Tuesday, October 16, 2007

मैत्री

मैत्री असावी काचेसारखी,
स्वच्छ, नितळ, पारदर्शी,
मैत्री नसावी काचेसारखी,
तडा जाताच अपारदर्शी!!

Monday, October 8, 2007

पुस्तक प्रदर्शन

अक्षरधारा - कोथरुडमधे पुस्तकांचे झाड, १ लाख मराठी पुस्तके... अशी जाहिरात बघितल्यावर कोणाचे पाय प्रदर्शनाकडे वळणार नाहित? माझेही तसेच झाले. गेल्या शनिवारी संध्याकाळी थोडा रिकामा वेळ काढून कर्वे रस्त्यावरील अंबर हॉलमधे प्रदर्शन बघायला गेलो, तर ही झुंबड उडालेली होती. बाहेरच त्यांची जाहिरात चालू होती... झाडावरील पुस्तक ओळखा आणि एक पुस्तक मोफत मिळवा. ४ पर्यावरणविषयक पुस्तकांपैकी एक पुस्तक मोफत देणार होते. परंतु मी आतील पुस्तके बघण्यास जास्त उत्सुक असल्यामुळे, तिथे फारसा वेळ न घालवता आत शिरलो.

आत शिरताक्षणीच मला धक्का बसला. एका बाजूला चक्क कपडयांचा स्टॉल होता. त्याच्या पलीकडे आणखी बरेच असेच स्टॉल्स होते. परंतु तेव्हढ्यात माझे लक्ष हॉलमधे गेले आणि मग भरपूर पुस्तके दिसू लागली. पुस्तकांचा भरपूर साठा होता. काही काही जुनी लहानपणी वाचलेली पुस्तके परत तिथे पाहून मन भूतकाळात जात होते. पुस्तकांमुळे सुटट्या कशा मजेत जायच्या त्याची आठवण झाली.

मी एका विशिष्ट पुस्तकाच्या शोधात आहे - रक्तरेखा - ले. प्रदीप दळवी. एक अप्रतिम पुस्तक. पूर्वी वाचलेले आहे, पण आता मला त्याची एक प्रत स्वतःसाठी हवी आहे. गेले बरेच दिवस मी ते शोधत आहे. परंतु "साठा उपलब्ध नाही" हेच उत्तर ऐकायला मिळत होते. मला आशा होती कि या प्रदर्शनात तरी ते मिळेल. धक्कादायक गोष्ट अशी निघाली की तिथे प्रदीप दळवींचे एकही पुस्तक दिसले नाही :( काउंटरवर चौकशी केली असता तसेच उत्तर मिळाले - "साठा नाही".

काही महिन्यांपासून मी प्रयत्नपूर्वक वेगवेगळ्या लेखकांची पुस्तके खरेदी करत आहे. त्याच्यापूर्वी माझी धाव फक्त पु.ल., व.पुं. पर्यंतच असायची. यावेळेस पण जरा वेगळी पुस्तके घेतली आहेत.
१. माझी कॉर्पोरेट यात्रा - रमेश जोशी
२. कुरुक्षेत्र - सुबोध जावडेकर
३. नक्षत्रांचे देणे - आरती प्रभू
४. गर्भार्थ - डॉ. बाळ फोंडके

एक गोष्ट मला या प्रदर्शनाबद्द आवडली नाही ती म्हणजे अव्यवस्थितपणा. कुठलेही पुस्तक कुठेही ठेवलेले होते. एकच पुस्तक ४-५ ठिकाणी दिसत होते. आत्मचरित्राच्या बाजूला सिडने शेल्डनचा अनुवाद. मुलांची पुस्तके एका कोपर्‍यात तर चित्रकलेची पुस्तके दुसर्‍या टोकाला. टेबल्सची मांडणी तर इतकी विचित्र होती, की, लक्षात ठेवून एखादे टेबल राहणार नाही याची काळजी घ्यावी लागत होती. खेळती हवा तर नावाला पण नव्हती. उगाच कुठेतरी २-४ पंखे दिसले, पण त्यांच्याकडू वारा येईल तर शप्पथ!

पुस्तकांची विक्री वाढवायची असेल तर या गोष्टींची पण काळजी घेतली पाहीजे. जास्तीत जास्त ग्राहकवर्ग कसा येईल, आणि परत परत कसा येईल हे बघितले पाहिजे. नाहीतर अवघड आहे....

Monday, June 18, 2007

मुद्राराक्षसाचा विनोद

"प्रसाद ओकला वोट करण्यासाठी ...."

" 'प्रसाद ओक' ला वोट करण्यासाठी...."

मी मराठी झी मराठी :)

Saturday, June 9, 2007

पुणेरी पाट्यांमधे अजून एक भर

तुम्ही आत्तापर्यंत पुणेरी पाट्यांबद्दल खूप वाचले ऐकले असेल. अशाच सगळ्या पाट्यांचा एक संग्रह नुकताच मला इंटरनेट वर सापडला.
http://www.busybeescorp.com/puneripatya/

आणि अशीच एक पाटी मला सापडली त्याचा हा फोटो :)एका इस्पितळातील X-Ray विभागाच्या बाहेर लावली आहे.. तुम्ही ओळखू शकता कुठे आहे ही? :)

Thursday, February 1, 2007

रेडियोची गोडी...

कॅसेट्स, सीडीज् च्या जमान्यात रेडियो अजूनही त्याचे स्थान टिकवून आहे. इतरांसाठी इतर बरीच कारणे असतील रेडियो ऐकण्यासाठी, माझ्यासाठी मात्र एकच कारण असते - अवीट गोडीची गाणी ध्यानी-मनी नसताना अचानक ऐकायला मिळतात.

हे खरे आहे कि आता तुमच्याकडे तुमच्या आवडत्या गाण्यांची कॅसेट असेल व ती तुम्ही तुम्हाला हवी तेव्हा ऐकू शकता. परंतु त्यावेळेस तुम्हाला माहीत असते कि पुढचे गाणे कुठले असणार आहे ते. रेडियोच्या बाबतीत मात्र तसे नाही. छानछान गाणी वळवाच्या पावसाप्रमाणे अचानक तुमच्या अंगावर कोसळतात आणि त्या पावसाप्रमाणेच आसमंत सुगंधित करून टाकतात.

पुर्वी विविधभारती असे कार्यक्रम सादर करत असे - बेला के फूल, एक ही फिल्मसे इ. आता रेडियो मिर्ची पण त्यात सामील झाले आहे - 'पुरानी जीन्स' रात्री ९ ते ११. एक से एक बढिया गाणी दिवसभराचा शीण घालवून टाकतात. आजही त्यातलाच एक दिवस - "एक अजनबी हसीनासे यूं मुलाकात हो गयी", "थोडीसी जो पी ली है", "इस मोड से जाते है".. दिन बन गया!!

टिप: एकच ईच्छा - जर कोणी असा कार्यक्रम एकाही जाहिरातीशिवाय आणि बडबडीशिवाय सादर केला तर ... सोने पे सुहागा... काय खरे आहे ना?

Sunday, January 14, 2007

फक्त तू..

रिमझिम पावसात,
टपोर्‍या थेंबात,
वाहत्या पाण्यात,
दिसतेस फक्त तू....

सकाळच्या कवडशांत,
दुपारच्या काहिलीत,
संध्याकाळच्या निःशब्दतेत,
जाणवतेस फक्त तू....

निसर्गातही तूच,
देवळातही तूच,
मनाच्या कोंदणातही,
असतेस फक्त तू....

शब्दांच्या चांदण्यात,
संगीताच्या लयीत,
थिरकणार्‍या नृत्यात,
भासतेस फक्त तू....

माझ्या नसांनसांत,
माझ्या प्रत्येक श्वासात,
हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात,
फक्त तू फक्त तू ...

Tuesday, January 9, 2007

गोष्टी मनातल्या

मी आज एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण करत आहे - ३० वा वाढदिवस :) गद्धेपंचविशीतील मजा संपून आयुष्याशी खरी ओळख व्हायला आता सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत 'विशी'त असल्याचा आनंद मागच्या वर्षीच ('एकोणतिशी') मावळायला सुरुवात झाली होती. आज त्याची पूर्तता झाली. एक बरे आहे, मनाला तिशी-चाळीशी असल्या गोष्टींशी काही घेणे देणे नसते. पन्नाशीतली माणसेही तिशीतल्या माणसाला लाजवतील अशी कृतीशील असतात. त्यामुळे या तिसाव्या वाढदिवसाने माझ्या मानसिकतेत तसा फारसा काही फरक पडेल असे वाटत नाही. फक्त एक शिक्का - ३० पूर्ण!

तर असा हा माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे नवीन सदर चालू करत आहे. मी काही कोणी राजकीय नेता किंवा सामाजिक कार्यकर्ता नाही त्यामुळे माझा वाढदिवसाची जाहीरात कुठे होणार नाही (आणि नाही आहे तेच बरे आहे). त्यामुळे विचार केला की का नाही एक नवीन सदर चालू करु?

आधीचे सदर 'भाष्य' चालूच राहील परंतु त्याच्यावर मुख्यतः इंग्रजी लेख येत राहतील. हे सदर पूर्णपणे मराठी लेखांसाठीच असेल.

इतकी सारी इतर सदरे असताना, मी अजून नवीन काय लिहिणार, असा जर प्रश्न कोणाला पडला असेल तर त्याचे उत्तर देवूनच हा प्रारंभीचा लेख संपवतो. जरी महर्षी व्यास, ज्ञानेश्वर, तुकाराम आणि समर्थ रामदास यांनी जगातल्या बहुतेक सर्व विषयांना स्पर्श केलेला असला तरी प्रत्येक माणसाच्या जाणीवा वेगवेगळ्या असतात, प्रतिक्रिया वेगळ्या असतात, त्या बर्‍याच वेगळ्या अनुभवांना जन्म देतात. आणि आपल्याला आलेला अनुभव दुसर्‍याबरोबर वाटण्याची ऊर्मी मानवाला जात्याच असते. त्यामुळे माझ्याकडे पण लिहिण्यासारखे बरेच काही आहे/असेल, म्हणून हा सगळा प्रपंच!

वाचा सौख्यभरे!!

~मंदार