Sunday, October 11, 2020

हे जीवन सुंदर आहे!

 काल रात्री एक इंग्रजी चित्रपट बघत होतो - "The Intern". एक सेवानिवृत्त व्यक्ती (बेन)  एका e-commerce संस्थेत शिकाऊ उमेदवार म्हणून कामास सुरुवात करते. कथा खूप सुंदर आहे. त्याच्या सुरुवातीस त्याचे मनोगत चालू असते. पत्नीच्या मृत्यूनंतर एकाकी झालेल्या बेनचे आयुष्य बदलून जाते. वयोमानानुसार बरेचसे समवयस्क मित्र, नातेवाईक एक एक करून निघून जायला लागतात आणि त्याचा प्रभाव जिवंत व्यक्तींवर होत असतो.

ते बघता बघता मला दादांची आठवण झाली. पंच्याऐशी वर्षे अत्यंत सुंदरपणे आयुष्य जगले. एकवीस वर्षांपूर्वी आई गेली. तेव्हापासून आत्तापर्यंत त्यांनी बरेच काही बघितले, बरेच काही पचवले आणि बरेच काही शिकले पण. गेल्या काही वर्षात त्यांचे बरेचसे मित्र एक-एक करून सोडून गेले. पण दादांनी कधी कच नाही खाल्ली. 

विनायक नवाथे - दादांचे अत्यंत जिवलग मित्र. दोघांचे ऑफिस एकच. रहायचे जवळच. त्यामुळे रोजचे जाणे येणे. सकाळची दुसरी कॉफी एकमेकांच्या घरी. पुढे काका त्यांच्या दुसऱ्या घरी राहायला गेले त्यामुळे भेटी कमी झाल्या, पण फोन चालू असायचे. त्यानंतर २०१६ मध्ये दादांना COPD आहे असे निदान झाले. त्यामुळे ते घरातच स्थानबद्ध. जरा कठीणच होते ते दादांना. सतत काहीतरी करत राहायची सवय असलेल्या माणसाला एका जागी जखडून ठेवले कि कसे होईल.. तशीच काहीशी त्यांची अवस्था झाली होती. ज्यावेळेस डॉ. नी त्यांना सांगितले कि आता दिवसातला बराच वेळ Oxygen लावून ठेवायला लागेल तेव्हा ते बरेचसे हलले होते. पण त्यांची जिद्द जिवंत होती. सुरुवातीच्या त्रासानंतर त्यांनी बदललेली परिस्थिती स्वीकारली. स्वतःचा एक दिनक्रम आखून घेतला होता. त्यात TV बरोबरच देवाची पूजा आणि मित्र/नातेवाईकांना फोन हे पण होते. त्या दिवशी कामाचा दिवस होता, मी ऑफिस मध्ये होतो. अचानक नवाथे काकांच्या मुलाचा फोन आला. काळजात जरा शंका आली आणि दुर्दैवाने ती खरी पण झाली.. नवाथे काका वारले होते. तसे अचानकच. फोन ठेवला. आणि मला आभाळ कोसळल्यासारखे झाले. नवाथेकाका गेले .. आता हे दादांना कसे सांगू? त्यांना हा धक्का सहन होईल का? नुकतेच ते जरा स्थिरस्थावर होत होते. जरासा धक्का सुद्धा त्यांना सहन होईल असे मला वाटलेच नाही. चक्क रडायला लागलो मी .. ऑफिसमध्ये.. सहकाऱ्यांच्या मदतीने कसाबसा सांभाळून मी घरी यायला निघालो. डोक्यात काहूर माजले होते. ताई, माई गीताई सगळ्यांशी बोललो.. कसे सांगू दादांना. सांगणे तर आवश्यक होते. डॉक्टरांशी पण बोललो.. जर काही झाले तर काय करायचे वगैरे.

मला असे वाटते कि माई/किंवा गीताईला मी बोलावून घेतले होते. संध्याकाळी दादांची कॉफी झाल्यावर हिय्या करून सांगितले. धक्का बसला दादांना.. पण सावरले हळूहळू .. म्हणाले - ठीक आहे.. कधीतरी होणारच आहे.. ॐ शांति।

त्यानंतर असे बरेच प्रसंग आले. प्रत्येकवेळी मला टेन्शन यायचे. परंतु दादांनी सगळे धक्के पचवले. या सगळ्यात त्यांना त्यांच्या दिनक्रमाने खूप आधार दिला असे मला वाटते. नकारात्मक विचारांना थारा देणे त्यांना मान्यच नव्हते जणू. उरलेले आयुष्य मस्तपणे जगायचे, खाणे, TV बघणे, नातवंडे, पंतवंडे सगळ्यांचे कौतुक करणे या सगळ्यात त्यांनी स्वतःला रमवून घेतले होते.

गेल्या ४ वर्षात अनेक वाईट बातम्या ऐकूनही प्रत्येक वेळेस ते सावरायचे आणि सकारात्मकतेने परत दिनक्रम चालू ठेवायचे.

हे जीवन सुंदर आहे.. दादा ते चांगलेच जाणून होते आणि स्वतः जगत होते आणि त्यांचा हा दृष्टिकोन आम्हाला आयुष्यभर प्रेरणा देत राहील.                          

Saturday, September 26, 2020

ते सात दिवस

दादा गेले. पंधरा दिवस झाले त्याला आता.

जसे डॉक्टरांनी दादांची COVID-19 ची तपासणी करायचा सल्ला दिला, मी आणि मेघना जरा धास्तावलोच होतो. दादांची सगळी परिस्थिती बघता जर टेस्ट पॉझिटिव्ह आली असती तर बऱ्याच गोष्टी अवघड होत्या. मी ताबडतोब माझ्या तिन्ही बहिणींना सांगितले. आम्ही सगळे आशा करत होतो कि  तसे काही नाही होणार. दादांना तापाव्यतिरिक्त काहीही लक्षणे नसल्याने डॉक्टरांना पण साध्या तापाचीच शक्यता वाटत होती. सकाळी ११ च्या सुमारास तपासणी साठी सॅम्पल घेऊन गेले. संध्याकाळी साधारण १० च्या सुमारास result येईल असे सांगितले होते. जीव खालीवर होत होता. शेवटी १०:२० ला डॉक्टरांचा message आला कि पॉझिटिव्ह आहे म्हणून. त्यांनी लगेचच सांगितले कि दादांना हॉस्पिटल मध्ये दाखल करावे लागेल ते सुद्धा ICU + Oxygen + ventilator ची सोया असेल असे.

पुण्यातील परिस्थिती खूपच वाईट होती (किंबहुना अजूनही आहे). त्यामुळे काळजीत अजूनच भर पडली. परंतु आम्ही ताबडतोब हालचाल करायला सुरुवात केली. बहिणींबरोबर zoom कॉल करून सगळ्यांना कल्पना दिली आणि सगळे हात कामाला लागले - हात म्हणण्यापेक्षा मोबाईल !! जेवढे हॉस्पिटलचे क्रमांक मिळतील तिकडे फोन करून चौकशी सुरु झाली. फक्त नकारघंटाच ऐकू येत होती. काहींनी दुसऱ्या दिवशी चौकशी करायला सांगितले. आंतरजालावर असलेली माहिती अद्ययावत नव्हती. त्यामुळे अजूनच अडचण येत होती.

आम्ही सगळे मोठे लोक आमच्या परीने प्रयत्न करत असताना लहानांनी हार मानलेली नव्हती. मृण्मय आणि माझ्या भाचे कंपनीने एक google sheet तयार करून सगळा data नोंदवायला सुरुवात केली - हॉस्पिटल ची नावे, तिथले क्रमांक, ICU ची उपलब्धता इ. प्रत्येकाने आपले व्यावसायिक network मध्ये पण तपासायला सुरुवात झाली. रात्री १२:३० च्या सुमारास एक गोष्ट नक्की झाली - कि आता जे काही व्हायचे ते सकाळीच होईल.

देव कृपेने दादांना बाकी काही त्रास होत नव्हता. घरात oxygen cylinder होता त्यामुळे थोडी काळजी कमी होती.

आठ तारखेला सकाळी परत सुरुवात केली. आता आम्ही जरा जास्त संघटितपणे कामास सुरुवात केली. प्रत्येकाला हॉस्पिटल्स वाटून दिली आणि सगळीकडे पाठपुरावा चालू केला. माझ्या एका डॉक्टर मित्राने रुबी हॉल मध्ये प्रयत्न करतो सांगितले, गीताई च्या मैत्रिणीने कोथरूड मधील देवयानी हॉस्पिटलची माहिती दिली. मेघनाच्या नेटवर्क मधून संचेती हॉस्पटिल आले. सह्याद्री हॉस्पिटल पण आमच्या उपलब्ध लिस्टवर आले. रुबी हॉल मिळाला असता तर खूप चांगले झाले असते. माझा मित्रच तिथे होता आणि त्याला दादांची मेडिकल हिस्टरी माहित होती. पण दुर्दैवाने तसे होणे नव्हते.

गीताई आणि तिच्या मैत्रिणीबरोबर बोलून मी देवयानी हॉस्पिटल बद्दल माहिती घेतली. सगळे चांगले वाटले आणि सगळ्यांनी मिळून दादांना तिथे दाखल करायचा निर्णय घेतला. शेवटी दुपारी ३:३० च्या सुमारास दादांची ऍडमिशन झाली आणि उपचारांना सुरुवात झाली.

अचानक संध्याकाळी हॉस्पिटल मधून फोन - दादांना remidesivir द्यायचे आहे. असे कळले कि त्या औषधाच्या कमी उपलब्धतेमुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी ते देणे आवश्यक आहे ते सुद्धा आधार कार्ड ची कॉपी देऊन!! ताबडतोब मेघनाच्या बहिणीला पाठवले. योगायोगाने ते औषध हॉस्पिटलच्या दुकानातच उपलब्ध होते आणि पुढची पळापळ वाचली.

कोणालाच भेटायला जायची परवानगी नसल्याने आम्ही डॉक्टरांच्या कॉलची चातकासारखी वाट बघायचो. पहिले दोन्ही-तिन्ही दिवस दादांची तब्ब्येत व्यवस्थित होती. आम्हा सगळ्यांचे रोज झूम कॉल्स सुरु होते. अजून काही करता येईल का याची चाचपणी चालू असायची. फारसे काही करणे शक्य नव्हते. तरी पण एक दिवस गीताई आणि माझा भाऊ मनोज दोघेही हॉस्पिटलला गेले आणि तिथल्या मुख्य डॉक्टरांशी बोलले. रेसिडेंट डॉक्टरच्या परवानगीने दादांशी एक व्हिडिओ कॉल पण केला. तोच दादांचा बाहेरच्या जगाशी शेवटचा संपर्क ठरला.   

शनिवार सकाळचा डॉक्टरांचा रिपोर्ट फारसा उत्साहवर्धक नव्हता आणि दुपारी अचानक परिस्थिती खालावल्याचा डॉक्टरांचा फोन आला. काळजात चर्र झाले. ताबडतोब झूम वरून गीताई आणि मनोजने तिकडे जाण्याचे ठरले. परंतु ते तिकडे पोहोचायच्या आधीच सगळे संपलेले होते!

सगळ्यांवर आभाळच कोसळले. तुम्ही कितीही मनाची तयारी केलेली असली तरी अशा वेळी तुम्हाला कळते कि कितीही तयारी केली तरी ती कमीच असते. त्यात भर म्हणून कि काय आम्हाला भयाण वास्तवाची जाणीव झाली. COVID रुग्ण असल्याने त्यांना घरी आणता येणार नव्हते कि त्यांचे अंत्यविधी करता येणार होते. एवढेच काय त्यांचे अंत्यदर्शन पण दुरूनच!! अत्यंत असहाय परिस्थिती होती ती. पण दैवापुढे कोणाचे काही चालते का?

सगळे करून कसाबसा घरी परतलो.

आज १५ दिवस झाले त्या सगळ्याला. दादा नसण्याची हळू हळू सवय होत आहे. कितीही वाटले तरी आयुष्य थांबत नाही. आणि दादांनाही तसे आवडणार नाही. त्यांनी स्वतः असाच धक्का पचवला होता - २१ वर्षांपूर्वी. आणि त्यानंतरही त्यांनी निराश न होता आयुष्य छानपणे जगायला सुरुवात केली होती. त्यांची त्यांच्या मुला-लेकरांकडूनही हीच अपेक्षा असणार.. नाही का?

Monday, September 21, 2020

दादा गेले...

दादा गेले ! 

पंच्याऐंशी वर्ष पूर्ण करण्यास अवघे काही दिवस असतानाच त्यांना अचानक बोलावणे आले. आणि कुठलाही मोह न ठेवता त्यांनी पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.

गेले चार एक वर्षे दादांची झुंज चालू होती. COPD (chronic obstructive pulmonary disease) ने त्यांना ग्रासले होते. जवळजवळ पूर्ण वेळ त्यांना प्राणवायू चे उपकरण लावून ठेवावे लागायचे. तसा त्रासच तो. सतत नाकात नळी. साधे उठून बाथरूम ला जायचे म्हटले तरी लक्षात ठेवून ती नळी काढायची आणि परत आल्यावर आठवणीने लावायची. मधून मधून pulse oxymeter वर saturation बघून नोंद करून ठेवायची. 

सगळे त्यांनी शांतपणे सहन केले. कुठे कधी तक्रारीचा सूर नाही कि गाऱ्हाणे नाही.  त्यांनी स्वतःचा दिनक्रम  ठरवून घेतलेला होता आणि त्याबरहुकुम त्यांचे सगळे चालायचे. त्यात बदल करायचा हक्क फक्त त्यांचा (आणि बहुतेक माईचा - बऱ्याच वेळा मी तिच्याकडून त्यांना निरोप द्यायचो 😜) त्यांच्या सिरीयल च्या वेळेप्रमाणे त्यांची कामे चालायची. इतके कि त्यांनी मोबाईलवर गाजर लावून ठेवलेला असायचा कि चॅनेल कधी बदलायचा ते. सिरिअलच्या कथेत इतके ते गुंतून जायचे कि काही काही वेळा मी जाऊन चेक करायचो कि हे कोणाशी एवढे बोलत आहेत!! देवांची पूजा असो कि सकाळचे प्रातर्विधी, व्यायाम म्हणून फेऱ्या असोत कि दुपारची सक्तीची झोप, सगळ्याचा दिनक्रम व्यवस्थित आखून घेतलेला होता. 

या सगळ्यामध्ये त्यांनी नवीन तंत्रज्ञान पण आत्मसात केले होते. मोबाईल वर  WhatsApp, फेसबुक सगळं वापरायचे. कित्येकांशी त्यांनी WA च्या माध्यमातून दररोजचा संबंध ठेवलेला होता. COPD मुळे घरात बंदिस्त झाल्यामुळे मोबाईल हि त्यांची जगाशी संपर्क ठेवण्याची गुरुकिल्ली होती आणि त्यांनी ती लीलया आत्मसात केली होती. त्यांच्या कित्येक परिचितांच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट दादांच्या "सुप्रभात" आणि "शुभ रजनी" या संदेशाने होत असे. जर कधी कोणी reply नाही केला तर दोनेक दिवसात दादांचा त्यांना फोन जायचा चेक करायला कि सगळे ठीक आहे ना म्हणून. सगळ्यांना प्रेमाने बांधून ठेवले होते त्यांनी..

गेले आता... साडेचार वर्षे झुंजून, आणि तसे झुंजताना पण जगायचं कसं हे शिकवून पुढच्या प्रवासाला गेले. दुर्दैव एवढेच कि मुले, जावई, सून, नातवंडं, पंतवंडं, आते/मामे भावंडं, बहिणी एवढा मोठा परिवार असूनही शेवटच्या क्षणी आम्हापैकी कोणीच त्यांच्याजवळ नव्हतो. सर्वांना धरून राहणारे दादा शेवटच्या क्षणी मात्र एकटेच होते. नियती अजब असते म्हणतात ती अशी. 

परंतु एक समाधान नक्की आहे - सर्व प्रकारचे आघात पचवूनही दादा शेवटी सुखी आणि समाधानी होते.   

Saturday, July 12, 2014

श्रध्दांजली

हात थरथरत आहेत लिहिताना, डोळ्यात पाणी आहे. मनात अपराधीपणाची भावना.

आज गुरुपौर्णिमा. बऱ्याच वर्षांनी शनिवारचा योग जुळून आला. त्यात मृण्मयने पण त्याच्या teacher ना भेटायचे ठरवले. मी पण बेत पक्का केला - माझ्या शिक्षकांना - फडके बाईना भेटून यायचे. मृण्मयच्या सोनाली teacher ना भेटून झाल्यावर मी आणि मृण्मय पोहोचलो शनिपाराजवळ - बाईंच्या घरपाशी .

सोसायटीच्या गेटमधून आत शिरलो. मनात धाकधुक होती . बऱ्याच वर्षांनी चाललो होतो. बिल्डींगच्या खाली पोहोचलो आणि gallery चे दार बंद दिसले. not a good sign. तसाच वर पोहोचलो. दार बंद. दाराबाहेरचा चप्पल stand नव्हता. तेवढ्यात एक आजी दिसल्या. घाबरत घाबरतच विचारले त्यांना - फडके बाई कुठे आहेत? आजी अवाक झाल्या.. हळुच म्हणाल्या - अरे दोन अडीच वर्षे झाली त्यांना जावून. . .

पायातले त्राणच गेले. कसाबसा खाली उतरलो आणि समोरच्या कट्ट्यावर बसलो. डोळ्यातले पाणी बघून मृण्मयला प्रश्न पडला होता बाबाला काय झाले म्हणून . .

फडके बाईंना मृण्मयला भेटायचे होते. मागच्या वेळेस एकटाच गेले होतो तेव्हा रागावल्या होत्या. नंतर नाहीच जमले. कारणे काहिही असोत, जमले नाही हेच खरे. कायमची टोचणी लागून राहणार आहे ही …

न.फ. -  माझ्या दुसरी आणि तिसरीच्या वर्ग शिक्षिका. खूप कडक आणि शिस्तप्रिय. मुले खूप घाबरून असायची. दुसऱ्या वर्गातली मुले आमच्या वर्गात यायला घाबरायची. पण शिकवायच्या मस्त. मला मात्र खूप आवडायच्या. दोन्ही वर्षी भरघोस यश मिळाले. तिसरीत तर पूर्ण इयत्तेत पहिला आलो. त्यामुळे जास्तच आवडायला लागल्या. पुढे माध्यमिक शाळेत गेलो तरी बऱ्याच वेळा गुरुपौर्णिमेला जाणे व्हायचे. दहावी, बारावी, engineering - प्रत्येक वेळेस पेढे घेवून पोहोचलो आणि बाईंच्या चेहेऱ्यावरचा आनंद बघून आणखीनच खूष झालो. आमच्या कडच्या सगळ्या मोठ्या कार्यक्रमांना बाईंनी आवर्जून हजेरी लावली होती. दर वेळी त्यांच्याकडे गेले कि बाई नेमक्या हळिवाचा किंवा डिंकाचा लाडु द्यायच्या (जो मला आजिबात आवडत नाही .. आणि तरीही मी खायचो!) शेवटी एकदा सांगितले कि नाही आवडत मला त्यानंतर मात्र चिवड्याची वाटी पुढे यायला लागली :)

आज मृण्मयला भेटवायचे होते त्यांना .. राहून गेले … आता कायमचेच …

बाई - जाताना पण शिकवून गेलात - "Do things on time." सारखे वाटते आहे दर वर्षी एक दिवस तरी भेटून यायला पाहीजे होते न चुकता .. आता काही उपयोग नाही त्या वाटण्याचा .. 

आयुष्यभर लक्षात ठेवणार आहे आणि हीच तुम्हाला श्रद्धांजली … 

Friday, December 6, 2013

आठवणी

आज सकाळी नाश्त्याला जाताना एका माणसाला हीर काढताना बघितले आणि मन भूतकाळात गेले....

साधारण वीस-एक वर्ष मागे.

मजा होती. नारळाची झावळी पडली कि ती पळत जावून उचलून मागच्या अंगणात टाकायची - कोणी पळवून नेवू नये म्हणून. आणि मग सुट्टीच्या दिवशी लागायचे कामाला. कोयता घेऊन खाली जायचे, झावळ्यांची पाती काढायची, मग त्याचा एकत्र गट्ठा करून वरती आणून गॅलरीत ठेवायचा. मस्तपैकी चौरंग घेवून बसायचे आणि मग सुरु. हिर काढायला. त्याच्या सुऱ्या वेगळ्या ठेवलेल्या असायच्या - बऱ्याचशा धार गेलेल्या पण हिर निघतील एव्हढी धार असायची.

एक गठ्ठा संपला कि दुसरा. किंवा कंटाळा येईपर्यंत. शेवटी ते सगळे हिर एकत्र करून त्याचा खराटा बनवायचा. बऱ्याचदा तो सुटायचा, पण परत बांधायचा. किंवा मग त्याच्यात मागून लाकडाचा तुकडा खुपसायचा. 

मग कधी वेळ झाला नाही आणि पाऊस आला, कि सगळा गिचका व्हायचा तिथे. मग काहीतरी करून ते सगळे साफ करायला लागायचेच. आणि हे करण्यात सगळ्यांचा हातभार. मी, दादा, आई, आजी आणि हो भाऊ आजोबा पण. जमेल तसे चालू असायचे. 

आणि हो. झावळीच्या मधल्या भागाचे तुकडे करून ते गच्चीत सुकायला टाकायचे आणि मग कधीतरी दुसऱ्या गॅलरीत बंब पेटायचा - आंघोळीच्या पाण्यासाठी. मग कधीतरी शेजारच्या गोरे ताई तक्रार करायच्या कि धूर खूप होतो म्हणून. मग बंब बंद व्हायचा… काही दिवसांसाठी :)

आणि होळीच्या दिवशी तर खूप काळजी घ्यायला लागायची .. कोणी झावळ्या पळवू नयेत म्हणून.. आईचा डोळ्याला डोळा लागायचा नाही दुपारी. जरा झावळ्यांचा आवाज वाटला कि मागच्या अंगणात डोकावून बघायचे - कोणी झावळी पळवत नाही ना म्हणून … 

हिर वापरून धनुष्य बाण बनवायचे आणि जुन्या कॅलेंडरवर नेम धरून मारत बसायचे. त्यातल्या त्यात जाडे हिर शोधून बाजूला ठेवायचे आणि काकांच्या दुकानातून रिकामी रिळे आणून त्याच्यापासून रणगाडा बनवायचा - मेणबत्तीचा तुकडा, लांब रबर आणि हिराचा तो तुकडा!

मग नंतर कधीतरी हे सगळे बंद पडले.… 

Monday, January 14, 2013

बापसे बेटा सवाई

रविवारची दुपार. मृण्मयचे जेवण चालू होते आणि बडबडही ...

मृण्मय: बाबा, आज कणिक कोणी केली असेल? म्हणजे पाणी कोणी घातले असेल?
मी: उम्म... आईने...
मृण्मय: नाही.. ३ chance हम्म.. एक झाला ..
मी: मग माउने..
मृण्मय: नाही.. माऊ तर झोपली होती..
मी: मग तू?
मृण्मय: yess !!
मी: अरे वा वा!!
मृण्मय: आणि आमटी ?
मी: आईने..
मृण्मय: बरोबर!!
मृण्मय: आणि .... आणि खिडकी?
मी surprised .. नक्की काय expected आहे ते लक्षात यायला जरा वेळ लागला... अचानक आठवले कि त्याने सकाळी खिडक्या साफ केल्या होत्या...लगेच उत्तरलो.. तू!!
मृण्मय: नाही.... ओळख??
मी: ए उगाच खोटे नको हं बोलूस.. मी बघितले आहे तुला सकाळी ...
मृण्मय: नाही.... ओळख??
मी : तूच.. मला माहित आहे..
मृण्मय: अरे बाबा.. खिडक्या maker ने केल्या मी नाही!!! (He meant carpenter or person who "made" the windows!!)

बाबा flat ..... आणि kichen मध्ये आईला हसू आवरेना...

Sunday, October 28, 2012

Code


दिवाळीची खरेदी चालू होती. आत दुकानात गर्दी होती म्हणून मी आणि मृण्मय दुकानाबाहेर बसलो होतो. मृण्मयची बडबड सुरु होती. 
मृण्मय: बाबा, मला आत आईकडे जायचे आहे.
मी: अरे, आई ड्रेस ट्राय करते आहे. थांब इथेच...
मृण्मय: तुला कसे माहित?
मी: आईने सांगितले...
मृण्मय: का?
मी: अरे मी आणि आई सगळं सांगतो ना एकमेकांना..
मृण्मय: मग मला का नाही सांगत तुम्ही?
मी: अरे तुला कळत नाही ना अजून सगळे... थोडा मोठा झालास की सांगू..
मृण्मय: कळते मला...
मी: मी ऑफिसचे नाही कि नाही सांगत सगळे..
मृण्मय: सांग ना.. कळते मला..
मी: मी ऑफिसमधे कोड लिहितो ना, ते कसे कळणार तुला...
मृण्मय: कळले मला..
मी: काय? (मी कनफ्युज्ड...)
मृण्मय: अरे, एक ब्लॉक असतो. त्याच्या खाली लिहिलेले असते कि काय लिहायचे आहे त्या ब्लॉक मधे
(Getting more and more confused)
मृण्मय: त्या ब्लॉकमधे काही ब्लॅक असतात आणि काही व्हाईट असतात. ब्लॅकमधे काही लिहायचे नसते..
आणि मी कपाळावर हात मारून घेतला!!