Monday, September 21, 2020

दादा गेले...

दादा गेले ! 

पंच्याऐंशी वर्ष पूर्ण करण्यास अवघे काही दिवस असतानाच त्यांना अचानक बोलावणे आले. आणि कुठलाही मोह न ठेवता त्यांनी पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.

गेले चार एक वर्षे दादांची झुंज चालू होती. COPD (chronic obstructive pulmonary disease) ने त्यांना ग्रासले होते. जवळजवळ पूर्ण वेळ त्यांना प्राणवायू चे उपकरण लावून ठेवावे लागायचे. तसा त्रासच तो. सतत नाकात नळी. साधे उठून बाथरूम ला जायचे म्हटले तरी लक्षात ठेवून ती नळी काढायची आणि परत आल्यावर आठवणीने लावायची. मधून मधून pulse oxymeter वर saturation बघून नोंद करून ठेवायची. 

सगळे त्यांनी शांतपणे सहन केले. कुठे कधी तक्रारीचा सूर नाही कि गाऱ्हाणे नाही.  त्यांनी स्वतःचा दिनक्रम  ठरवून घेतलेला होता आणि त्याबरहुकुम त्यांचे सगळे चालायचे. त्यात बदल करायचा हक्क फक्त त्यांचा (आणि बहुतेक माईचा - बऱ्याच वेळा मी तिच्याकडून त्यांना निरोप द्यायचो 😜) त्यांच्या सिरीयल च्या वेळेप्रमाणे त्यांची कामे चालायची. इतके कि त्यांनी मोबाईलवर गाजर लावून ठेवलेला असायचा कि चॅनेल कधी बदलायचा ते. सिरिअलच्या कथेत इतके ते गुंतून जायचे कि काही काही वेळा मी जाऊन चेक करायचो कि हे कोणाशी एवढे बोलत आहेत!! देवांची पूजा असो कि सकाळचे प्रातर्विधी, व्यायाम म्हणून फेऱ्या असोत कि दुपारची सक्तीची झोप, सगळ्याचा दिनक्रम व्यवस्थित आखून घेतलेला होता. 

या सगळ्यामध्ये त्यांनी नवीन तंत्रज्ञान पण आत्मसात केले होते. मोबाईल वर  WhatsApp, फेसबुक सगळं वापरायचे. कित्येकांशी त्यांनी WA च्या माध्यमातून दररोजचा संबंध ठेवलेला होता. COPD मुळे घरात बंदिस्त झाल्यामुळे मोबाईल हि त्यांची जगाशी संपर्क ठेवण्याची गुरुकिल्ली होती आणि त्यांनी ती लीलया आत्मसात केली होती. त्यांच्या कित्येक परिचितांच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट दादांच्या "सुप्रभात" आणि "शुभ रजनी" या संदेशाने होत असे. जर कधी कोणी reply नाही केला तर दोनेक दिवसात दादांचा त्यांना फोन जायचा चेक करायला कि सगळे ठीक आहे ना म्हणून. सगळ्यांना प्रेमाने बांधून ठेवले होते त्यांनी..

गेले आता... साडेचार वर्षे झुंजून, आणि तसे झुंजताना पण जगायचं कसं हे शिकवून पुढच्या प्रवासाला गेले. दुर्दैव एवढेच कि मुले, जावई, सून, नातवंडं, पंतवंडं, आते/मामे भावंडं, बहिणी एवढा मोठा परिवार असूनही शेवटच्या क्षणी आम्हापैकी कोणीच त्यांच्याजवळ नव्हतो. सर्वांना धरून राहणारे दादा शेवटच्या क्षणी मात्र एकटेच होते. नियती अजब असते म्हणतात ती अशी. 

परंतु एक समाधान नक्की आहे - सर्व प्रकारचे आघात पचवूनही दादा शेवटी सुखी आणि समाधानी होते.



   

8 comments:

स्मिता बर्वे said...

निशब्द

Amrut said...

भावपूर्ण श्रद्धांजली!
देव दादांच्या आत्म्यास मुक्ती प्रदान करो.

Unknown said...

खूप छान व्यक्त झाला आहेस, मंदार. भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर तुम्हा सर्वांना ह्या दुःखातुन सावरण्यास बळ देवो.

Nikhil said...

भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

Ajit Mazire said...

भावपूर्ण श्रद्धांजली

Unknown said...

मंदार फारच छान लिहिले आहे दादासाहेब यांना भावपुर्ण श्रद्धांंजली .







Unknown said...

मंदार फारच छान लिहिलेले आहे. दादासाहेबांना भावंपुर्ण श्रध्दांजली.

Manoj pandit said...

May his hoil rest in peace.he was a good friend of navathe ajoba