दादा गेले. पंधरा दिवस झाले त्याला आता.
जसे डॉक्टरांनी दादांची COVID-19 ची तपासणी करायचा सल्ला दिला, मी आणि मेघना जरा धास्तावलोच होतो. दादांची सगळी परिस्थिती बघता जर टेस्ट पॉझिटिव्ह आली असती तर बऱ्याच गोष्टी अवघड होत्या. मी ताबडतोब माझ्या तिन्ही बहिणींना सांगितले. आम्ही सगळे आशा करत होतो कि तसे काही नाही होणार. दादांना तापाव्यतिरिक्त काहीही लक्षणे नसल्याने डॉक्टरांना पण साध्या तापाचीच शक्यता वाटत होती. सकाळी ११ च्या सुमारास तपासणी साठी सॅम्पल घेऊन गेले. संध्याकाळी साधारण १० च्या सुमारास result येईल असे सांगितले होते. जीव खालीवर होत होता. शेवटी १०:२० ला डॉक्टरांचा message आला कि पॉझिटिव्ह आहे म्हणून. त्यांनी लगेचच सांगितले कि दादांना हॉस्पिटल मध्ये दाखल करावे लागेल ते सुद्धा ICU + Oxygen + ventilator ची सोया असेल असे.
पुण्यातील परिस्थिती खूपच वाईट होती (किंबहुना अजूनही आहे). त्यामुळे काळजीत अजूनच भर पडली. परंतु आम्ही ताबडतोब हालचाल करायला सुरुवात केली. बहिणींबरोबर zoom कॉल करून सगळ्यांना कल्पना दिली आणि सगळे हात कामाला लागले - हात म्हणण्यापेक्षा मोबाईल !! जेवढे हॉस्पिटलचे क्रमांक मिळतील तिकडे फोन करून चौकशी सुरु झाली. फक्त नकारघंटाच ऐकू येत होती. काहींनी दुसऱ्या दिवशी चौकशी करायला सांगितले. आंतरजालावर असलेली माहिती अद्ययावत नव्हती. त्यामुळे अजूनच अडचण येत होती.
आम्ही सगळे मोठे लोक आमच्या परीने प्रयत्न करत असताना लहानांनी हार मानलेली नव्हती. मृण्मय आणि माझ्या भाचे कंपनीने एक google sheet तयार करून सगळा data नोंदवायला सुरुवात केली - हॉस्पिटल ची नावे, तिथले क्रमांक, ICU ची उपलब्धता इ. प्रत्येकाने आपले व्यावसायिक network मध्ये पण तपासायला सुरुवात झाली. रात्री १२:३० च्या सुमारास एक गोष्ट नक्की झाली - कि आता जे काही व्हायचे ते सकाळीच होईल.
देव कृपेने दादांना बाकी काही त्रास होत नव्हता. घरात oxygen cylinder होता त्यामुळे थोडी काळजी कमी होती.
आठ तारखेला सकाळी परत सुरुवात केली. आता आम्ही जरा जास्त संघटितपणे कामास सुरुवात केली. प्रत्येकाला हॉस्पिटल्स वाटून दिली आणि सगळीकडे पाठपुरावा चालू केला. माझ्या एका डॉक्टर मित्राने रुबी हॉल मध्ये प्रयत्न करतो सांगितले, गीताई च्या मैत्रिणीने कोथरूड मधील देवयानी हॉस्पिटलची माहिती दिली. मेघनाच्या नेटवर्क मधून संचेती हॉस्पटिल आले. सह्याद्री हॉस्पिटल पण आमच्या उपलब्ध लिस्टवर आले. रुबी हॉल मिळाला असता तर खूप चांगले झाले असते. माझा मित्रच तिथे होता आणि त्याला दादांची मेडिकल हिस्टरी माहित होती. पण दुर्दैवाने तसे होणे नव्हते.
गीताई आणि तिच्या मैत्रिणीबरोबर बोलून मी देवयानी हॉस्पिटल बद्दल माहिती घेतली. सगळे चांगले वाटले आणि सगळ्यांनी मिळून दादांना तिथे दाखल करायचा निर्णय घेतला. शेवटी दुपारी ३:३० च्या सुमारास दादांची ऍडमिशन झाली आणि उपचारांना सुरुवात झाली.
अचानक संध्याकाळी हॉस्पिटल मधून फोन - दादांना remidesivir द्यायचे आहे. असे कळले कि त्या औषधाच्या कमी उपलब्धतेमुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी ते देणे आवश्यक आहे ते सुद्धा आधार कार्ड ची कॉपी देऊन!! ताबडतोब मेघनाच्या बहिणीला पाठवले. योगायोगाने ते औषध हॉस्पिटलच्या दुकानातच उपलब्ध होते आणि पुढची पळापळ वाचली.
कोणालाच भेटायला जायची परवानगी नसल्याने आम्ही डॉक्टरांच्या कॉलची चातकासारखी वाट बघायचो. पहिले दोन्ही-तिन्ही दिवस दादांची तब्ब्येत व्यवस्थित होती. आम्हा सगळ्यांचे रोज झूम कॉल्स सुरु होते. अजून काही करता येईल का याची चाचपणी चालू असायची. फारसे काही करणे शक्य नव्हते. तरी पण एक दिवस गीताई आणि माझा भाऊ मनोज दोघेही हॉस्पिटलला गेले आणि तिथल्या मुख्य डॉक्टरांशी बोलले. रेसिडेंट डॉक्टरच्या परवानगीने दादांशी एक व्हिडिओ कॉल पण केला. तोच दादांचा बाहेरच्या जगाशी शेवटचा संपर्क ठरला.
शनिवार सकाळचा डॉक्टरांचा रिपोर्ट फारसा उत्साहवर्धक नव्हता आणि दुपारी अचानक परिस्थिती खालावल्याचा डॉक्टरांचा फोन आला. काळजात चर्र झाले. ताबडतोब झूम वरून गीताई आणि मनोजने तिकडे जाण्याचे ठरले. परंतु ते तिकडे पोहोचायच्या आधीच सगळे संपलेले होते!
सगळ्यांवर आभाळच कोसळले. तुम्ही कितीही मनाची तयारी केलेली असली तरी अशा वेळी तुम्हाला कळते कि कितीही तयारी केली तरी ती कमीच असते. त्यात भर म्हणून कि काय आम्हाला भयाण वास्तवाची जाणीव झाली. COVID रुग्ण असल्याने त्यांना घरी आणता येणार नव्हते कि त्यांचे अंत्यविधी करता येणार होते. एवढेच काय त्यांचे अंत्यदर्शन पण दुरूनच!! अत्यंत असहाय परिस्थिती होती ती. पण दैवापुढे कोणाचे काही चालते का?
सगळे करून कसाबसा घरी परतलो.
आज १५ दिवस झाले त्या सगळ्याला. दादा नसण्याची हळू हळू सवय होत आहे. कितीही वाटले तरी आयुष्य थांबत नाही. आणि दादांनाही तसे आवडणार नाही. त्यांनी स्वतः असाच धक्का पचवला होता - २१ वर्षांपूर्वी. आणि त्यानंतरही त्यांनी निराश न होता आयुष्य छानपणे जगायला सुरुवात केली होती. त्यांची त्यांच्या मुला-लेकरांकडूनही हीच अपेक्षा असणार.. नाही का?