Sunday, October 11, 2020

हे जीवन सुंदर आहे!

 काल रात्री एक इंग्रजी चित्रपट बघत होतो - "The Intern". एक सेवानिवृत्त व्यक्ती (बेन)  एका e-commerce संस्थेत शिकाऊ उमेदवार म्हणून कामास सुरुवात करते. कथा खूप सुंदर आहे. त्याच्या सुरुवातीस त्याचे मनोगत चालू असते. पत्नीच्या मृत्यूनंतर एकाकी झालेल्या बेनचे आयुष्य बदलून जाते. वयोमानानुसार बरेचसे समवयस्क मित्र, नातेवाईक एक एक करून निघून जायला लागतात आणि त्याचा प्रभाव जिवंत व्यक्तींवर होत असतो.

ते बघता बघता मला दादांची आठवण झाली. पंच्याऐशी वर्षे अत्यंत सुंदरपणे आयुष्य जगले. एकवीस वर्षांपूर्वी आई गेली. तेव्हापासून आत्तापर्यंत त्यांनी बरेच काही बघितले, बरेच काही पचवले आणि बरेच काही शिकले पण. गेल्या काही वर्षात त्यांचे बरेचसे मित्र एक-एक करून सोडून गेले. पण दादांनी कधी कच नाही खाल्ली. 

विनायक नवाथे - दादांचे अत्यंत जिवलग मित्र. दोघांचे ऑफिस एकच. रहायचे जवळच. त्यामुळे रोजचे जाणे येणे. सकाळची दुसरी कॉफी एकमेकांच्या घरी. पुढे काका त्यांच्या दुसऱ्या घरी राहायला गेले त्यामुळे भेटी कमी झाल्या, पण फोन चालू असायचे. त्यानंतर २०१६ मध्ये दादांना COPD आहे असे निदान झाले. त्यामुळे ते घरातच स्थानबद्ध. जरा कठीणच होते ते दादांना. सतत काहीतरी करत राहायची सवय असलेल्या माणसाला एका जागी जखडून ठेवले कि कसे होईल.. तशीच काहीशी त्यांची अवस्था झाली होती. ज्यावेळेस डॉ. नी त्यांना सांगितले कि आता दिवसातला बराच वेळ Oxygen लावून ठेवायला लागेल तेव्हा ते बरेचसे हलले होते. पण त्यांची जिद्द जिवंत होती. सुरुवातीच्या त्रासानंतर त्यांनी बदललेली परिस्थिती स्वीकारली. स्वतःचा एक दिनक्रम आखून घेतला होता. त्यात TV बरोबरच देवाची पूजा आणि मित्र/नातेवाईकांना फोन हे पण होते. त्या दिवशी कामाचा दिवस होता, मी ऑफिस मध्ये होतो. अचानक नवाथे काकांच्या मुलाचा फोन आला. काळजात जरा शंका आली आणि दुर्दैवाने ती खरी पण झाली.. नवाथे काका वारले होते. तसे अचानकच. फोन ठेवला. आणि मला आभाळ कोसळल्यासारखे झाले. नवाथेकाका गेले .. आता हे दादांना कसे सांगू? त्यांना हा धक्का सहन होईल का? नुकतेच ते जरा स्थिरस्थावर होत होते. जरासा धक्का सुद्धा त्यांना सहन होईल असे मला वाटलेच नाही. चक्क रडायला लागलो मी .. ऑफिसमध्ये.. सहकाऱ्यांच्या मदतीने कसाबसा सांभाळून मी घरी यायला निघालो. डोक्यात काहूर माजले होते. ताई, माई गीताई सगळ्यांशी बोललो.. कसे सांगू दादांना. सांगणे तर आवश्यक होते. डॉक्टरांशी पण बोललो.. जर काही झाले तर काय करायचे वगैरे.

मला असे वाटते कि माई/किंवा गीताईला मी बोलावून घेतले होते. संध्याकाळी दादांची कॉफी झाल्यावर हिय्या करून सांगितले. धक्का बसला दादांना.. पण सावरले हळूहळू .. म्हणाले - ठीक आहे.. कधीतरी होणारच आहे.. ॐ शांति।

त्यानंतर असे बरेच प्रसंग आले. प्रत्येकवेळी मला टेन्शन यायचे. परंतु दादांनी सगळे धक्के पचवले. या सगळ्यात त्यांना त्यांच्या दिनक्रमाने खूप आधार दिला असे मला वाटते. नकारात्मक विचारांना थारा देणे त्यांना मान्यच नव्हते जणू. उरलेले आयुष्य मस्तपणे जगायचे, खाणे, TV बघणे, नातवंडे, पंतवंडे सगळ्यांचे कौतुक करणे या सगळ्यात त्यांनी स्वतःला रमवून घेतले होते.

गेल्या ४ वर्षात अनेक वाईट बातम्या ऐकूनही प्रत्येक वेळेस ते सावरायचे आणि सकारात्मकतेने परत दिनक्रम चालू ठेवायचे.

हे जीवन सुंदर आहे.. दादा ते चांगलेच जाणून होते आणि स्वतः जगत होते आणि त्यांचा हा दृष्टिकोन आम्हाला आयुष्यभर प्रेरणा देत राहील.