Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

Friday, November 11, 2011

उमेद

त्या गुलाबी वळणावरती भेटलास,
आयुष्यभर साथ देईन म्हणालास,
गोड स्वप्नांत गुंतले मी,
तुझ्यासवे स्वर्गात पोहोचले मी.

मधुचंद्राची गोडी,
तुझी नी माझी जोडी,
दॄष्ट लागली कोणाचीतरी,
काढली कोणीतरी खोडी,

तो काळा दिवस आयुष्यातला,
पण कोणास ठाऊक होते,
संध्याकाळच्या कातरवेळेस,
माझे नशीबच बदलणार होते

ऑफिसचा पहिलाच दिवस,
तुझी वाट बघण्याची मजा,
ह्रुदयात अनामिक हुरहुर,
एका बातमीत झाली सजा

बॉम्बच्या एका फटक्यात,
उधळून गेला सगळा डाव,
सव्वीस दिवसांचा संसार,
उरला फक्त काळजात घाव

तुझ्या आठवणींचाच आधार आता,
जगण्याची उमेद देईल मला,
देवा, पुढच्या जन्मी मात्र,
त्यांच्या आधी नेशील मला!!

प्रथम प्रकाशित : http://bhashya.blogspot.com/2006/11/blog-post_23.html

Wednesday, November 9, 2011

वाट


लग्नापूर्वी..
वाट बघण्यात पूर्वी किती मजा असायची,
पांच मिनिटे उशीर झाला तरी काळजी वाटायची

लग्नानंतर …
आता मात्र वाट बघणे किती कंटाळवाणे होते,
पांच मिनिटे उशीर झाला तरी वाटते, मुद्दाम करते…

Tuesday, November 8, 2011

सावली


समुद्र किनारी,
नारळाच्या खाली,
सूर्याच्या किरणांनी,
पडली एक सावली.

वाळूच्या कणांत,
सोनेरी पाण्यात,
वर खाली होत,
चालली होती तोर्‍यात,

म्हणाली ती सूर्याला,
नाही घाबरत तुला,
एव्हढाच असेल तोरा,
तर पकड पाहू मला,

सूर्य म्हणाला, बाई ग,
मी आहे म्हणूनच तू आहे,
माझ्याशिवाय तुझे,
आयुष्यच शून्य आहे

पटले नाही सावलीला,
चालत राहीली तोर्‍यात,
सूर्यासमोर ताठ मानेने,
उभी राहीली कुर्र्यात,

तेव्ह्ढ्यात संध्याकाळ झाली,
सूर्याची सुट्टी झाली,
तोर्‍यात चालणारी ती,
सावली आता गायब झाली!!

Monday, November 7, 2011

जीवनसाथी


चार दिवसांचा संसार सुखाचा,
वार्‍यासंगे उडून गेला,
सुरवंटाचे फुलपाखरू करून,
असा कसा तू निघून गेला

तुझ्या आठवणीवर जगायला,
पुरेसा सहवास तरी हवा,
येते मी आता तुझ्यासवे,
पुढच्या जन्मी मांडू खेळ नवा

Saturday, November 5, 2011

स्वप्न


हिरव्यागार रानात, वाटे तुझ्यासवे जावे,
निळ्याशार तलावात पाय बुडवून बसावे,
तुझ्या नितळ गालावर पाणी उडवावे,
आणि त्या थेंबांचे मोती होताना बघावे.

दुरवर आकाशात, तुझ्यासवे भरारी घ्यावी,
ढगांवर स्वार होवून स्वर्गाची सैर करावी,
अवकाशातील तारकांची छान माळ करावी,
आणि तुझ्या गोर्‍यापान गळ्यात घालावी

छोट्याश्या बोटीत बसून समुद्रावर जावे,
अथांग सागरासारख्या तुझ्या प्रेमात बुडावे,
सागरामध्ये खूप खूप खोल शिरावे,
शंखशिंपल्यांच्या दागिन्यांनी तुला सजवावे,

गुलाबी थंडीत, तुझ्या कुशीत शिरावे,
काळ्याभोर केशसंभारात हात गुंफावे,
तुझ्या टपोरी डोळ्यात हरवून जावे,
देवाजवळ एकच प्रार्थना, हे सगळे खरे व्हावे

Friday, November 4, 2011

आशा


दीसामागून दीस गेले, वाट पहाणे संपले नाही,
पाण्याशिवाय तहानेने जीव जाणे संपले नाही.

नुसताच एक काळा ढग आशा दाखवून गेला,
जाता जाता डोळ्यात मात्र पाणी आणून गेला.

भेगाळलेली जमीन आणि तहानलेले लेकरू,
पाण्याच्या आशेने बघा तळमळतंय वासरू

सुर्याच्या उन्हाने अंगाची झाली आहे लाही
घशाला आता कोरड पण पडत नाही

अशीच वाट पहात बसायचे, तीळ तीळ मरायचे
कधीतरी पाऊस येईल अशा आशेवर जगायचे

Thursday, November 3, 2011

मिठी


शिरता शिरता मिठीत तुझिया,
भासे मजला स्वर्ग गवसला
विसरूनी सारे दुःख वेदना,
हृदयी अवचित सूर उमटला

स्पर्शसुखाचा फुलता मोहर,
रोमरोम रसरसले सत्वर
विसावता या कुशीत तुझिया,
एक अनामिक उठली हुरहुर

थांबला आता श्वासही माझा,
थांबली ती ह्रुदयाची धडधड
मिटून जाता दरी सहज ही
निमून गेली माझी तडफड

एकच आता ध्यास हा माझा,
जगावे तर तुझीच होवून,
शेवटची ती असेल ईच्छा
मिठीत रहावे तुझ्या सुखावून

Wednesday, November 2, 2011

मागणी


तुला नकळत पाहताना, मलाच कळले नाही
तुझ्यात गुंतलो कधी, मलाच कळले नाही

तुझे ते स्मित हास्य, गालावर ओघळणार्‍या बटा,
तुझे काळेभोर डोळे, जणू अथांग सागरामधील लाटा

तुझे ते गोरे-गोरे गाल, नाक असे जरी चपटे
दुसर्‍यांशी बोलताना बघून काळजात रुतती काटे

मैत्रिणींच्या घोळक्यात तू एकटीच दिसतेस छान,
सगळ्या बदकांमधे जसा फक्त राजहंसच छान

मला घायळ करी, पाठमोरी तुझी मूर्ती
तुला डोळ्यात साठवताना, वाटे झाली ईच्छापूर्ती

आता फक्त एकच मागणे, नको देवूस नकार,
सर्वांसमक्ष हात मागतो, कर माझा स्वीकार

Friday, October 28, 2011

घर


घर म्हणजे फक्त तू आणि मी नाही,
घर म्हणजे फक्त वीटा आणि भिंती नाहीत
घर म्हणजे दोन कुटंबांचा संगम
त्यात तुझे आणि माझे असे भेद करायचे नाहीत

घरासाठी लागतात नियम
घरासाठी लागतो संयम
पण फक्त नियमांनी घर बनत नाही
आणि संयमाशिवाय घर तगत नाही

घर म्हणजे तुझा माझा संवाद
नको तिथे एकही विसंवाद
यदाकदाचित झाले जरी वादविवाद
तरी देऊ एकमेकांच्या सादेला साद

Thursday, October 27, 2011

शेवट


जिवाभावाचा सोबती, असा अचानक निघून गेला,
जाताना जीवन जगायची आसच घेवून गेला

ती शेवटची आर्त हाक, ती व्याकुळ नजर,
बोलायचे होते बरेच काही, पण शब्द अडकले ओठांवर

जगन्नियंत्याशी केली कितीही मारामारी,
तरीही शेवटचे शब्द – I am sorry

आता संपले सगळे, काहीच नाही उरले
अजून काही सहन करायचे त्राण नाही उरले

Tuesday, October 25, 2011

पामर


काय लिहू? काहीच सुचत नाही
पण लिहिल्याशिवाय राहवत पण नाही

कविता लिहू कि कथा लिहू?
मजा लिहू कि व्यथा लिहू?

पण हे सगळे कोणासाठी?
स्वतःसाठी कि दुसर्‍यांसाठी?

एकदा वाटते सोडून देऊ सगळे
कारण आपण नाही जगावेगळे

दासबोधानंतर लिहिणार काय?
आम्ही तर पामर दुसरे काय?

Tuesday, October 16, 2007

मैत्री

मैत्री असावी काचेसारखी,
स्वच्छ, नितळ, पारदर्शी,
मैत्री नसावी काचेसारखी,
तडा जाताच अपारदर्शी!!

Sunday, January 14, 2007

फक्त तू..

रिमझिम पावसात,
टपोर्‍या थेंबात,
वाहत्या पाण्यात,
दिसतेस फक्त तू....

सकाळच्या कवडशांत,
दुपारच्या काहिलीत,
संध्याकाळच्या निःशब्दतेत,
जाणवतेस फक्त तू....

निसर्गातही तूच,
देवळातही तूच,
मनाच्या कोंदणातही,
असतेस फक्त तू....

शब्दांच्या चांदण्यात,
संगीताच्या लयीत,
थिरकणार्‍या नृत्यात,
भासतेस फक्त तू....

माझ्या नसांनसांत,
माझ्या प्रत्येक श्वासात,
हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात,
फक्त तू फक्त तू ...