एडिशन)

आता मराठीमधे एव्हढे चित्रपट येत आहेत, आणि काही काही खरंच चांगले आहेत. मग यांनाच का मिळू नये? माधुरीला तर नाटकात पण काम करायचे आहे!! खरा प्रॉब्लेम असणार आहे पैशाचा.. माधुरीच्या मानधनाच्या रकमेत तर आख्खा मराठी चित्रपट तयार होईल.

का आता असे पण आहे? मराठी चित्रपटसृष्टीने आता बरीच मजल मारली आहे, बरेच चांगले चित्रपट आले आहेत, येत आहेत, चांगल्या कलाकारांची संख्या पण लक्षणीय आहे. आणि म्हणून मराठी निर्मात्यांना या "सुपरस्टार्स"ची गरज वाटत नाही?

बहुधा दोन्ही बरोबर असावे :)

Friday, January 21, 2011

मृण्मयचे पहिले स्नेहसंमेलन

दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळा सुरु झाली आणि शाळेने पत्र पाठवले की RC-1 चे स्नेहसंमेलन होणार आहे जानेवारीमधे आणि त्याची सविस्तर माहिती नंतर पाठविण्यात येईल. आम्ही जरा विचारात पडलो एव्हढ्याश्या मुलांकडून कशी काय तयारी करून घेणार? आणि ही मुले करणार का? परंतु एक बरे होते सर्व तयारी शाळाच करून घेणार होती.

काही दिवसांनी मृण्मयच्या मित्रांच्या बाबांकडून काही-काही तुकडे कळायला लागले. गाणी आहेत, डान्स आहे, पण टीचरने सगळे "secret" ठेवायला सांगितले आहे. आनंदी गाणे म्हणायला सुरुवात करते आणि अचानक थांबून म्हणते "secret" आहे... काव्या, साहिल आणि मृण्मय घरी काहीच सांगत नव्हते. हळू हळू आम्हाला गाण्यांचे बोल कळायला लागले आणि एक दिवस मृण्मयने पूर्ण गाणे म्हणून दाखवले - "Found a Peanut" तेसुद्धा हावभावांसकट, इतके गोड केले त्याने आणि आमचा इंटरेस्ट वाढायला लागला. नंतर कळले अजून एक गाणे आहे - "Miss Molly Had a Dolly" परंतु पठ्ठ्या अजून जास्त काहीच बोलत नव्हता.

ख्रिसमसच्या सुट्टयांनंतर अजून एक गाणे कळले - "जंगल झाडीत वाघोबा लपले". आता जरा आम्हाला मजा यायला लागली होती आणि आम्ही संमेलनाची ऊत्सुकतेने वाट बघायला लागलो. संमेलन यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार होते आणि तिथेच रंगीत तालीम पण करून घेतली शाळेने. आम्हाला उत्साह चढला होता, पण मृण्मय मात्र neutral होता. आम्हाला जरा काळजी वाटायला लागली होती कि हा ऐन वेळेस जायचे नाही म्हणतो कि काय!!

संमेलन बुधवारी होते (१९-जानेवारी) आणि संमेलनाचा ड्रेस सोमवारी देणार होते. आम्ही जरा शनिवारपासूनच वातावरण निर्मिती करायला सुरुवात केली. दादा आजोबा पण येणार आहेत, मोठ्ठे स्टेज असेल, मजा असते तिथे वगैरे वगैरे.. रविवार तसाच गेला. काळजीत अजून भर म्हणजे एकतर बुधवारी सकाळी लवकर पोचायचे होते नाट्यगृहावर आणि प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या आधी दिवस सुट्टी (शनिवार, रविवार आणि इतर मुलांच्या संमेलनासाठी म्हणून सोमवार मंगळवार). परंतु मृण्मय आता थोडा थोडा उत्साह दाखवायला लागलेला होता, त्यामुळे जरा आम्हालाही हुरुप आला होता. अजूनही आम्हाला नक्की काय काय आहे ह्याचा पत्ता नव्हता. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा बातमी अशी होती - मी गाण्यात आहे (मिस डॉली आणि फाउंड पीनट) आणि बाकिच्यांची बाकिची गाणी आहेत. nothing more... आम्ही प्रयत्न सोडून दिलेला होता आणि शेवटी एकदाचा बुधवार उजाडला...

विविध प्रकारची आमिषे दाखवत आम्ही संमेलनस्थळी वेळेवर (भल्या पहाटे :१५ वा.!!) पोहोचलो. शाळेने दिलेल्या कार्यक्रमपत्रिकेप्रमाणे RC-1 चा कार्यक्रम पहिल्या १५-२० मिनिटांमधेच होणार होता. त्यानंतर, सर्व मुलांना पालकांकडे देण्यात येणार होते. बरीच गर्दी असूनही आम्हाला बऱ्यापैकी पुढच्या सीटस् मिळाल्या. सुदैवाने कार्यक्रम वेळेवर सुरु झाला. सुरुवातीच्या सरस्वतीवंदनानंतर लगेचच RC-1 चा प्रोग्राम सुरु झाला. स्टेजवर "peanuts" ची मॉडेलस् ठेवली होती आणि मुले त्यांच्यामागे उभी होती. Poem सुरु झाली आणि मुलांनी अभिनय करायला सुरुवात केली. चेहेऱ्यावरील भाव फारसे दिसत नव्हते, पण हातवारे आणि हालचाली छान होत होत्या. आम्हाला हे कळत नव्हते कि आम्ही मृण्मयला शोधू कि पोरांचा अभिनय बघू :) शेवटी एव्हढे नक्की झाले की मृण्मय या गाण्यात नव्हता.

त्यानंतर सुरु झाले "Miss Molly Had a Dolly..." तरी पण मृण्मयचा पत्ता नव्हता.. आणि अचानक विंगेतून मुलांची एन्ट्री झाली - डोक्यावर काळी हॅट, गळ्यात स्टेथोस्कोप आणि हातात बॅग.. बॅकग्राउंडला गाणे चालू होते - "The Doctor came with his bag and hat".. आणि त्या चार मुलांमधे मृण्मय पण होता.. टोपी जरा मोठी होत होती पण ओळखू आला :)

गाणे पुढे सरकत होते, आणि अचानक मृण्मयच्या क्षात आले कि त्याने बॅग चुकीच्या जागी ठेवली आहे. सगळे गाणे सोडून त्याने आधी ती बॅग नीट जागी ठेवली आणि मग तेव्हढ्यात डॉक्टरांची बिल द्यायची वेळ झाली. चारही डॉक्टर्स खिशात हात घालून बिल शोधायला लागले - चुकीच्या खिशात :) शेवटी एका टीचरनी त्यांना मदत करून बिल काढून दिले खिशातून :)

गाणे संपले आणि सर्व मुले विंगेत पळाली आणि नवीन गाणे सुरु झाले - "जंगल झाडीत वाघोबा लपले..." काही वाघोबा आणि काही म्हातार्‍या :) गाणे छान झाले. आणि मग टीचरने उरलेल्या सर्व मुला-मुलींना एकत्र आणून काही poems म्हणायला सुरुवात केली आणि काहीजणांनी स्वत:च म्हणायला सुरुवात केली. बर्‍याच तालासुरात म्हटले, जिथे चुकत होते तिथे टीचर्स prompt करून मदत करत होत्या. एकंदरीत मजा आली.

आणि then it was Music Time!! सगळी मुले-मुली स्टेजवर येऊन मस्त नाचायला लागली. आमच्या चिरंजिवांनी स्टेजच्या डाव्या बाजूने एन्ट्री मारली, आणि रमत गमत उजव्या बाजूला येऊन उभा राहीला आणि नाचायला सुरुवात केली. अचानक स्वारी शांत झाली आणि काहीतरी शोधायला लागला, बहुतेक त्याला आठवले असावे की इथेच समोर कुठेतरी आपले आई-बाबा असायला पाहीजेत. परंतु प्रेक्षागृहात अंधार असल्यामुळे त्याला काहीच दिसत नसणार. तेव्हढ्यात कुठल्यातरी टीचरने त्याला खूण केली आणि पोरगं परत नाचायला लागले :)

२-४ मिनिटे झाल्यावर सगळ्यांना स्टेजवरुन खाली उतरवून पालकांकडे परत दिले. आम्ही उरलेला Sr. KG चा कार्यक्रम बघायला सुरुवात केली. काय छान करत होते सगळेजण!! २-३ नाटके आणि २-३ नाच - सर्वच सुंदर झाले!!

इतकी छोटी मुले पण इतक्या धिटाईने स्टेजवर इतके छान काम करू शकतात हे प्रत्यक्षच बघितले पाहीजे... :)

Saturday, January 15, 2011

एक संवाद - मृण्मय बरोबरचा

सकाळची वेळ.

मृण्मय दूध पितो आहे. अचानक त्याचा मूड बदलतो. स्वतः पिण्याच्याऐवजी त्याला माझ्याकडून दूध प्यायची लहर येते. १-२ घोट पिऊन झाल्यावर उत्साह संपुष्टात येतो. मी नुसताच कप हातात धरून कंटाळतो. शेवटी मी त्याला म्हणालो:
मी: तू बस असाच. मी माझी कॉफी संपवतो.
मृण्मय: नको. तू नको पिऊ.
मी: का रे?
मृण्मय: अरे ऽऽऽऽ... तू मला पाज. म्हणजे मी जिंकीन आणि तू हरशील

(म्हणजे माझे दूध आधी संपेल आणि मग तुझी कॉफी)

Smart isn't it? :)
मराठी powered by Lipikaar.com