Tuesday, September 12, 2023

तृतीय पुण्यस्मरण

 ती. दादा,

आज तुम्हाला जाऊन ३ वर्षे झाली. जरी सगळे आता नेहेमीचे झाले असले, तरी तुमची आठवण सतत आमच्या सोबत असते. अजूनही कॉफी बनवण्यासाठी कप घेताना नकळत तुमचा पण कप घेतला जातो. सकाळी जिन्यावरून खाली येताना तुम्ही दिसत आहात का हा विचार डोकावून जातो.

जुलै मध्ये मी बरेच दिवस मी आजारी होतो. ताप. त्यामुळे तुमच्या खोलीत मुक्काम होता. फार फार आठवण येत होती. गादीवरून उठून बसताना, किंवा तिथेच बाजूला खुर्चीवर बसताना सतत वाटत होते कि  तुम्ही आजूबाजूला आहात, माझ्या हालचाली अगदी तुमच्यासारख्या होत आहेत. दोन-चार दिवसांनी अगदी रडवेला झालो होतो, इतके कि मी मेघनाला म्हणालो देखील कि या खोलीतले सगळे बदलून टाकू या.. तिने सावरून घेतले मला. तुमच्या आठवणी असणे चांगलेच आहे ना. कितीही दिवस झाले तरी त्या येताच राहणार आहे त्यातच आपल्या नात्याचे यश आहे. 

परवा माईकडे राखीपौर्णिमेच्या निमित्ताने जाणे झाले. जेवण झाले आणि माई सहजच म्हणाली - उठवत नाही आहे ... आणि तुमची आठवण झाली .. राम नगरकरांच्या "उठू कसा" या आठवणीवर तुम्ही एवढे हसला होतात, एवढे हसला होतात अजूनही लक्षात आहे.

यावर्षीचे गणपती व्हायचे आहेत अजून, पण आत्ताच आपले सगळे संवाद डोक्यातून जायला सुरुवात झाली आहे - "मोदकाचे वायन आणा", "गुरुजींना वायनाचे दान द्या" वगैरे. मागची दोन वर्षे खूप त्रास व्हायचा अशा आठवणी आल्या कि, आता काहीकाही वेळेला छान वाटते, तुम्ही नसलात तरी या आठवणी आहेत या जाणिवेने बरे वाटते. साऊथ इंडियन खाताना मी हटकून दहीवडा पण घेतो. तुमचा तो ठरलेला मेनू असायचा डोसा/उत्तप्पा काही असले तरी शेवट दहीवड्यानेच व्हायचा.

परवा जुने फोटो चाळताना तुमचा एक मस्त फोटो सापडला आहे, प्रसन्न हास्य!!


तुमच्या आठवणींसोबत तुमचा आशिर्वाद सतत आमच्या पाठीशी असू देत हीच ईच्छा !!

तुमचा,

मंदार